Vinesh Phogat Commented on His Political Journey at Pune My political Birth is to Give Justice to women
Vinesh Phogat Political Journey : मी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी राजकारणात आले, आणि त्यांना न्याय देण्यासाठी हा मार्ग मी निवडला आहे. मी निश्चितच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करतेय, मला यामध्ये निश्चित यश मिळेल. हरियाणामध्ये यांनी मला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला येथेही हे खूप पैशांचा वापर करताहेत. परंतु, यांना हरियाणामध्ये माझे सिट पाडण्यात यश आले नाही. आताही यांना कोणत्याही प्रकारचे यश येथेही मिळणार नाही. मी कायमच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन, माझ्या राजकीय कारकिर्दीचा महत्त्वाचा मुद्दा हाच राहिला आहे. माझा राजकीय जन्मच हा मुद्दा घेऊन झाला आहे. पुण्यातून काॅंग्रेसच्या विधान भवनातून विनेश फोगाट यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य केले.
महिलांच्या शोषणावर उठवला आवाज
माझा राजकीय प्रवासच एका आंदोलनापासून सुरु झालाय, आम्ही कुस्तीमधील महिलांच्या शोषणावर आवाज उठवला. त्यासाठी मोठे आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाचा या सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही महिलांच्या समस्या घेऊन संसदेच्या दारात ओरडून बोलत होतो, तर यांनी महिलांना तुरुंगात डांबले, आता या लोकांना महाराष्ट्रात लाडकी बहीण आठवलीये, हे काही योग्य नाही. याचा त्यांना काही उपयोग होणार नाही.
आम्ही महिला आंदोलन करत असताना लाडकी बहीण का नाही आठवली
आता यांना लाडकी बहीण योजना आठवली, यापूर्वी आम्ही बहिणी तेथे मोठ्या आवाजाने ओरडत होत्या, तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवली नाही. आता तुम्ही हिंदू-मुस्लीम करून ओरडताय त्यापेक्षा तुम्ही तथ्यांवर बोला. हिंदू-मुस्लीमवर बोलून काहीच उपयोग नाही. हे सरकार हिंदू-मुस्लीमवर बोलते. त्यांना विकासावर बोलायला पाहिजे. ते हे सोडून बाकी सगळं बोलतात. आता मी त्यांना विचारते यांना आता लाडकी बहीण आठवली एवढ्या दिवस आम्ही आंदोलन केले त्यांना त्यावेळेला महिलांचे प्रश्न का नाही आठवले उलट त्यांनी आम्हाला तुरुंगात डांबले.
पॅरिस ऑलिम्पिक अंतिम फेरीत ठरली अपात्र
उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे. विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले होते. नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला कोणत्याही श्रेणीमध्ये केवळ 100 ग्रॅम जास्त वजन भत्ता दिला जातो, परंतु विनेशचे वजन यापेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी केला राजकीय प्रवेश
हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराज नेते बंडखोरीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करीत आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करून दोन्ही खेळाडूंच्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा हेही उपस्थित होते.