sanjay raut and utpal parrikar
पणजी :उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर (Shailendra Welingkar Withdraws From Panaji) यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेनं (Shivsena) दिलेला शब्द पाळला असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.
“आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,” असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
We’re keeping our word. @ShivSena is withdrawing it’s candidate Shailendra Velingkar frm #Panaji. Not just that,our workers wil fully support #UtpalParrikar.We believe that the battle for Panaji is just abt election, but also abt purification of Goa Politics.@AUThackeray pic.twitter.com/EZZDQognU0 — Sanjay Raut (@rautsanjay61) January 31, 2022
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंना टॅग केले आहे. तसेच उत्पल पर्रीकर यांचा कोट असलेला एक फोटो या ट्विटमध्ये आहे, ज्यात म्हटले आहे की, “तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट द्याल?”. भाजपाने बाबुश म्हणून ओळखले जाणारे अटानासियो मोन्सेरेट यांना पणजीतून उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रिकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे.
पणजी जागेसाठी उत्पल पर्रिकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर २७ जानेवारीला त्यांनी त्यांच्या निर्णयाची घोषणा केली.