russian drones reach polish border poland recalls world war history us nato await evidence
रशियाने पोलंडच्या सीमेवर १९ ड्रोन डागले, त्यापैकी ४ पोलंडने पाडल्याचा दावा.
हा हल्ला नाटोच्या सुरक्षेच्या नियमांशी थेट संबंधित असून तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चेला सुरुवात.
दुसऱ्या महायुद्धासारखा इतिहास पुन्हा उभा राहण्याची भीती, अमेरिकेची आणि नाटोची प्रतिक्रिया निर्णायक ठरणार.
Russian drones Polish border : युक्रेनशी सुरू असलेल्या रशियाच्या युद्धाने आता अधिक धोकादायक वळण घेतले आहे. नुकताच पोलंडच्या सीमेजवळ १९ रशियन ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चार ड्रोन पाडल्याचा दावा पोलंडच्या सैन्याने केला. मात्र उर्वरित ड्रोनच्या हालचालींनी संपूर्ण युरोप हादरला आहे. पोलंड हा नाटोचा सदस्य देश असल्याने या घटनेला थेट जागतिक युद्धाशी जोडले जात आहे.
पोलंडच्या सैन्याने सांगितले की रशियन सैन्याने सीमेजवळ १९ ड्रोन डागले. त्यांचा उद्देश नेमका काय होता, हे अजून स्पष्ट झालेले नाही. काही सूत्रांनुसार हे ड्रोन कीवकडे जाणार होते, मात्र ते पोलंडच्या हद्दीत घुसले. यामुळे पोलंडने तातडीने F-35 लढाऊ विमानांचा वापर करून चार ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
१९३९ साली जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्यामुळे दुसरे महायुद्ध पेटले होते. आज जवळपास त्याच पार्श्वभूमीवर रशिया पोलंडला लक्ष्य करतोय, ही मोठी शंका आणि भीती जगासमोर उभी राहिली आहे. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड डस्क यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या हल्ल्याचा संबंध जागतिक युद्धाशी आहे.” त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा पुन्हा जोमात आहे.
या हल्ल्यानंतर पोलंड सरकारने अमेरिका आणि नाटोशी तातडीने संपर्क साधला. मात्र दोघांनीही ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी फक्त एवढेच म्हटले की, “सर्व माहिती आमच्या माहितीत आहे.” नाटोही पुरावे आणि अवशेषांची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
नाटो ही ३२ देशांची लष्करी संघटना आहे, ज्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारखी महत्त्वाची राष्ट्रे आहेत. नाटोच्या कलम-४नुसार, एखाद्या सदस्य देशावर हल्ला झाल्यास सर्व मित्रराष्ट्रांना त्याची माहिती द्यावी लागते. तर कलम-५ म्हणते की, “एका देशावर हल्ला म्हणजे सर्व देशांवर हल्ला.” त्यामुळे पोलंडवरचा रशियन हल्ला सिद्ध झाल्यास, तो थेट संपूर्ण नाटोवर हल्ला मानला जाईल आणि सर्व देश रशियाविरुद्ध एकत्र उभे राहतील. हीच भीती तिसऱ्या महायुद्धाची सावली आणखी गडद करतेय.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
रशियाने अद्याप या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पोलंडकडून आलेले दावे आणि त्यावरच्या ऐतिहासिक आठवणींनी परिस्थिती गंभीर केली आहे. जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या युरोपीय देशांनी आधीच रशियाविरोधात कडक आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अशा वेळी अमेरिकेची पुढील भूमिका काय असणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या घडीला प्रश्न असा आहे की हा हल्ला खरंच रशियाकडून मुद्दाम झाला की तो तांत्रिक चूक होती? मात्र इतिहास साक्ष देतोय की पोलंडवरील हल्ल्यानेच जागतिक युद्ध पेटले होते. आणि यावेळीही परिस्थिती तशीच घडतेय, याची भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.