थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता; LGBTQ समुदायामध्ये आनंदाची लाट
बँकॉक: थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याता आली आहे. थायलंडमधील आता समलिंगी जोडपे लग्न करू शकणार आहेत. मंगळवारी, थायलंडचे राजा महा वजिरालोंगकॉर्न यांनी या ऐतिहासिक कायद्याला मंजूरी दिल्यानंतर, समलिंगी विवाह कायदा लागू झाला आहे. 22 जानेवारी 2025 पासून हा कायदा अंमलात येणार आहे. या कायद्यामुळे थायलंड समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश ठरला आहे. याआधी तैवान आणि नेपाळने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती.मिळालेल्या माहितीनुसार, कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतेही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात.
वारसा हक्क आणि दत्तक
कायद्याच्या अंमलबजावणीनंतर समलिंगी जोडपे अधिकृतरित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतील. यासोबतच, समलिंगी जोडप्यांना आर्थिक, वैद्यकीय आणि वारसा हक्क मिळणार आहेत. या कायद्यानुसार, आता समलिंगी जोडपे आता मुलांना दत्तक घेऊ शकतील आणि त्यांना आपल्या जोडीदाराच्या मालमत्तेचा वारसा हक्क देखील असेल. याव्यतिरिक्त, शासकीय दस्तऐवजांमध्ये आता पारंपारिक ‘पती-पत्नी’ किंवा ‘पुरुष-स्त्री’ याऐवजी जेंडर न्यूट्रल शब्दांचा वापर केला जाणार आहे. यामुळे समलिंगी जोडप्यांना समानतेची भावना मिळेल.
दशकभराचा लढा
या ऐतिहासिक निर्णयासाठी थायलंडमधील LGBTQIA समुदायाने गेल्या दशकभरात खूप प्रयत्न केले. या हक्कांसाठी मोठी लढाई लढली. नंतर एप्रिल 2023 मध्ये हा प्रस्ताव थायलंडच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि जूनमध्ये सिनेटमध्ये मंजूर झाला होता. आता राजाच्या मान्यतेनंतर हा कायदा अधिकृत झाला आहे. 22 जानेवारीपासून थांलंडमध्ये हा कायदा लागू होईल. या दिवशी हजाराहून अधिक समलैंगिक जोडप्यांचा सामूहित विवाह होणार आहे. याची तयारी बॅंकॉकमध्ये सुरू आहे.
नेदरलँड्सने सर्वप्रथम दिली होती मान्यता
नेदरलँड्सने 2001 साली समलिंगी विवाहाला पहिल्यांदा मान्यता दिली होती. सध्या 30 हून अधिक देशांमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर आहे. थायलंडमध्ये या कायद्यामुळे LGBTQIA समुदायामध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 2025 मध्ये कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी, बँकॉकमध्ये हजाराहून अधिक समलिंगी जोडप्यांचे सामूहिक विवाह होण्याची योजना आहे. थायलंडमध्ये हा निर्णय LGBTQ समुदायासाठी मोठे यश आहे, ज्यामुळे समलिंगी जोडप्यांना अधिकृतरित्या एकत्र येण्याची आणि कुटुंब स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.