गाझा पट्टीवर अमेरिकेचे नियंत्रण? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जागतिक स्तरावर खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्ता हाती घेतल्यापासून कोणत्या ना कोणत्या विधानांवरुन चर्चेचा विषय बनत आहेत. नुकतेच त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिका गाझावर नियंत्रण मिळवू इच्छित असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी सूचित केले की गाझा मधील विस्थापित फिलिस्तिनी नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करावे आणि गाझाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी अमेरिका घ्यावी. त्यांच्या या वक्कतव्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
गाझा मध्ये पुनर्विकासाचा प्रस्ताव
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले की, अमेरिका गाझामधील नष्ट झालेल्या इमारतींचे पुनर्निर्माण करेल आणि तेथे आर्थिक विकास घडवून आणेल. त्यांच्या मते, यामुळे त्या भागातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि घरे निर्माण होतील. ट्रम्प यांनी असेही सांगितले की विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना गाझा पट्टीत परतू देऊ नये आणि त्यांना इतरत्र स्थायिक करावे.
नेतन्याहू यांची प्रतिक्रिया
तर इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे आणि इस्त्रायलसाठी गाझा धोका ठरु नये म्हणून तीन लक्ष्य निश्चित केले आहेत. त्यांनी म्हटले की, इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी गाझातील हमासची सैन्य क्षमता नष्ट करणे, बंधकांची सुटका करणे आणि गाझा पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण करणार नाही, याची हमी घेणे आवश्यक आहे.
अरब राष्ट्रांची तीव्र प्रतिक्रिया
मात्र, ट्रम्प यांच्या या विधानामुळे अरब देशांमध्ये संताप उफाळला आहे. सौदी अरेबियाने ट्रम्प यांच्या प्रस्तावाची तीव्र शब्दांत निंदा करत म्हटले आहे की, पॅलेस्टिनी लोक आपल्या भूमीवरच राहतील. तसेच त्यांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे. मिस्र, जॉर्डन आणि इतर अरब देशांनीही या प्रस्तावाचा विरोध केला आहे. अरब देशांनी पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या भूमीवरून हटवणे हा मध्यपूर्वेतील शांततेसाठी धोका ठरू शकतो असे म्हटले आहे. दोन-राज्य समाधानाच्या प्रक्रियेलाही यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
#Statement | The Foreign Ministry affirms that Saudi Arabia’s position on the establishment of a Palestinian state is firm and unwavering. HRH Prince Mohammed bin Salman bin Abdulaziz Al Saud, Crown Prince and Prime Minister clearly and unequivocally reaffirmed this stance. pic.twitter.com/0uuoq8h12I
— Foreign Ministry 🇸🇦 (@KSAmofaEN) February 5, 2025
युद्धविराम प्रक्रियेत अडथळा
ट्रम्प यांच्या या विधानामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा उद्देश गाझामधील इस्रायली बंधकांची सुटका करणे आणि संघर्ष थांबवणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अरब राष्ट्रे अधिक आक्रमक होऊ शकतात आणि मध्यपूर्वेतील अस्थिरता वाढू शकते.