औली मध्ये भेट देण्याची खास ठिकाणे
पावसाळा संपून आता हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्या कुटूंबासोबत, मित्रांसोबत फिरायला जायचा प्लॅन करतात. विशेषत: एखाद्या हिलस्टेशनला जाण्याचा सगळ्यांचा प्लॅन असतो. ऑफिसमधून सुट्टी घेऊन एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याची मजाच वेगळीअसते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत, जिथे निसर्ग, सौंदर्य, धार्मिक स्थळे आणि ट्रेकिंगची मजा घेता येईल.
औली हिल स्टेशन उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असून हिमालयाच्या थंड टेकड्यांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी, साहसवीर आणि धार्मिक प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. हिमालयाच्या थंड आणि बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये वसलेले औली, त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि शांत वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करते.
औलीमधील भेट देण्यासारखी ठिकाणे
औली बुग्याल– औलीमध्ये भेट देण्यासारखी अनेक खास ठिकाणे आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे औली बुग्याल, गढवाली भाषेत ‘गवताळ प्रदेश’, हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या आणि बर्फाच्छादित हिमालय पर्वतांनी वेढलेले आहे. हे ठिकाण थंड वाऱ्यांमध्ये पर्यटकांना मोहात पाडते. थंडीच्या दिवसांमध्ये येथे बर्फाच्छादित टेकड्या पाहायला मिळतात. येथे तुम्ही स्कीइंगचा अनुभव घेऊ शकता.
नंदा देवी राष्ट्रीय उद्यान
याशिवाय, औलीच्या जवळ असलेले नंदा देवी राष्ट्रीय उद्यान देखील भेट देण्यासारखे आहे. येथे विविध दुर्मिळ प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात, जसे की हिम बिबट्या, हिमालयन तहर, आणि रुबी थ्रोट यांसारखे प्राणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये सर्वाधिक उंचीवर असलेले हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे.
जोशीमठ– हे ठिकाण औलीपासून जवळ असलेले आणखी एक महत्वाचे ठिकाण आहे. धार्मिक महत्त्व असलेले नरसिंह मंदिर येथे स्थित आहे. हे ठिकाण पर्यटक आणि भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जोशीमठ केवळ धार्मिक स्थळांसाठीच प्रसिद्ध नाही दर या ठिकणी तुम्हा अनेक संदर दऱ्या पाहायला मिळतील.
औलीची आणखी एक खासियत म्हणजे येथून नंदा देवी, नागा पर्वत, हाथी पर्वत आणि गौरी पर्वत यांचे अप्रतिम दर्शन घेता येते. हिवाळ्यात, हे संपूर्ण क्षेत्र बर्फाने व्यापलेले असते, ज्यामुळे हे ठिकाण संपूर्ण भारतातील स्कीइंगसाठी एक प्रमुख केंद्र बनले आहे. ट्रेकिंगसाठी देखील औली एक उत्तम ठिकाण आहे, जे साहसाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात एक अद्वितीय अनुभव प्रदान करते.