इस्रायलचे बेरूतमध्ये बॉम्ब हल्ले; 12 हून अधिक लोकांचा मृत्यू अनेकजण जखमी
बेरूत: सध्या इस्त्रायल हमास संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. नुकताच इस्त्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या दहशतवादी संघटनेच्या तळांवर पुन्हा एकदा हवाई हल्ले करून गंभीर नुकसान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 57 लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायलच्या हल्ल्यात बेरूतच्या दक्षिणेकडील भागात रफिक हरिरी विद्यापीठ रुग्णालयासमोरील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या प्राणघातक हल्ल्यामुळे लेबनॉनच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. मात्र रुग्णालयाला उद्देशून कोणताही हल्ला केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गाझा युद्धविराम चर्चा मोहिमेपूर्वी हल्ले
या हवाई हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हिजबुल्लाने इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देत मध्य इस्रायलमध्ये अनेक रॉकेट डागले, परंतु कोणतेही नुकसान झाले नसल्याचे इस्रायलने सांगितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांच्या गाझा युद्धविराम चर्चा मोहिमेपूर्वी हा हल्ला करण्यात आला. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. इस्त्रायली हवाई संरक्षण यंत्रणेने लेबनॉनकडून आलेली बहुतांश रॉकेट्स हवेतच नष्ट केली आहेत.
हमासला संपुष्टात आणण्याचे इस्त्रायलचा उद्देश
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझामधून इस्त्रायली नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक ठेवला जाणार नाही. दुसरीकडे, हमासने गाझामधील इस्रायली सैन्याची पूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेनंतरच ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली जाईल. असे स्पष्ट केले आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून सुमारे 1,200 लोकांचा जीव घेतला आणि 250 जणांना ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायलने हमासवर सातत्याने हल्ले सुरू ठेवले आहेत.
हे देखील वाचा- इस्रायलला हिजबुल्लाच्या बंकरमध्ये सापडला ‘गुप्त’ खजिना; इस्त्रायलचा मोठा दावा