साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024 हा दक्षिण कोरियाच्या लेखक हान कांग यांना देण्यात आला आहे
वैद्यकीय क्षेत्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रानंतर आता साहित्य क्षेत्रातील वर्ष 2024 चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या प्रख्यात लेखिका हान कांग यांना प्रदान करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांच्या सखोल काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. हान कांग यांनी त्यांच्या लेखनात ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनातील नाजूकपणावर सखोल प्रकाश टाकला आहे.
मानवी आयुष्याच्या वेदना आणि संघर्षांचे प्रतिबिंबावर प्रकाश टाकला
दक्षिण कोरियाच्या हान कांग यांचे लेखन शरीर आणि आत्मा, तसेच जीवन आणि मृत्यू यांच्यातील नात्यांवर आधारित आहे. त्यांच्या काव्यात्मक आणि प्रयोगशील शैलीमुळे त्या समकालीन गद्य साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ठरल्या आहेत. हान कांग यांच्या साहित्यकृतींमध्ये इतिहासाचे आघात आणि मानवी आयुष्यावरील नियमांच्या अदृश्य संचाचा सामना या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या लेखनातून मानवी आयुष्याच्या वेदना आणि संघर्षांचे प्रतिबिंब प्रकट होते. त्यांच्या अनोख्या आणि प्रभावी दृष्टिकोनामुळे त्या आंतरराष्ट्रीय साहित्यिक जगतात एक महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकल्या आहेत.
BREAKING NEWS
The 2024 #NobelPrize in Literature is awarded to the South Korean author Han Kang “for her intense poetic prose that confronts historical traumas and exposes the fragility of human life.” pic.twitter.com/dAQiXnm11z— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2024
गेल्यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार
2023 मध्ये साहित्य क्षेत्रातील पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना देण्यात आला होता. हा सन्मान त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी देण्यात आला होता. तर 2022 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एरनॉक्स यांना देण्यात आला होता. त्यांना हा बहुमान त्यांच्या आत्मचरित्र आणि समाजाशास्त्रातील उल्लेखनीय लेखनाबद्दल देण्यात आला होता.
वर्ष 2024 चे इतर पारितोषिक
याआधी 2024 सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकही जाहीर करण्यात आला. डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर या वैज्ञानिकांना हा सन्मान देण्यात आला आहे. डेव्हिड बेकर यांना ‘कंप्युटेशनल प्रोटीन डिझाईन’ या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तर हसाबिस आणि जम्पर यांना ‘प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन’साठी हा पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय भौतिकक्षेत्रातील 2024 नोबेल पारितोषिक जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना देण्यात आले. त्यांना मशीन लर्निंगमधील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, वैद्यकशास्त्रासाठी अमेरिकन वैज्ञानिक व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना मान मिळाला आहे. शुक्रवारी शांतता नोबेल पारितोषिकाची घोषणा होणार असून, 14 ऑक्टोबरला अर्थशास्त्रासाठी नोबेल विजेत्यांची घोषणा केली जाईल