'उत्कटतेच्या ज्वाला...' 'या' नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नेपाळमध्ये विद्यार्थ्याचे प्रभावी भाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर विद्यार्थ्याने केली थेट टीका
सोशल मीडिया बंदी आणि तरुणांच्या चळवळीमुळे पंतप्रधान ओली यांना द्यावा लागला राजीनामा
नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांनी देशातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळातील एका शालेय विद्यार्थ्याचे इंग्रजीतील भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या भाषणात विद्यार्थ्याने सरकारच्या निष्क्रियतेवर आणि भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार केला आहे. तरुणाईच्या हृदयातील अस्वस्थता, संताप आणि बदलाची आस या भाषणातून स्पष्टपणे जाणवते.
नेपाळमध्ये “जनरल जी” चळवळीमुळे देशात राजकीय वादळ उसळले. सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह तब्बल २६ सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यानंतर लोकांचा संताप उफाळून आला. ही कारवाई तरुणांच्या अभिव्यक्तीवर गदा आणणारी असल्याने देशभर निदर्शने सुरू झाली. या संघर्षात किमान १९ तरुणांना जीव गमवावा लागला. वाढता विरोध, भ्रष्टाचार आणि अस्थिरतेमुळे अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
credit : social media and Instagram @rupeetoday
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होली बेल शाळेचे मुख्याध्यापक अभिषेकर राऊत यांनी आपल्या वार्षिक कार्यक्रमात दिलेले भाषण पुन्हा चर्चेत आले. दोन मिनिटांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये राऊत यांनी थेट प्रश्न विचारला की “नेपाळने आपल्याला जन्म दिला, वाढवले, पण त्याने बदल्यात काय मागितले? फक्त प्रामाणिकपणा, कष्ट आणि समर्पण. आपण ते देत आहोत का?” त्यांनी स्पष्ट केले की आजची तरुणाई बेरोजगारीच्या साखळ्यांत अडकलेली आहे आणि राजकीय पक्ष देशाला स्वार्थी खेळाचे मैदान बनवत आहेत. त्यांच्या शब्दांत होती ती अस्वस्थतेची ज्वाला, जी प्रत्येक तरुणाच्या मनात धगधगत आहे.
विद्यार्थ्याने भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले “आज मी येथे उभा आहे एका नव्या नेपाळाचे स्वप्न घेऊन. माझ्या आत आशा आणि उत्कटतेची आग पेटलेली आहे, पण हे स्वप्न हाताबाहेर जात असल्याने माझे हृदय जड झाले आहे.” त्यांच्या शब्दांनी तरुणांना आपल्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडले. त्यांनी प्रश्न केला “जर आपण आवाज उठवला नाही तर कोण उठवेल? आपण अन्याय पुसून टाकणारे वादळ आहोत, आपण अंधाराला राख करणारी आग आहोत.”
या भाषणाने सोशल मीडियावर नवा वेग दिला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आणि स्वच्छ राजकारणाच्या मागणीसाठी लाखो लोक या भाषणाचा उल्लेख करत आहेत. नेपाळमधील परिस्थिती जरी गंभीर असली, तरी या तरुणाईच्या आवाजामुळे आशेचा नवा किरण दिसतो आहे.
credit : social media and Instagram @mohaneyy_
नेपाळ सध्या एका वळणावर उभा आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरता यामुळे देशातील जनतेचे जीवन कठीण झाले आहे. मात्र, या विद्यार्थ्याच्या भाषणाने सिद्ध केले आहे की तरुणाईत अजूनही नवी उर्जा आणि दिशा देण्याची ताकद आहे. एक नवा नेपाळ घडवण्याची सुरुवात आता शाळेतील व्यासपीठावरून झाली आहे.