भारताचा संघ काही दिवसांमध्ये आशिया कप खेळण्यासाठी जाणार आहे. टीम इंडिया सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. 9 सप्टेंबर पासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. तर शुभमन गिल हा भारतीय संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपुर्वीच भारतीय संघाची घोषणा केली होती. त्याआधी भारतामध्ये देशातंर्गत स्पर्धा सुरु आजपासून झाल्या आहेत.
भारतीय स्थानिक हंगामाची सुरुवात आज दुलीप ट्रॉफीने झाली. यावेळी ही स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. हा सामना नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन विरुद्ध ईस्ट झोन यांच्यात खेळला जात आहे. मध्य विभागाचा कर्णधार ध्रुव जुरेल आणि पूर्व विभागाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळत नाहीत. याचे कारणही समोर आले आहे. दोन्ही कर्णधार अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत.
टीओआयच्या वृत्तानुसार, “जुरेलला सामन्यापूर्वी पाठीला दुखापत झाली होती आणि निवडकर्त्यांनी त्याला या सामन्यातून बाहेर राहण्यास सांगितले आहे. तो आशिया कप संघासाठी देखील स्टँडबाय आहे आणि कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. आशिया कपनंतर भारत घरच्या मैदानावर चार कसोटी सामने खेळेल आणि ऋषभ पंतच्या दुखापतीवरील अनिश्चिततेमुळे, जुरेलला कोणताही धोका पत्करू नये असे सांगण्यात आले आहे.”
अलीकडेच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतला. या दौऱ्यात खेळली गेलेली ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. अभिमन्यू ईश्वरन इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा भाग होता. तथापि, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुखापतग्रस्त इशान किशनच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईश्वरनला पूर्व विभागाचा कर्णधार बनवण्यात आले.
सामन्यापूर्वी तो फ्लूने आजारी पडला. ईश्वरनसाठी हा एक मोठा धक्का आहे. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी होती. अनेक मालिकांमध्ये भारतीय संघाचा भाग असूनही, ईश्वरनला पदार्पण करता आलेले नाही. अशा परिस्थितीत तो धावा करण्यासाठी उत्सुक होता.
जुरेलच्या अनुपस्थितीत, मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारकडे मध्य विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे. पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले आणि वर्षानुवर्षे दुष्काळ संपवला. पूर्व विभागाचे नेतृत्व अष्टपैलू रियान परागकडे आहे, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते.