इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला
सीझरिया : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून अनेक विरोधी हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे विरोधी गटाकडून इस्त्रायल देशाला लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. असे असताना आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले आहे. याबाबतची माहिती तेथील पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : अमेरिकेत सरकारी नोकरशाहीत मोठ्या प्रमाणात कपात; देशाच्या विकासासाठी करणार मस्कच्या पद्धतीचा अवलंब
सध्या इराण-इस्त्रायल संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणी प्रमुख खामेनेई यांच्यावर टीका केली होती. इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इस्त्रायलपेक्षा आपल्या स्वत:च्या जनतेची भिती त्यांना वाटते अशी टीका त्यांनी खामेनेई सरकारवर केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
दरम्यान, जो बॉम्ब हल्ला झाला तो उत्तर इस्रायलच्या सीझरिया शहरात बागेत पडला. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यावेळी नेतन्याहू किंवा त्यांचे कुटुंबीय घरात उपस्थित नव्हते आणि यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असेही सांगण्यात आले.
‘सर्व मर्यादा ओलांडल्या’
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी या हल्ल्यानंतर X वरील एका पोस्टमध्ये या घटनेचा निषेध केला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात चिथावणीखोरांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे संरक्षणमंत्री इटामार बेन-गवीर यांनी ट्विटरवर सांगितले.
ऑक्टोबरमध्ये झाला होता ड्रोन हल्ला
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील घराच्या दिशेने ड्रोन सोडण्यात आले होते. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नव्हते. तसेच उत्तरेत, इस्रायली सैन्य ऑक्टोबर 2023 पासून लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशी युद्ध करत आहे. दरम्यान, शनिवारच्या घटनेची जबाबदारी सध्यातरी कोणीही घेतलेली नसल्याची माहिती दिली जात आहे.
इस्रायल ड्रोन हल्ले का थांबवू शकत नाही?
इस्रायलकडे ताशी 1,000 मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा आहे. परंतु, त्याच्या रडार प्रणालींना मानवरहित विमान (ज्यात ड्रोनचा समावेश आहे) शोधणे अधिक आव्हानात्मक वाटते, जे कधीकधी 100 mph पेक्षा कमी वेगाने प्रवास करतात.