१० वर्षांनंतर फ्लाइट MH370 चं गुढ उकलणार?; मलेशियन सरकारने शोध मोहिमेसाठी दिली परवानगी
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 8 मार्च 2014 रोजी मलेशियन एअरलाइन्सचं एक विमान (एमएच 370239) प्रवासी आणि क्रूसह बेपत्ता झालं होतं जे आजही सापडलेलं नाही. इतिहासातील ही एक रहस्यमय घटना मानली जाते. हे विमान नेमकं कुठे कोसळलं याचा तपास अद्याप लागलेला नाही. दरम्यान मलेशियाच्या सरकारने शुक्रवारी MH370 साठी नवीन शोध मोहीम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. 239 प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना हे विमान रडारवरून गायब झालं होतं. या विमानातील प्रवाशांचं नेमकं काय झालं, याचा आजपर्यंत शोध लागलेला नाही.
परिवहन मंत्री अँथनी यांनी माहिती देताना सांगितलं की, मलेशियाने सागरी अन्वेषण फर्म ओशन इन्फिनिटीच्या नवीन शोध मोहिमेला सहमती दर्शविली आहे. याच सागरी अन्वेषण फर्मने 2018 मध्ये शोध मोहीम राबवली होती, मात्र त्यांनाही अपयश आलं होतं. कंपनीच्या पहिल्या प्रयत्नांतून या विमानाचा ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वात तीन वर्षे शोध चालला होता. दरम्यान अँथनी म्हणाले की दक्षिण हिंद महासागरातील युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्सच्या अधिपत्याखाली असलेल्या नवीन 15,000 चौरस किलोमीटर (5,800 चौरस मैल) क्षेत्र ओशन इन्फिनिटीद्वारे स्कॉर्ड केले जाईल.
“ओशन इन्फिनिटीने शोध मोहिमेसाठी निश्चित केलेलं क्षेत्र तज्ज्ञ आणि संशोधकांनी केलेल्या नवीन माहिती आणि डेटा विश्लेषणावर आधारित आहे,” त्यामुळे शोध मोहिमेचा प्रस्ताव ठोस आहे आणि तो विचारात घेण्यास पात्र असल्याचं ते म्हणाले.सरकारने 13 डिसेंबर रोजी ओशन इन्फिनिटीच्या प्रस्तावाला “तत्त्वतः” सहमती दर्शवली, परिवहन मंत्रालयाने 2025 च्या सुरुवातीस अटींना अंतिम रूप देणे अपेक्षित आहे.”काँट्रॅक्ट पूर्ण झाल्यावर आणि दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केल्यानंतर नवीन शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नेमून दिलेल्या पाण्यात शोध घेण्याची योग्य वेळ जानेवारी ते एप्रिल दरम्यान आहे. त्यामुळे सरकार शक्य तितक्या लवकर कराराला अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे विमान नेमकं कुठे कोसळलं याचा तपास लावल्याचा दावा आता रिचर्ड गोडफ्रे या ब्रिटिश वैमानिक अभियंत्याने 2021 मध्ये केला होता. ते वर्षभरापासून या प्रकरणाचा अभ्यास करत होते. बोईंग 777 विमान पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थपासून सुमारे 2,000 किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.यापूर्वी इमरसॅट सॅटेलाईट डेटा, बोईंग कामगिरीची माहिती, समुद्रात आढळलेल्या ढिगाऱ्याचा ओशिएनोग्राफिक डेटा आणि WSPR नेट डेटा याचा एकत्रित अभ्यास केला नव्हता, असा दावा त्यांनी केला होता.
गोडफ्रे यांच्या अंदाजानुसार, हे विमान 40 नॉटिकल मैलांच्या परिघात असू शकतं. कोसळलेल्या विमानाचा ढिगारा एकतर समुद्रातील खोलवर कुठे असावा किंवा एखाद्या खडकाच्या मागे कुठेतरी असावा, विमानाचा ढिगारा समुद्रात चार हजार मीटर खोलवरही असू शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं.