Sweden Mass shooting Indiscriminate shooting at a school in Sweden; 10 people killed
स्टॉकहोलम: एक मोठी दुर्देवी घटना समोर आली आहे. स्वीडिश शहरातील ओरेब्रो येथे एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात 10 जाणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण परिसरात बंदी घालण्यात आली आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी मोठी कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 1 च्या सुमारास घडली. ही घटना घडली त्यादरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी शाळेतच उपस्थित होते. विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु होती. शाळेतील एका शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एक तास स्वतःला त्यांच्या केबिनमध्ये कोंडून घेतले होते. त्या म्हणाल्या, “आम्हाला प्रथम काही गोळ्यांचा आवाज ऐकू आला, नंतर काही वेळाने गोळीबार तीव्र झाला.” परीक्षा संपल्यामुळे, सामान्य दिवसांपेक्षा कमी विद्यार्थी तिथे उपस्थित होते.
दहशतवादी हल्ला असू शकतो
ओरेब्रोच्या स्थानिक पोलिसांनी शाळेचे नुकसान खूप जास्त असल्याने सध्या अधिक माहिती देणे शक्य नसल्याचे म्हटले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले आहे. एकाच हल्लेखोराने ही घटना घडवून आणली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. संशयित हल्लेखोराबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचे कोणत्याही संघटनेशी असलेले संबंध अद्याप उघड झालेले नाहीत.
हल्ल्यामादगील कारण अद्याप स्पष्ट नाही
तसेच तपासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी स्थानिकांना शाळेच्या परिसरात जाण्यास मनाई केली आहे. ओरेब्रो शहर सामान्यतः शांत आणि सुरक्षित ठिकाण मानले जाते परंतु या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून हल्लेखोराला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्वीडनमध्ये शोककळा पसरली आहे आणि शाळांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या व्यक्ती गोळी घालून हत्या
काही दिवसांपूर्वी इराकी नागरिक सलमान मोमिका याला स्वीडनमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलवान मोमिका जेव्हा टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता, तेव्हा त्याच्यावर गोळीबार झाला. इस्लामच्या पवित्र कुराण ग्रंथाची अनेक प्रती जाळल्यामुळे तो संपूर्ण जगभरात मुस्लिम देशांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सध्या त्याच्या हत्येचा तपास सुरु असून हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही.