
अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू
वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना घडली. यात दोन नॅशनल गार्ड सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी गोळीबाराच्या या घटनेत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
व्हाईट हाऊसपासून फक्त दोन ब्लॉक अंतरावर असलेल्या १७ व्या स्ट्रीट आणि एच स्ट्रीटजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर, पोलिस दल, अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. यूएस सीक्रेट सर्व्हिस, एटीएफ आणि नॅशनल गार्डच्या जवानांनी परिसराला वेढा घातला. नॅशनल मॉलवर एक हेलिकॉप्टरही उतरले. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर लिहिले की, ‘नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांवर गोळीबार झाला. यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला. यामध्ये हल्लेखोरही गंभीर जखमी झाला आहे. अशाप्रकारचे हल्ले करणाऱ्यांना त्यांनी इशारा देत म्हटले की, ‘काहीही झाले तरी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल’.
हेदेखील वाचा : सरकार क्रिप्टो जप्त करू शकते? अमेरिकेने केले रू. 1.17 Trillion किमतीचे बिटकॉईन जप्त, जाणून घ्या धक्कादायक तपशील
दरम्यान, वॉशिंग्टन, डी.सी. येथील व्हाईट हाऊसजवळ दोन सैनिकांवर झालेल्या गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानीत ५०० अतिरिक्त राष्ट्रीय रक्षक सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिली.
गोळीबारानंतर प्रकृती गंभीर
हेगसेथ म्हणाले की, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन सैनिकांना गोळ्या लागल्या. यात त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, नंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या हल्ल्याचे जाणीवपूर्वक केलेले आणि भ्याड कृत्य असल्याचे वर्णन केले. आता या घटनेची पोलिसांसह तेथील सुरक्षा यंत्रणांकडून गंभीर दखल घेतली जात असून, तपासही त्या दृष्टीने सुरु आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प होते शहराबाहेर
घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेस्ट पाम बीच येथील त्यांच्या गोल्फ कोर्सवर होते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, व्हाईट हाऊस या घटनेवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : इराणविरोधी मोठा दहशवादी कट? अझरबैझानमधून धोकादायक शस्त्रांच्या तस्करी जाळं उघड; IRGC चा खुलासा