Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना शांततेचा मार्ग स्वीकारत, जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिकही होता, तर इतर बहुतांश जण पर्यटक होते. या अमानुष हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, भारताने त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेत सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
संयुक्त राष्ट्रांचा ठाम संदेश, शांततापूर्ण संवादच पर्याय
संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महासचिव गुटेरेस यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, दोन्ही देशांनी कोणतीही उत्तेजक किंवा परिस्थिती चिघळवणारी कृती टाळावी, असे मत नोंदवले आहे. “नागरिकांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत मान्य नाहीत,” असे स्पष्ट करत महासचिवांनी शांतता आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. त्यांनी असेही नमूद केले की, भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही वाद फक्त शांततामय संवादानेच सुटू शकतो, आणि त्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर आदर, संयम आणि कूटनीतीचा मार्ग अवलंबावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: काउंटडाउन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल
सिंधू पाणी करारावरून नव्या संघर्षाची शक्यता
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देताना सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने याला तातडीने प्रतिक्रिया देत, “हे पाऊल युद्धाला चिथावणी देणारे ठरेल,” असा इशारा दिला. यावर संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा एकदा संयम राखण्याचे आवाहन केले असून, तणाववाढीला कारणीभूत ठरणारी कोणतीही कारवाई टाळावी, असे स्पष्ट केले आहे.संयुक्त राष्ट्र महासभेचे ७९ वे अध्यक्ष फिलेमोन यांग यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले की, “ही घटना मानवतेच्या मूलभूत मूल्यांना हादरवणारी आहे.”
United Nations asks India and Pakistan to have maximum restraint after the Pahalgam terror attack.
Are you serious, UN?
Enough of this sermon. Enough of being a mute spectator. Enough of wearing blinkers towards terrorism. UN has failed to put efforts to end Pakistani terror. pic.twitter.com/QgWXwAw6dn
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2025
credit : social media
भारताचे स्पष्ट धोरण, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता
संयुक्त राष्ट्रात आयोजित ‘भविष्यातील डिजिटल नागरिकांचे सक्षमीकरण’ या विशेष कार्यक्रमाच्या सुरुवातीला, केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद, भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश, तसेच अनेक जागतिक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
पी. हरीश म्हणाले की, “या अमानुष हल्ल्यात झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी ही अत्यंत दुर्दैवी असून, भारत याचा तीव्र निषेध करतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर न्यू यॉर्क टाईम्सचा वादग्रस्त अहवाल; अमेरिकन समितीकडून तीव्र प्रतिक्रिया
शांततेचा मार्गच पर्याय
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्रांनी दिलेले संयमाचे आणि संवादाचे आवाहन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांनी शांततेवर घाला घातला असला तरी, प्रतिकार आणि संरक्षण याबरोबरच शांततापूर्ण मार्गाने विवाद मिटवणे हे जागतिक हितासाठी आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सूचनेचा कितपत परिणाम होतो हे येत्या काळात दिसून येईल, मात्र पहलगाममधील शहीद झालेल्या निष्पाप जीवांनी पुन्हा एकदा जागतिक नेतृत्वाला शांततेचा मार्ग शोधण्याची निकड अधोरेखित करून दिली आहे.