BSNLलाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन? (फोटो सौजन्य - BSNL X ACCOUNT)
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र BSNL कंपनीची चर्चा सुरु आहे. ग्राहकांची वाढती संख्या आणि कंपनीची वेगाने होत असेलली प्रगती यामुळे BSNL प्रचंड चर्चेत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत प्रचंड वाढ केली. या नंतर अनेक ग्राहक पुन्हा BSNL कडे वळले आणि कंपनीला अच्छे दिन आले. BSNL ग्राहकांच्या संख्येत कमी कालावधीच झपाट्याने वाढ झाली. ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे कंपनीने देखील आपलं नेटवर्क सुधारण्याचा निर्णय घेतला.
हेदेखील वाचा- BSNL बाबत पंतप्रधान मोदींनी घेतला होता महत्वाचा निर्णय! दूरसंचार मंत्र्यांचा खुलासा
नेटवर्क सुधारण्यासाठी कंपनीने TATA सोबत करार करत देशातील 1000 खेड्यापाड्यांमध्ये नेटवर्कची चाचणी सुरु केली. 4G नेटवर्कची प्रगती सुरु असतानाच कंपनीने घोषणा केली की, लवकरच 5G नेटवर्क देखील सुरु केलं जाणार आहे. यामुळे कंपनीची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र हे सर्व सुरु असतानाच आता एक पोस्ट सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटलं जात आहे की, BSNL आता 5G स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात संभ्रम होता.
कंपनी खरंच स्मार्टफोन लाँच करणार आहे का, ही पोस्ट खरी आहे का, BSNL च्या स्मार्टफोनचे डिटेल्स काय असतील, असे प्रश्न युजर्स सोशल मिडीयावर विचारत होते. आता युजर्सच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कंपनीने स्वत: चं त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने 5G स्मार्टफोन बाबतचे सत्य सांगितलं आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, BSNL लवकरच 200MP कॅमेरा असलेला BSNL 5G फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. BSNL आणि TATA मिळून हा फोन लाँच करणार आहेत. फोनमध्ये 200MP कॅमेरा, 7000mAh बॅटरी तसेच BSNL ची सुपरफास्ट 5G कनेक्टिव्हिटी असेल.
हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर BSNL देखील एक पोस्ट करत सांगितलं आहे की, खोट्या अफवांना बळी पडू नका आणि BSNL वेबसाइटवरून खऱ्या बातम्या जाणून घ्या. त्यामुळे BSNL ने केलेल्या या पोस्टनंतर स्पष्ट झालं आहे की, BSNL सध्या कोणताही स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत नाही.
दरम्यान, BSNL ने आता TATA सोबत 1000 गावांमध्ये 4G नेटवर्क सुरू करण्यासाठी करार केला आहे. यानुसार BSNL ने भारतातील 15 हजाराहून अधिक मोबाईल साइट्सवर 4G टॉवर स्थापित केले आहेत. BSNL ने आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत त्यांनी देशात 15000 नवीन 4G साइट्स तयार केल्या आहेत. एवढेच नाही तर, कंपनीने आता देशात 5G म्हणजेच BSNL 5G सेवेची चाचणी देखील सुरु केली आहे. BSNL या सक्रिय पावलांमधून देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. BSNL स्वस्त रिचार्ज प्लॅनचे आमिष दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.