अमेरिकेतून भारतीय हद्दपार! डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपोर्टेशनसाठी का वापरले फक्त लष्करी विमान? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आली प्रशासनाने त्वरित कारवाई सुरु केली. यामध्ये चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतीय स्थलांतरितांना मायदेशात परत पाठवले आहे. अमेरिकेने आतापर्यंत प्रवाशांच्या डिपोर्टेशन मोहिमेंतर्गत 205 भारतीयांना परत पाठवले आहे. 4 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सैन्य C-17 विमानाद्वारे स्थलांतरितांना अमृतसर येथे आणण्यात आले आहे. ही उड्डाणे टेक्सासच्या सॅन अँटोनीओ येथून भारतासाठी रवाना झाली होती.
विशेष म्हणजे, अमेरिकेने इतर देशांच्या नागरिकांना परत पाठवण्यासाठीही चार्टर्ड प्लेनसोबत सैन्य विमानांचा वापर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ल्ष्करी विमानांच्या एका उड्डाणाचा खर्च खूप येतो. तरीही ट्रम्प यांनी डिपोर्टेशनसाठी याच विमानांचा वापर का केला असा प्रश्न उपस्थित होतो.
सैन्य विमानांचा वापर आणि खर्च
इंग्रीज वृत्तपत्राच्या अहवालानुसार, एका सैन्य डिपोर्टेशन उड्डाणाची किंमत अंदाजे $4,675 म्हणजे सुमारे 4 लाख रुपये प्रति प्रवासी असू शकते. ही किंमत अमेरिकी इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) द्वारे चालविल्या जाणाऱ्या कमर्शियल चार्टर फ्लाइटच्या खर्चापेक्षा जास्त आहे.
हद्दपारीच्या विमानाचा खर्च
ICE च्या माहितीनुसार, एप्रिल 2023 च्या बजेट सुनावणीदरम्यान, ICE चे कार्यवाहक संचालक ताए जॉन्सन यांनी सांगितले की, 135 लोकांसाठी एका डिपोर्टेशन फ्लाइटची प्रति तासाची किंमत $17,000 जवळपास सुमारे 14.8 लाख रुपये आहे आणि अशी उड्डाणे साधारणतः 5 तास चालतात. यावरून प्रति प्रवासी खर्च $630 जी सुमारे 52,000 रुपये असते. तर, अमेरिकी सैन्याच्या C-17 मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमानाची प्रति तासाची किंमत $28,500 म्हणजे सुमारे 24.82 लाख रुपये आहे. त्यामुळे सैन्य विमानांच्या वापरामुळे डिपोर्टेशन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
सैन्य विमानांचा वापर का केला जात आहे?
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने डिपोर्टेशनसाठी सैन्य विमानांचा वापर प्रामुख्याने प्रतीकात्मक कारणांमुळे केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा अवैध प्रवाशांना अमेरिकेवर हल्ला करणारे प्रवासी आणि गुन्हेगार म्हणून संबोधल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार परदेशी लोक अमेरिकेवर आर्थिक आणि सामाजिक स्तरावर आक्रमण करत आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या मोहिमेसाठी 2 C-17 आणि 2 C-130E सैन्य वाहतूक विमाने उपलब्ध करून दिली आहेत. सध्या या उड्डाणांसाठी झालेल्या खर्चाची स्पष्ट आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतावर याचा काय परिणाम होणार
भारतीयांसाठी हे प्रकरण महत्त्वाचे आहे, कारण अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. अमेरिकेने यापूर्वीही अनेक भारतीयांना डिपोर्ट केले आहे, परंतु आता थेट सैन्य विमानांचा वापर केल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणांमुळे भविष्यात आणखी भारतीय अप्रवासी डिपोर्ट होण्याची शक्यता आहे.