२०१८ साली फ्लिपकार्टवर ऑर्डर केली चप्पल; ६ वर्षांनंतरही डिलीव्हरी नाही
फ्लिपकार्टवर एका व्यक्तिनं २०१८ साली चप्पल ऑर्डर केली होती. मात्र या चप्पलची डिलीव्हरी आलीच नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी त्या व्यक्तिला तब्बल ६ वर्षांनी कंपनीकडून फोन आला. संबंधित व्यक्तिनं त्याच्या ऑर्डरचा स्क्रिनशॉट सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
हल्ली सर्वजण ऑनलाईन शॉपिंग करतात. आपण ऑनलाईन एखाद्या वस्तूची ऑर्डर दिल्यास ती वस्तू डिलीवर होण्यासाठी जास्तीत जास्त १० ते १२ दिवसांचा वेळ लागतो. तसेच आपण एखादी वस्तू ऑर्डर केली, पण ती वस्तू आपल्याला नको असेल तर आपण ती ऑर्डर कॅन्सल करू शकतो. पण मुंबईतील एका रहिवाश्याने २०१८ साली फ्लिपकार्टवर एक चप्पल ऑर्डर केली होती. मात्र तब्बल ६ वर्षांनतरही त्याला या चप्पलची डिलीव्हरी मिळाली नाही. एवढंच नाही, तर या व्यक्तिला ही ऑर्डर कॅन्सल करण्याचं ऑप्शन देखील देण्यात आलं नाही. ऑर्डरबाबत विचारणा करण्यासाठी कंपनीने त्या व्यक्तिला तब्बल ६ वर्षांनी फोन केला आहे. याबाबत सध्या सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकजण मजेशीर कमेंट्स करत आहेत.
अहसान नावाच्या युजरने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फ्लिपकार्टवरील ऑर्डरचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यानुसार त्यानं २०१८ मध्ये एका चप्पलसाठी फ्लिपकार्टवर ऑर्डर दिली होती. या ऑर्डरसाठी त्यानं कॅश ऑन डिलीव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट केला होता. अहसाननं स्पार्क्स कंपनीच्या चपलेची ऑर्डर केली होती. ज्याची किंमत ४८५ रुपये आहे. गुरू जी एंटरप्रायझेस असं विक्रेत्याचं नाव. १६ मे २०१८ रोजी त्याने ऑर्डर केली आणि ती कन्फर्म झाली. १९ मे २०१८ रोजी त्याची ऑर्डर डिलीव्हरीसाठी पाठवली गेली. २० मे २०१८ रोजी डिलीव्हरी होईल असं सांगण्यात आलं. मात्र अद्याप या चप्पलची डिलीव्हरी मिळाली नाही.
पोस्टमध्ये त्यानं सांगितलं की, या ऑर्डरबाबत विचारणा करण्यासाठी फ्लिपकार्टने त्याला तब्बल ६ वर्षांनंतर फोन केला आहे. ऑर्डरबाबत काय प्रॉब्लेम आहे असं कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने त्याला फोनवर विचारलं. यावेळी अहसानने कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला सांगितलं की, ऑर्डर ६ वर्षांपूर्वी देण्यात आली होती आणि अद्याप या ऑर्डरची डिलीव्हरी आलेली नाही. यानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने त्याची माफी मागितली. अहसान ने केलेल्या या पोस्टवर अनेकांच्या मजेशीर कमेंट्स येत आहेत.
Web Title: Ordered slippers on flipkart in 2018 no delivery even after 6 years