Texas floods 2025 : अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या हिल कंट्री भागात भीषण पुरामुळे विनाशकारी स्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या काही तासांत महिनाभराचा पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आला आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. या नैसर्गिक संकटात २४ जणांचा मृत्यू झाला असून, उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या २० हून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. सध्या ९ बचाव पथके, १४ हेलिकॉप्टर आणि १२ ड्रोनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार
सेंट्रल टेक्सासमधील केर काउंटीमध्ये काही तासांतच १० इंच (२५ सेमी) पाऊस झाला. यामुळे ग्वाडालुपे नदीला प्रचंड पूर आला. अनेक घरे पाण्याखाली गेली, रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आणि शेकडो वाहने वाहून गेली. स्थानिक प्रशासनाने तत्काळ बचाव कार्य सुरू केले असून, २३७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, त्यातील १६७ जणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभरात चिंता! टोकारा बेटांवर भूकंपांचे सत्र कायम; जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील एक असुरक्षित देश
शिबिरात सहभागी मुली बेपत्ता
या महापुरात सर्वात गंभीर बाब म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिबिरात सहभागी होण्यासाठी आलेल्या २० हून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. टेक्सासचे लेफ्टनंट गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी सांगितले की, “या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. राज्यातील नागरिकांनी त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करावी.”
शेकडो लोक घरविहीन
पुरामुळे संपूर्ण टेक्सास हिल कंट्री भागात हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण आपल्या घरातून बाहेर पडण्यासही असमर्थ ठरले. काही ठिकाणी वीज, पाणी आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली आहे. प्रशासनाने काही शाळा आणि सामुदायिक केंद्रे तात्पुरत्या निवासासाठी खुली केली आहेत.
धक्कादायक अनुभव: एका मातेचा जीवघेणा संघर्ष
इंग्राम शहराजवळ बंबल बी हिल्स नदीकाठी राहणारी एरिन बर्गेस हिच्या घरात शुक्रवारच्या पहाटे ३:३० वाजता मुसळधार पावसामुळे अचानक पाणी शिरले. बर्गेसने सांगितले की, “मी आणि माझा मुलगा झाडाकडे पोहत गेलो आणि त्याला घट्ट धरून ठेवले. माझा प्रियकर आणि कुत्रा मात्र पाण्यात वाहून गेले.” तिचा १९ वर्षांचा मुलगा ६ फूट उंच असल्याने त्याला झाडाला धरून राहता आले आणि आम्ही वाचलो,” असे ती भावुक होत म्हणाली.
राज्य सरकार सज्ज, मदतीसाठी संघटनांचा प्रतिसाद
टेक्सास सरकार आणि स्थानिक प्रशासन बचावकार्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. ४०० हून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय रक्षक कार्यरत आहेत. बचाव कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, ड्रोन आणि बोटींनी पुरात अडकलेल्यांना शोधण्यात येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 57 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाला दौरा; मोदींच्या भेटीने भारत-दक्षिण अमेरिका संबंधांना नवे वळण
संकटाशी झुंज सुरूच
हा पूर टेक्साससाठी केवळ हवामानाचा नाही, तर मानवी जिवांचा मोठा आपत्तीकाल आहे. प्रशासन पूर्ण क्षमतेने बचावकार्य करत असून, बेपत्ता मुलींच्या शोधासाठी प्रयत्न अधिक गतीने सुरू आहेत. टेक्सासवासीयांनी यापूर्वी अनेक संकटांचा सामना केला आहे आणि या संकटातूनही ते धैर्याने बाहेर पडतील, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.