फोटो सौजन्य - istock
देशभरात सध्या ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वर्क फ्रॉम होम, शेअर बाजार, अनोळखी वेबसाईटवरून खरेदी करणे, यासांरख्या घटनांमुळे ऑनलाईन फसवणूक होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. सध्या अनेकजण ऑनलाईन नोकरीच्या शोधात असतात. वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन सगळ्यांसाठीच उत्तम पर्याय असतो. मात्र वर्क फ्रॉम होममुळे फसवणूक होण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेकदा सायबर चोरट्यांकडून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांना टार्गेट केले जाते. सायबर चोरट्यांकडून तरूणांची ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली तरूणाची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या एका तरूणाला वर्क फ्रॉम होमसाठी एक फोन आला. फोनवरील व्यक्तिने आपण प्रसिद्ध हॉटेल बुकिंग पोर्टलचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तरूणाला ‘वर्क फ्रॉम-होम हॉटेल रेटिंग’ या कामाची ऑफर दिली. ‘वर्क फ्रॉम-होम हॉटेल रेटिंग’ मध्ये घरी बसून हॉटेल्सला रेटिंग देण्याचे काम दिले जाईल, असे फोनवरील व्यक्तिने तरूणाला सांगितले. या कामाच्या बदल्यात त्याने तरूणाला मोठी रक्कम ऑफर केली. आकर्षक ऑफरमुळे तरूणाने या कामाला होकार दिला. फोनवरील व्यक्तिने तरूणाला एक लिंक पाठवली ज्यामध्ये त्याला ॲप डाउनलोड करण्यास सांगितले होते.
ॲप डाउनलोड केल्यानंतर तरूणाने त्यामध्ये स्वता:ची माहिती आणि बँक तपशील भरले. त्यानंतर काही दिवस तरूणाला त्याच्या कामाचे पैसे मिळत होते. मात्र नंतर या तरूणाला संबंधित व्यक्तिने वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगितले. असे तरूणाने एकूण २० लाख ५४ हजार संबंधित व्यक्तिला दिले. मात्र यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरूणाच्या लक्षात आले. या घटनेनंतर त्याने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सर्व माहिती देत तरूणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.