फोटो सौजन्य सोशल मीडिया
हिवाळी अधिवेशनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विधिमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही वाहने वापरली जाणार आहेत. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद आणि विविध विभागप्रमुखांना पत्र पाठवले आहे.
नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील महापालिका, नगरपालिका तसेच शासकीय कार्यालयांकडून वाहने उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून वाहन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार असून, ५ डिसेंबरपर्यंत सर्व वाहने नागपुरात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनासोबत शासकीय चालक देणे बंधनकारक आहे. चालक उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था संबंधित विभागाला करावी लागणार आहे.
Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम
अधिवेशनाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही मोठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे. अधिग्रहित करण्यात येणाऱ्या १,०५० वाहनांव्यतिरिक्त पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे २,२०० वाहने तैनात राहणार आहेत. यामध्ये नागपूर शहर पोलिसांची जवळपास १,२०० वाहने असून, अन्य जिल्ह्यांतून ९०० हून अधिक वाहने मागवली जाणार आहेत.
बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाईल. अधिग्रहित वाहनांवरील इंधन आणि देखभालीचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात वाहन व्यवस्थेवर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन परिसरातील तयारीला वेग आला आहे. मंडप उभारणी, रोषणाई, कार्यालयीन व्यवस्था आणि आमदार निवासातील कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिवेशनाच्या तयारीसाठी सुमारे १२९ कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार केला आहे.
२८ नोव्हेंबरपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन सुरू होणार आहे. २ डिसेंबरपर्यंत अधिवेशनाशी संबंधित सर्व तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. दुसरीकडे, राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने होणारा इंधन, देखभाल आणि इतर खर्च पाहता सरकारी खर्चात काटकसर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






