

गैरप्रकार उघड करणाऱ्यांना मिळणार मोठे बक्षीस
AI स्मार्ट ,चष्मे आणि छुप्या कॅमेऱ्याचा वापर
१० वर्षांची परीक्षाबंदी; १९ जानेवारीपर्यंत तक्रारींची संधी
World News : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात दक्षिण कोरियाने मोठी मोहीम उघडली आहे. महाविद्यालय प्रवेश परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी सरकारने तब्बल ५० कोटी कोरियन वॉन म्हणजेच सुमारे ३.७१ लाख अमेरिकी डॉलरपर्यंत रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. AI च्या मदतीने फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिण कोरियाच्या भ्रष्टाचारविरोधी आणि नागरी हक्क आयोगाने ही बक्षीस योजना जाहीर केली आहे. परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकरण सिद्ध झाल्यास माहिती देणाऱ्याला १० कोटी कोरियन वॉनपर्यंत बक्षीस मिळू शकते.
अशा प्रकारे जास्तीत जास्त पाच प्रकरणांची माहिती दिल्यास एकूण ५० कोटी वॉनपर्यंत रक्कम मिळण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन आपली चूक कबूल केली आणि इतर साथीदारांची माहिती दिली, तरी त्याला बक्षीस मिळू शकते. मात्र, स्वतःच्या चुकीबद्दल त्याला शिक्षेत सवलत दिली जाऊ शकते.
दक्षिण कोरियामध्ये महाविद्यालय प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, अलीकडेच एका राष्ट्रीय कर लेखापाल परीक्षेतील अव्वल क्रमांक मिळवलेल्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि जनरेटिव्ह AI च्या मदतीने कॉपी केल्याची कबुली दिली होती.
त्याने सूक्ष्म कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रश्नांचे फोटो काढून स्मार्टफोनवर पाठवले आणि AI च्या मदतीने उत्तरे मिळवल्याचे सांगितले. या घटनेनंतर देशात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे आता स्मार्ट चष्मे, छुपे कॅमेरे आणि वायरलेस इअरफोन यांसारख्या उपकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोषी आढळणाऱ्या उमेदवारांना पुढील १० वर्षे परीक्षा देण्यास बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय गैरप्रकार उघड करण्यासाठी नागरिकांना १९ जानेवारीपर्यंत तक्रारी नोंदवता येणार आहेत.
या मोहिमेचा उद्देश परीक्षेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेवर आधारित स्पर्धा कायम ठेवणे हा आहे. दरम्यान, AI तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी फायदेशीर ठरत असला तरी त्याचा गैरवापर करून मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय करणारे ठरू शकते. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या या निर्णयाकडे जगभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.