china's population
बीजिंग: सैन्य आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर जगातील कमकुवत देशांवर दादागिरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या (China) राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना जोरदार धक्का बसलाय. चीनच्या लोकसंख्येत गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर घट नोंदवण्यात आली आहे. आधीच चीनमध्ये वयस्कर व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, तर दुसरीकडे जन्मदर मोठ्या प्रमाणात घटलाय. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकीच्या आकडेवारीनुसार २०२२ च्या अखेरपर्यंत लोकसंख्येत ८ लाख ५० हजारांनी घट (China’s Population Shrinks) नोंदवण्यात आलीय. या गणनेत हाँगकाँग, मकाओ, स्वशासी, तैवान यांची गणना करण्यात येत नाही. तसंच परदेशी नागरिकांनचीही गणना या चिनी लोकसंख्येत करण्यात येत नाही. केवळ चीनच्या मुख्य भूमीवर असलेल्या चिनी लोकसंख्येची गणनाच यात करण्यात येते. चीनची लोकसंख्या कमी होत असताना दुसरीकडे भारताची आणि त्यातही भारतातील तरुणांची लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळं लोकसंख्येचा विचार करता लवकरच चीन हा जगातील क्रमांक दोनचा देश ठरण्याची शक्यता आहे.
जन्म दरापेक्षा मृत्यूदर जास्त
चीनमध्ये २०२२ सालात १.०४१ कोटी जणांचा मृत्यू झाला. त्या तुलनेत ९५.६ लाख लोकांचा जन्म झालाय. चीनची लोकसंख्या सध्या १४११.७५ अब्ज इतकी झालीये. यात ७२.२०६ कोटी पुरुष तर ६८.९६९ कोटी महिलांचं प्रमाण आहे. चीन गेल्या अनेक वर्षआंपासून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश राहिलेला आहे. मात्र आता लवकरच तो क्रमांक भारताला मिळण्याची शक्यता आहे. १९६१ सालानंतर पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येत घट नोंदवण्यात आलीय. ही एक ऐतिहासिक घटना मानण्यात येतेय.
चीनची लोकसंख्या २०२२ साली सर्वोच्च पातळीवर
चीनची लोकसंख्या २०२२ च्या सुरुवातीला तिच्या सर्वोच्च पातळीवर होती. आता आगामी काळात ही लोकसंख्या कमी होत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी नागरिकांना सरकारकडून पैसे देण्यात येत आहेत. मात्र तरीही लोकसंख्येतील ही घट पाहता येत्या काळात लोकसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
स्वस्त मनुष्यबळ कमी होण्याचा धोका
जगभरात स्वस्त मनुष्यबळामुळे चीनने अनेक उद्योगांत मोठी प्रगती साधली आहे. स्वस्त मनुष्यबळाचे मूळ कारण हे जास्त लोकसंख्येत आहे. जगभरातील उद्योग त्यामुळे चीनमध्ये आहे. मात्र आता लोकसंख्या कमी झाल्याचा फटका चीनला आगामी काळात बसण्याची शक्यता आहे. सध्या जी काम करणारी लोकसंख्या आहे तीही आगामी काळात म्हातारी होत जाणार आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.