वॉशिंग्टन : टायटॅनिक (Titanic Ship) जहाज दुर्घटना 1912 मध्ये घडली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत या अपघाताचे रहस्य अजूनही कोणालाच समजले नाही. त्यामुळे या रहस्यमयी गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी एक पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र, अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे. यातील लोकांचा बचावकार्यापूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा रविवारपासून संपर्क तुटला आहे. काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक असल्याचे म्हटले जात होते. पण आता याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जेव्हा ही पाणबुडी बुडाली तेव्हा त्यामध्ये 96 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा होता. पण ही पाणबुडी बुडाल्यानंतर काही वेळातच गायब झाली आणि तेव्हापासून तिची ऑक्सिजन पातळी सतत कमी होत होती. पण यातील सर्वांचा मृत्यू हा आधीच झाला आहे. पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू विषारी कार्बन डायऑक्साइडमुळे झाला असावा, असा दावा निवृत्त चालक रे सिंक्लेअर यांनी केला आहे.
पाणबुडी शोधण्यासाठी वेळ कमी
पाणबुडी शोधण्यासाठी खूप कमी वेळ आहे. त्यामुळे शोधमोहिम अत्यंत वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या पाणबुडीचा शोध घेण्यात येत आहे.