यंदा भारतीय पर्यटनाला फटका; परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट
भारतात दरवर्षी दूरवरून लाखो विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र यंदा 2024 च्या या वर्षात भारतीय पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. देशाला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून 2024 या कालावधीत 47.8 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. ही संख्या कोविडच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत 9.8 टक्क्यांनी कमी आहे. 2019 मध्ये याच कालावधीत 52.96 लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. अशी माहिती पर्यटन मंत्रालयाने दिली आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक पर्यटक बांगलादेश आणि अमेरिकेतून आले आहेत. तथापि, जागतिक पर्यटन दिनानिमित्त शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कोविड-पूर्व महामारीच्या पातळीपेक्षा अजूनही मागे आहे. जून महिन्यातील आकडेवारीनुसार, 2024 च्या जूनमध्ये 7,06,045 परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली, जे 2023 च्या जूनमधील 6,48,008 पर्यटकांच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढले आहे, परंतु कोविडच्या आधी जून 2019 च्या तुलनेत ही संख्या अजूनही 2.8 टक्क्यांनी कमी आहे. या आकडेवारीवरून लक्षात येते की, कोव्हिडनंतर भारताच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.
संख्या कमी
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मधील पहिल्या सहामहिन्यात म्हणजे जानेवारी-जून कालावधीत 47,78,374 परदेशी पर्यटक आले होते. आकडेवारीनुसार, 21.55 टक्के पर्यटक बांगलादेशातून आले, तर 17.56 टक्के अमेरिकेतून आले आहेत. ब्रिटनमधून 9.82 टक्के, कॅनडातून 4.5 टक्के आणि ऑस्ट्रेलियातून 4.6 टक्के पर्यटकांनी भारताला भेट दिली आहे. इतर देशांमधून एकूण 46.6 टक्के पर्यटक भारतात आले आहेत.
पर्यटन या टक्केवारीवर राहिले
भारतात परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागे अनेक कारणे आहेत. भारताचे पर्यटन स्थळ महाग असल्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, कोविड महामारीमुळे झालेली अनिश्चितता आणि जागतिक पातळीवरील आर्थिक स्थितीमुळे अनेक देशातील नागरिकांनी पर्यटनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवले आहे.
तथापि, भारतातील पर्यटन क्षेत्राला पुन्हा एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून केली जात आहे. यासाठी सरकारकडून विविध पर्यटन धोरणे राबवण्यात येत आहेत. भविष्यात परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील. भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक विविधतेमुळे भविष्यात पर्यटन क्षेत्राला मोठी संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.