Project Pelican ISI-Khalistani plot against India exposed
Project Pelican : भारताविरोधात रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करताना कॅनडातील पील प्रादेशिक पोलिसांनी “प्रोजेक्ट पेलिकन” अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक भव्य ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्क उघडकीस आले असून, त्याचे संपर्क खलिस्तानी समर्थक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि मेक्सिकन ड्रग्ज कार्टेल यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या नेटवर्कमधून ड्रग्ज विक्रीतून मिळालेले पैसे भारताविरोधी कारवायांमध्ये वापरले जात असल्याचेही उघड झाले आहे.
या तपासाची सुरुवात जून २०२४ मध्ये झाली होती. संशयित टोळी व्यावसायिक ट्रकिंग मार्गांचा वापर करून अमेरिका ते कॅनडा कोकेनची तस्करी करत होती. नोव्हेंबर २०२४ पर्यंत या टोळीतील ट्रक कंपन्या, गोदामे आणि संशयित व्यक्तींची ओळख पटली होती. कॅनडाच्या CBSA (Canada Border Services Agency) आणि अमेरिकेच्या DEA (Drug Enforcement Administration) यांच्या सहकार्याने ही कारवाई व्यापक स्वरूपात पार पडली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीच्या गाभ्यातून बाहेर येत आहेत मौल्यवान धातू; ज्वालामुखीच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना सापडले आश्चर्यकारक पुरावे
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी छापे टाकून ४७९ किलो ब्रिक्ड कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य जवळपास $४७.९ दशलक्ष (४०० कोटी रुपये) आहे.
प्रमुख जप्त्या पुढीलप्रमाणे:
१२७ किलो कोकेन विंडसरमधील Ambassador Bridge येथे
५० किलो कोकेन पॉइंट एडवर्डमधील Blue Water Bridge येथे
तसेच, ग्रेटर टोरंटो एरियामधील इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जप्ती
याशिवाय, दोन बेकायदेशीर सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलं देखील जप्त करण्यात आली आहेत.
पील पोलिसांनी या प्रकरणात ९ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७ जण भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:
1. सज्जित योगेंद्रराजा (३१, टोरंटो)
2. मनप्रीत सिंग (४४, ब्रॅम्प्टन)
3. फिलिप टेप (३९, हॅमिल्टन)
4. अरविंदर पवार (२९, ब्रॅम्प्टन)
5. करमजित सिंग (३६, कॅल्डन)
6. गुरतेज सिंग (३६, कॅल्डन)
7. सरताज सिंग (२७, केंब्रिज)
8. शिव ओंकार सिंग (३१, जॉर्जटाउन)
9. हाओ टॉमी हू (२७, मिसिसॉगा)
या सर्वांविरुद्ध ड्रग्ज तस्करी, शस्त्रास्त्र कायद्यातील उल्लंघन आदी ३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ब्रॅम्प्टनमधील ओंटारियो कोर्ट ऑफ जस्टिस येथे त्यांच्यावर सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, या नेटवर्कला पाकिस्तानच्या ISI कडून समर्थन मिळत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. ISI ने खलिस्तानी समर्थकांचा वापर करून कोकेन तस्करीची साखळी निर्माण केली होती. एवढेच नाही तर, अफगाणिस्तानातून येणारे हेरॉइनही ISI कडून पसरवले जात होते, आणि यातून मिळालेली रक्कम भारताविरोधातील निदर्शने, जनमत चाचण्या, शस्त्रास्त्र खरेदी आणि खलिस्तानी चळवळीच्या प्रचारासाठी वापरली जात होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू जल करारानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी; हिंदू कुश हिमालयातील 75% हिमनद्या धोक्यात
डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय राज्यात १,००० पौंड कोकेनसह दोन भारतीय वंशीय कॅनेडियन नागरिक अटक करण्यात आली होती. त्याच प्रकरणातून पुढे ‘प्रोजेक्ट पेलिकन’ चा उगम झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ओंटारियोचे सॉलिसिटर जनरल मायकेल एस. केर्झनर यांनी या कारवाईचं कौतुक करताना म्हटलं, “प्रोजेक्ट पेलिकन हे दाखवून देतो की पोलिसांना योग्य संसाधनं दिल्यास ते समाजाच्या सुरक्षेसाठी किती निर्णायक भूमिका बजावू शकतात.”
‘प्रोजेक्ट पेलिकन’ ही केवळ ड्रग्ज तस्करीविरोधातली कारवाई नसून, ती भारताच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका घातक आंतरराष्ट्रीय कटाला उघड करणारी ठरली आहे. या प्रकरणामुळे खलिस्तानी चळवळीमागे असलेला ISIचा हात पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. तसेच, भारताविरुद्ध सुरू असलेल्या छुप्या युद्धाच्या पद्धती, त्यामागची आर्थिक यंत्रणा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांची झलकही समोर आली आहे.