'This' is a big record on Yashasvi Jaiswal's radar! He will create history with 'this' performance in the Duleep Trophy
Duleep Trophy 2025 : बीसीसीआयची देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफी स्पर्धेला उद्या म्हणजेच २८ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. त्यात भारताचा आणि मुंबईचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालचे लक्ष एका मोठ्या विक्रमावर असणार आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये जयस्वाल पश्चिम विभागाकडून खेळताना दसणार आहे. शार्दुल ठाकूर या संघाचा कर्णधार आहे.
या स्पर्धेत ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड बी येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल खेळणार आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालला इतिहास रचण्याची संधी असून त्याने दुलीप ट्रॉफीच्या या हंगामात द्विशतक झळकावले तर तो या स्पर्धेत तीन द्विशतक झळकावणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत भारत ब आणि पश्चिम विभागाकडून चार दुलीप ट्रॉफी सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी सात डावात ५३६ धावा फटकावल्या आहेत. आता त्याचे लक्ष या मोठ्या विक्रमावर असणार यआहे. या स्पर्धेत एकूण ६ फलंदाजांनी दोन वेळा द्विशतक झळकावण्याची किमया केली आहे. ज्यामध्ये अरुण लाल, लालचंद राजपूत, दिनेश मोंगिया, युवराज सिंग, मनीष पांडे आणि जयस्वाल या खेळाडूंचा समावेश आहे.
अरुण लाल हा या स्पर्धेत अशी किमया करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याने १९८६ च्या स्पर्धेत पूर्व विभागाकडून २१४ आणि २८७ धावा केल्या होत्या. तसेच १९८७ च्या आवृत्तीत पश्चिम विभागाकडून मध्य विभागाविरुद्ध खेळताना लालचंद राजपूतने २७५ धावा करून या विशेष यादीत स्थान पटकावले होते. या खेळीपूर्वी, लालचंद राजपूतने १९८५ मध्ये उत्तर विभागाविरुद्ध २२१ धावांची खेळी साकारली होती.
तर दिनेश मोंगियाने २००१ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळताना दोन द्विशतके (२०१ आणि २०८) झळकवली होती. युवराज सिंगने २००२ आणि २०१२ मध्ये उत्तर विभागासाठी अनुक्रमे २०९ आणि २०८ धावा केल्या होत्या. कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडे २०११ मध्ये मध्य विभागाविरुद्ध खेळताना २१८ धावा आणि २०१३ मध्ये पश्चिम विभागाविरुद्ध २१३ धावा करून दोन वेळेस द्विशतक लगावले होते.
हेही वाचा : जेम्स अँडरसनच्या नावे इतिहासाची नवी नोंद! The Hundred 2025 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम
त्याच वेळी, भारतीय कसोटी संघाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने २०२२ मध्ये नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध २२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर, त्याने दक्षिण झोनविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ३२३ चेंडूत २६५ धावांची दमदार खेळी केली होती. जयस्वालची ही दोन द्विशतके २०२२ मध्येच आली आहेत. त्यामुळे आता त्याच्याकडे तिसरे द्विशतक लगावून इतिहास रचण्याची संधी आहे.