57 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाला दौरा; मोदींच्या भेटीने भारत-दक्षिण अमेरिका संबंधांना नवे वळण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
PM Modi Argentina visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्जेंटिनाचा दौरा ऐतिहासिक ठरत आहे. तब्बल ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचा द्विपक्षीय दौरा केला आहे. याआधी २०१८ मध्ये मोदींनी जी-२० शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनाला भेट दिली होती, मात्र ती बहुपक्षीय मंचावरची उपस्थिती होती. यावेळी हा दौरा पूर्णपणे द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आहे.
पंतप्रधान मोदी अर्जेंटिनामधील एझेझा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मोदी अर्जेंटिनाचे अध्यक्ष aजेवियर मायले यांची भेट घेणार आहेत. २०२४ मध्ये या दोघांमध्ये शेवटची भेट झाली होती. या बैठकीदरम्यान संरक्षण, कृषी, ऊर्जा, खाणकाम, अक्षय ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की या दौऱ्याचा मुख्य हेतू परस्परसहकार्याचा विस्तार करणे हा आहे.
भारत आणि अर्जेंटिनामध्ये सहकार्याची प्रचंड क्षमता आहे. अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील प्रमुख कृषी निर्यातदार देश असून, तेथून भारताला धान्य, तेलबिया आणि कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. यामुळे भारताच्या अन्न सुरक्षेला आधार मिळतो. तसेच, अर्जेंटिना लिथियम आणि अन्य दुर्मिळ खनिजांनी समृद्ध आहे. भारताचा इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी उत्पादन उद्योग वेगाने वाढत असून, त्यासाठी लिथियम अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जेंटिनासोबत दीर्घकालीन खनिज सहकार्य भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. वाका मुएर्टा शेल गॅस प्रकल्प हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. हा प्रकल्प भारतासाठी ऊर्जा सहकार्याचा दीर्घकालीन स्रोत ठरू शकतो. भारताने पुढाकार घेतलेली आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी (ISA) यामध्ये अर्जेंटिनाचा सक्रिय सहभाग आहे, ज्यामुळे दोन्ही देश हरित ऊर्जा आणि पर्यावरणीय सहकार्याच्या दिशेने एकत्र काम करू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभरात चिंता! टोकारा बेटांवर भूकंपांचे सत्र कायम; जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील एक असुरक्षित देश
अर्जेंटिनाच्या दौऱ्यापूर्वी मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले. याच दौऱ्यात भारत आणि त्रिनिदादमध्ये व्यापार, डिजिटल व्यवहार, आरोग्य, सागरी सहकार्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये ६ महत्त्वाचे करार झाले.
अर्जेंटिनानंतर, मोदी ब्राझीलमध्ये १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. येथे जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा होईल. त्यानंतर, पंतप्रधान नामिबियालाही भेट देणार असून, तिथे भारत-आफ्रिका संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सुखोई ‘SU-35’ लढाऊ विमानावर गंभीर आरोप; भारतासाठी महत्त्वाचा इशारा, इजिप्तनेही केला करार रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्जेंटिनाचा दौरा केवळ एक ऐतिहासिक पाऊल नाही, तर तो भारताच्या जागतिक धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दक्षिण अमेरिका खंडाशी भारताचे संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही भेट निर्णायक ठरू शकते. ऊर्जा, खनिज, कृषी आणि हरित विकास या क्षेत्रांमध्ये भारत-अर्जेंटिना भागीदारीचे भविष्यात मोठे परिणाम दिसून येणार आहेत.