WPL 2025: Will unprecedented history be made in WPL? 'This' MI women's batsman is 3 runs away from the record
WPL 2025 : महिला प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे अंतिम सामन्यात विजेतेपदासाथी भिडणार आहेत. हा सामना 15 मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांनी सपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली गुणतालिकेत अव्वलस्थानावर असल्याने ती आधीच अंतिम फेरीत पोहोचली होती. यानंतर एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा 47 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला. यावेळी मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी जमेची बाजू ठरली आहे. त्यामुळेच यावेळी मुंबई इंडियन्सच्या एका फलंदाजाला मोठा इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे.
हेही वाचा : Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या मुलीने खेळली होळी; चाहत्यांनी ठरवलं ‘गुन्हेगार’, पत्नीलाही लावले बोल..
मुंबई इंडियन्सची अष्टपैलू खेळाडू नेट सीव्हर ब्रंट इतिहास रचणार का? याकडे चाहते लक्ष देऊन आहेत. ब्रंटने अंतिम सामन्यात केवळ 3 धावा जरी केल्या तर ती महिला प्रीमियर लीग इतिहासात 1 हजार धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनू शकेल. नेट सीव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीग मध्ये एकूण 28 सामने खेळले आहेत. या कालावधीत तिने 47.47 ची उत्कृष्ट सरासरी राखत एकूण 997 धावा केल्या आहेत. ब्रंटने डब्ल्यूपीएलमधील त्याच्या स्ट्राइक रेटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये तिचा स्ट्राइक रेट 143.24 राहिला आहे. या लीगमध्ये त्याने 8 अर्धशतके झळकावली आहेत. या स्पर्धेत आजवर 80 धावा तिची सर्वोच्च धावससंख्या ठरली आहे.
हेही वाचा : IPL 2025 : युझवेंद्र चहलचा अचानक मोठा निर्णय; आयपीएलनंतर ‘या’ विदेशी संघासाठी खेळताना दिसणार..
नेट सीव्हर ब्रंटने या महिला प्रीमियर लीग 2025 च्या या हंगामात आधीच विक्रम केला आहे. या हंगामात 400 धावा करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तिने आपला कीर्तिमान रचला आहे. तिने बेंगळुरूविरुद्ध शानदार फलंदाजी करत 35 चेंडूत 69 धावा चोपल्या आहेत. मात्र हा सामना मुंबईला गमवावा लागला होता. नेट सीव्हर ब्रंटच्या फॉर्मला बघता ती हा इतिहास नक्की रचणार अशी तिच्या चाहत्यांना विश्वास आहे.
आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सला दोन्ही वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सने पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा पराभूत करून विजेतेपद आपल्या नावावर केले होते. आता मात्र प्रश्न असा आहे की, दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीतील आपला इतिहास पुसून विजेतेपद आपल्या नावावर करेल का? हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीग चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोनदा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.