फोटो सौजन्य सोशल मीडिया
एकमेकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या दोन मोठ्या सत्ता आत्ताच का एकत्र येऊन व्यापार करत आहेत ? याचे उत्तर म्हणजेच दोघांनीही सुरु केलेले युद्ध त्यांच्याच अंगलटी आले आहे . युद्ध हे कधीच पूर्णपणे शांतीचे आणि विकासाचे प्रतीक नाही .पण मानवी वृत्तीमुळे ते घडतच असते . अमेरिका आणि रशिया यांच्यातील हा व्यापार आता किती काळ चालतो हे पाहणे गरजेचे आहे . कारण यावर बरेच जागतिक राजकारण अवलंबून आहे .
आत्ता सध्या तरी फक्त रशियातून डिझेलचे एक जहाज अमेरिकेकडे निघाले आहे . त्यामुळे लगेचच यावर तर्क वितर्क काढणे उचित ठरणार नाही . आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत म्हंटल्यावर तर नाहीच नाही . कारण आत्तापर्यंतची ट्रम्प यांची वक्तव्य आणि भूमिका बघता ते पूर्णपणे बेभरवशाचे पक्के उमेदवार आहेत याची खात्री अमेरिकेतील जनतेसह जगाला झालेली आहे .
२३ ऑक्टोबर रोजी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पिस्कोव्ह यांनी पहिल्या टँकरचा प्रवास अमेरिकेच्या दिशेने सुरु झाल्याची माहिती सांगितली आहे . माल्टा देशाचा झेंडा असलेले Agioi Fanendes हे जहाज रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून २२ ऑक्टोबर रोजी डिझेल घेऊन निघाले आहे . जहाजात सुमारे ४० हजार मेट्रिक टन अल्ट्रा लो सल्फर डिझेल आहे . हे जहाज ७ नोव्हेंबर पर्यंत न्यूयॉर्कमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे .
अमेरिकेने इराण वर हल्ला केल्याचा परिणाम हा निर्माण झाला आहे कि , होर्मूझ बंद असल्याने अमेरिकेतील तेलाचे दर वाढत असून अमेरिकेत मध्य पूर्व निवडणुकांमध्ये याचा फटका ट्रम्प यांना बसू शकतो . त्यासाठी ट्रम्प यांची धडपड सुरु असून त्यांनी चक्क रशियाकडून तेल खरेदी करायला सुरवात केली आहे . ट्रम्प यांनी सुरवातीला ३ लाख टन डिझेल पुरवठयाची घोषणा केली होती .
पण नंतर नोव्हेंबरमध्ये ५ लाख टन आणि पुढील टप्प्यात १० लाख टन पुरवठ्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते .पण पहिल्या टँकरमधील तेल अमेरिकेच्या रोजच्या वापराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने त्याच्या किमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तंज्ञांचे मत आहे . तर दुसरीकडे रशिया अमेरिका व्यापारावर युक्रेनने नाराजी व्यक्त केली आहे .
रशिया अमेरिका तेल या व्यापारामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण पुन्हा एकदा जगासमोर आले आहे . कारण रशिया युक्रेनच्या युद्धामुळे भारताने रशियाकडून स्वस्त मिळणारे तेल घेण्यावर निर्बंध आणले . भारताला स्वस्त मिळणारे तेल बंद करून स्वतः मात्र रशियाकडून तेल खरेदी करायला सुरवात केली आहे .
हे करताना जगाला कारण काय सांगितले तर भारताने रशियाकडून तेल घेतल्यावर रशिया त्या पैशांचा वापर हे युक्रेन वरील हल्ला करण्यासाठी करत आहेत . मग आता अमेरिका जेव्हा थेट रशियाकडून तेल विकत घेत आहे तेव्हा रशियाला तुम्ही पैश्यांच्या ऐवजी दगड धोंडे देत आहात काय . अमेरिकेचे एक तत्व आहे कि आम्ही सांगू तीच नैतिकता , स्वतःच्या स्वार्थासाठी साऱ्या जगाला सुद्धा पणाला लावायला अमेरिका मागे पुढे बघणार नाही . अशा चर्चा रंगत आहेत .






