shahbaz in doha pakistan qatar relations announcement
शाहबाज शरीफ दोहा भेट
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
प्रादेशिक तणाव वाढता
Stop Israeli Aggression : मध्यपूर्वेतील तणावाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तातडीने कतारला भेट देण्यासाठी पोहोचले. विमानतळावर कतारच्या उपपंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. ही भेट फक्त औपचारिक नव्हती, तर या प्रसंगी पाकिस्तानने कतारच्या सार्वभौमत्वासाठी आपली ठाम भूमिका मांडली.
शाहबाज शरीफ यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तान या कठीण काळात कतारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी गाझा आणि दोहामध्ये वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोहाच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि इस्रायलच्या कारवाईमुळे प्रादेशिक शांततेचे प्रयत्न धोक्यात आल्याचे म्हटले.
शाहबाज शरीफ यांनी इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबद्दल तीव्र सहानुभूती व्यक्त केली. “९ सप्टेंबर रोजी कतारच्या राजधानीवर झालेला हा हल्ला फक्त कतारसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रदेशासाठी धोक्याची घंटा आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सामाजिक माध्यम एक्स (माजी ट्विटर) वरही याबाबत लिहित, “या क्रूर हल्ल्यानंतर मी माझे प्रिय भाऊ अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी आणि कतारच्या लोकांप्रती पाकिस्तानची अटळ एकता व्यक्त करण्यासाठी येथे आलो आहे,” असे नमूद केले. फक्त पाकिस्तानच नाही, तर संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी देखील दोहा येथे येऊन कतारशी एकात्मता दाखवली. या दोन्ही भेटींमुळे कतारच्या पाठीशी मुस्लिम देशांचा मजबूत पाठिंबा दिसून आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र
जगभरातील अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी याला सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन म्हटले. सौदी अरेबिया, तुर्की, इराण, जॉर्डन यांसारख्या देशांनीदेखील कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. पोप लिओ तेराव्यांनीही चिंता व्यक्त करत परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी या हल्ल्याला “भ्याड कृत्य” संबोधले आणि गाझामधील ओलिसांच्या सुटकेची आशा संपुष्टात आल्याचे सांगितले.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यांनी याची तुलना ११ सप्टेंबरच्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने उचललेल्या पावलांशी केली. इस्रायलचा आरोप आहे की कतार हमास नेत्यांना आश्रय देतो आणि त्यांना आर्थिक मदत पुरवतो. हाच त्यामागचा मुख्य कारण असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम
या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील समीकरणे आणखी गुंतागुंतीची होऊ लागली आहेत. कतारवर झालेला हल्ला हा केवळ एका देशावरील कारवाई नसून, प्रादेशिक एकतेवर आणि मध्यस्थीच्या प्रयत्नांवर थेट प्रहार असल्याचे मानले जाते. पाकिस्तानसारखा देश थेट पाठीशी उभा राहिल्याने कतारच्या राजनैतिक ताकदीला अधिक बळ मिळाले आहे. या साऱ्या घडामोडींनी मध्यपूर्व पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का, असा प्रश्न जागतिक पातळीवर उपस्थित झाला आहे. गाझा, दोहा आणि त्याचबरोबर इतर शेजारील प्रदेशांतील स्थैर्य हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील पुढील निर्णायक मुद्दा ठरणार आहे.