जेम्स अँडरसन(फोटो-सोशल मीडिया)
The Hundred 2025 : इंग्लंडचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने द हंड्रेडमध्ये ऐतिहास रचला आहे. जेम्स अँडरसनने द हंड्रेडमध्ये एक विकेट घेताच मोठी कामगिरी केली आहे. तो द हंड्रेडमध्ये विकेट घेणारा जगातील सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला आहे. जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये ७०४ आणि एकदिवसीय सामन्यात २६९ बळी घेऊन आपल्या कारकिर्दीला राम राम केला होता. तो इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील आहे.
लीड्समधील हेडिंग्ले येथे नॉर्दर्न सुपरचार्जर्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या द हंड्रेड २०२५ च्या ३० व्या लीग सामन्यामध्ये जेम्स अँडरसनने मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळताना दोन बळी टिपले. ६ ऑगस्ट २०२५ रोजी द हंड्रेडमध्ये पदार्पण करून अँडरसनने माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मायकेल होगनचा विक्रम मोडीत काढला आहे. २५ ऑगस्ट २०२२ रोजी द हंड्रेड पुरुष स्पर्धेत सदर्न ब्रेव्हकडून खेळताना विकेट घेतली तेव्हा होगन ४१ वर्षे आणि ८६ दिवसांचा होता.
हेही वाचा : CSK ला धक्का! ‘माझा वेळ आजपासून सुरू..’, स्टार फिरकी गोलंदाज R Ashwin कडून IPL ला गुडबाय!
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इमराने ताहिर द हंड्रेड पुरुष स्पर्धेत विकेट घेणारा सर्वात वयस्कर गोलंदाजाचा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी फिरकी गोलंदाजाने ४३ वर्षे आणि १४५ दिवसांच्या वयात विकेट घेतली आहे. २०२२ च्या हंगामात बर्मिंगहॅम फिनिक्सकडून खेळताना त्याने ही किमया केली होती.
जेम्स अँडरसनला द हंड्रेडमधील त्याच्या पहिल्या दोन सामन्यात विकेट घेण्यात अपयश आले होते. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अँडरसनने सहाव्या चेंडूवर डेव्हिड मलानलाची शिकार केली आणि आपले विकेट्सचे खाते उघडले. त्यानंतर, त्याने तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज डॅन लॉरेन्सला एलबीडब्ल्यू करून त्याची दुसरी विकेट मिळवली. त्याने ३० धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स चटकावल्या.
मँचेस्टर ओरिजनल्सने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली. या सामन्यात मँचेस्टर ओरिजनल्सने नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा दणदणीत पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना, ओरिजनल्सने नॉर्दर्न सुपरचार्जर्सला १०० चेंडूत १३९/८ धावांवर रोखण्यात यश आले. गोलंदाजांच्या टिच्चून केलेल्या माऱ्यापुढे सुपरचार्जर्सना मोठी धावसंख्या उभारण्यास यश आले नाही.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम
प्रतिउत्तरात मँचेस्टर ओरिजनल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरच्या वादळी खेळीच्या जोरावर केवळ ८४ चेंडूत १४० धावांचे लक्ष्य पार केले. बटलरने केवळ ३७ चेंडूत ७० धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याने रचिन रवींद्र (२३ चेंडूत नाबाद ४७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९९ धावांची महत्त्वाची भागीदारी रचून संघाचा विजय सोपा केला.