Pakistan-Taliban Clashes:
Pakistan- Taliban Clashes: गेल्या काही महिन्यात भारताप्रमाणे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भीषण संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हवाई हल्ले केल्यापासून या संघर्षाला सुरूवात झाली. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तहरीक- ए- तालिबान पाकिस्तानचा म्हणजेच TTPचा प्रमुख नूर वली मेहसूद मारला गेल्याचा दावा केला. पण नूर वली मेहसूदने आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा व्हिडिओ जारी करून पाकिस्तानचे दावे फेटाळून लावले. त्यामुळे पाकिस्तानचा माज उतरवणार नूर वली मेहसूद कोण आहे. ज्याला मारण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले, बॉम्बस्फोट केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
नूर वली मेहसूद हा पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि सुरक्षा संस्थांची डोकेदुखी ठरला आहे. नूर मेहसूद हा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा सध्याचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कार्यरत असलेली ही दहशतवादी संघटना पाकिस्तानसाठीही मोठी डोकेदुखी बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूर वली मेहसूद यांचे पूर्ण नाव मुफ्ती नूर वली मेहसूद आहे. नूर मेहसूद पाकिस्तानच्या दक्षिण वझिरिस्तान भागातील मेहसूद जमातीतील आहेत. मेहसूद ही आदिवासी जमात पाकिस्तानच्या आदीवासी भागात अनेक वर्षे प्रभावशाली होती. मूर मेहसूदचा जन्म १९७८ मध्ये झाला. त्यांनी अफगाणिस्तानातच धार्मिक शिक्षण घेतले.नंतर त्यांनी हळहूळू धर्माच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आणि धर्मगुरू म्हणून त्यांन नवी ओळख मिळाली. कालांतराने, ते कट्टरपंथी बनले आणि अफगाण तालिबानकडून प्रेरणा घेऊन त्यांनी शस्त्रे हाती घेतली. हळूहळू तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) मध्ये ते उच्च पदांवर पोहोचले.
२००७ मध्ये बैतुल्लाह मेहसूद यांनी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर, हकीमुल्लाह मेहसूद यांनी कमांड घेतली आणि त्यानंतर, २०१८ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात हकीमुल्लाहचा उत्तराधिकारी मौलाना फजलुल्लाह यांच्या मृत्यूनंतर, नूर वली मेहसूद यांना नवीन नेता म्हणून नियुक्त करण्यात आले. तोपर्यंत संघटना कमकुवत झाली होती, परंतु नूर वलीने नवीन रणनीती आणि संघटनात्मक रचनेसह टीटीपीचे पुनरुज्जीवन केले. त्याने स्थानिक आदिवासी भागात आपले नेटवर्क पुन्हा मजबूत केले आणि पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे हल्ले करण्याची योजना आखली.
नूर वली मेहसूद यांच्या नेतृत्वाखाली टीटीपीने पूर्वीप्रमाणे अंदाधुंद हिंसाचार करण्याऐवजी एक ठराविक लक्ष्य ठरवून हल्ल्यांचे धोरण स्वीकारले. त्याने विशेषतः पाकिस्तानी सैन्य, पोलिस आणि गुप्तचर संस्थांना लक्ष्य केले. नूर वलीने आदिवासी राजवटीच्या जुन्या परंपरांना आधार दिला आणि लोकांमध्ये असा प्रचार पसरवला की पाकिस्तानी सरकारने पश्तून भागातील हक्क हिरावून घेतले आहेत. ही चाल यशस्वी झाली आणि त्याने मोठ्या संख्येने तरुणांना आपल्या बाजूने आकर्षित केले. नूरने असेही म्हटले की त्यांची संघटना पाकिस्तानमध्ये “इस्लामिक कायदा” लागू करण्यासाठी लढत आहे. हीच खोटी घोषणा अफगाण तालिबान पूर्वी वापरत असे.
२०२१ मध्ये जेव्हा अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि तालिबानने सत्ता हाती घेतली तेव्हा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला पुन्हा ताकद मिळाली. नूर वली मेहसूदच्या लढाऊंना अफगाणिस्तानातील कंधार, कुनार आणि नांगरहार सारख्या भागात सुरक्षित आश्रयस्थान मिळू लागले. पाकिस्तानने वारंवार अफगाण तालिबानकडे टीटीपी त्यांच्या देशात हल्ले करत असल्याबद्दल तक्रार केली, परंतु काबूल सरकारने वारंवार जबाबदारी टाळली. परिणामी, २०२२ ते २०२५ दरम्यान पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले लक्षणीयरीत्या वाढले. विशेषतः, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये पोलिस स्टेशन, लष्करी काफिले आणि सीमा चौक्यांवर हल्ले वारंवार झाले.
नूर वली मेहसूदच्या नेतृत्वाखाली, टीटीपी आता एक संघटित गनिमी सैन्य बनले आहे. त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या दहशतवादी गटांना त्यांच्या छत्राखाली एकत्र केले आहे. पाकिस्तानी सैन्य टीटीपीच्या ठिकाणांवर वारंवार हवाई आणि जमिनीवर हल्ले करत आहे. पण त्यातूनही नूर वली प्रत्येक वेळी स्वत:चा बाचाव कऱण्यात यशस्वी होत आहे. टीटीपी कमांडर त्याला “अमीर-ए-मुजाहिदीन” म्हणून संबोधतात, त्यामुळे त्याचा प्रभाव आणि प्रभाव दिसू लागला आहे.
२०१९ मध्ये अमेरिकेने नूर वली मेहसूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्याच्या डोक्यावर बक्षीस जाहीर केले. त्याचप्रमाणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही त्याला अल-कायदाशी संबंधित दहशतवादी असल्याचे संबोधले आहे. असे असतानाही मेहसूद अजूनही उघडपणे व्हिडिओ शेअर करत आहे, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला आव्हान देत आहे, तसेच आपल्या सैनिकांना अफगाण सीमेपलीकडे हल्ले करण्यासाठी पाठवत असल्याचे अहवालात नमूद आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.