वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी पाठिंबा दिला आहे. बराक ओबामा यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कमला हॅरिस यांना पाठिंबा दिल्याचा अभिमान वाटतो आणि आपल्याला जे शक्य आहे ते सर्व आपण करणार असल्याचे ओबामा यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिशेल ओबामा देखील अमेरिकन निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चा अमेरिकेत सुरू होत्या. पण आता मिशेल ओबामा यांनीदेखील कमला हॅरिस यांना पाठिंबा दिल्यामुळे मिशेल ओबामा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे बराक आणि मिशेल ओबामा यांच्या पाठिंब्याबद्दल कमला हॅरिस यांनी दोघांचेही आभार मानले आहेत. मिशेल यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार बनण्याची शक्यता वाढली आहे. कमला हॅरिस म्हणाल्या की, ओबामा कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मिशेल ओबामा म्हणाल्या की, मला कमला हॅरिसचा अभिमान आहे आणि आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. यापूर्वी जो बायडेन यांनीदेखील कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला होता.
दरम्यान, कमला हॅरिस या देशावर राज्य करण्यास पात्र नाहीत. कमला हॅरिस या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात उदारमतवादी निवडून आलेल्या राजकारणी आहेत. त्या सत्तेवर आल्यास या देशाला उद्ध्वस्त करतील आणि हे आम्ही होऊ देणार नाही. अशी टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
एकीकडे, बेरील चक्रीवादळानंतरच्या मदतकार्याची पाहणी करण्यासाठी कमला हॅरिस ह्युस्टनमध्ये दाखल झाल्या आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर जो बायडेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘मला नव्या पिढीकडे मशाल सोपवायची आहे. जवळपास 11 मिनिटांच्या भाषणात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल, संघर्षांबद्दल आणि शिखरावर पोहोचल्याबद्दल सांगितले. यावेळी त्यांची पत्नी डॉ. जिल बायडेन, मुलगी ऐशाल, मुलगा हंटर आणि नातवंडेही उपस्थित होते. भाषणादरम्यान अनेक भावनिक क्षण होते, जेव्हा बायडेन आपल्या पत्नीचा हात धरताना दिसले. एका भावूक क्षणी मुलगी ऐशालने त्यांना आलिंगनही दिले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी ह्यूस्टनमधून बिडेन यांचे भाषण ऐकले.