वैभव सूर्यवंशीचे ६ ऐतिहासिक रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वैभव सूर्यवंशीला वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या लीग, आयपीएलमध्ये घेण्यात आले आणि तिथूनच त्याची प्रतिभा दिसू लागली. राजस्थान रॉयल्सने वैभवची खेळण्याची क्षमता ओळखून त्याला संधी दिली आणि त्याने संधीचे सोने केले. वैभवने आयपीएलमध्ये आधीच अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारतीय फलंदाज आहे. आज, अव्वल गोलंदाजही वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करण्यास घाबरतात. कारण त्यांच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याची वैभवची क्षमता आहे.
आयपीएल, इंडिया ‘अ’ आणि १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर, वैभव सूर्यवंशी आता लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्येही आपली छाप सोडण्यास सज्ज आहे. वैभवने दुलीप ट्रॉफीमध्येही इतिहास रचला आहे. दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि १५७ दिवसांत अर्धशतक झळकावून, या स्पर्धेत सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. वैभव सूर्यवंशीने ४२ चेंडूंमध्ये हे अर्धशतक पूर्ण करून ५७ वर्षे जुना विक्रम मोडला.
वैभव अत्यंत लहान खेळाडू आहे. मात्र त्याच्यावर सर्व स्तरातून एक प्रेशर निर्माण करण्यात येत आहे असं अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा यासाठी आतापर्यंत अनेकांनी ट्विटही केलंय आणि काही दिग्गजांनी मुलाखतींमधूनही आपलं मत मांडलं आहे. मात्र वैभव सूर्यवंशी या सर्वांपासून अनभिज्ञ स्वतःचे काम करताना दिसून येत आहे. अनेकदा तो मुलाखतीमध्ये हेदेखील सांगतो की, मला कोणतेही कोणाचेही रेकॉर्ड माहीत नसतात, त्यामुळे सहजपणाने खेळणं हे एकच लक्ष्य असतं आणि टीमला जिंकवून देणं हेच ध्येय असतं. वैभव असाच खेळत राहिल्यास भल्याभल्यांचे रेकॉर्ड तो कमी वयात तोडेल हे काही वेगळं सांगायला नको!






