अक्षय कुमारची बाईकची आवड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा वाढदिवस आहे आणि तो ५८ वर्षांचा झाला आहे. तथापि, त्याचे चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या वयाचा अंदाज लावणे अशक्य आहे. अक्षय कुमार ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये बाईक स्टंट आणि Action सीन करताना दिसतो, त्याचप्रमाणे त्याला खऱ्या आयुष्यातही बाईक चालवायला आवडते. त्याच्याकडे एक मस्त अॅडव्हेंचर बाईकदेखील होती. एका मुलाखतीदरम्यान त्याने या बाईकशी संबंधित एक किस्साही सांगितला, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
‘ही’ बाईक चालवत होता अक्षयकुमार
अक्षय कुमारकडे होंडा एक्सआरव्ही ७५० ही एक साहसी बाईक होती. होंडा आफ्रिका ट्विन म्हणून ओळखली जाणारी ही बाईक ही ड्युअल-स्पोर्ट मोटरसायकल आहे जी पहिल्यांदा १९८९ मध्ये लाँच करण्यात आली होती. ही बाईक ७४२ सीसी क्षमतेचे व्ही-ट्विन इंजिनने सुसज्ज आहे, जी ६० ते ६२ हॉर्सपॉवर आणि सुमारे ६२ एनएम टॉर्क जनरेट करते. तिचा टॉप स्पीड सुमारे १७४ किमी/तास आहे आणि तो ऑफ-रोड आणि ऑन-रोड दोन्हीसाठी योग्य आहे.
या बाईकची सीट उंची ८६०-८७० मिमी दरम्यान आहे आणि तिचे वजन सुमारे २३५ किलो आहे. या बाईकमध्ये २३ लिटरची इंधन टाकी आहे. ही बाईक १९९० ते २००० पर्यंत तयार करण्यात आली होती आणि २००३ पर्यंत शोरूममध्ये उपलब्ध होती. या बाईकमध्ये ट्विन हेडलाइट्स, विंडस्क्रीन आणि लांब ड्युअल सीट सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
अक्षय कुमारचा किस्सा
एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने सांगितले होते की मुंबईत खूप वाहतूक असते, त्यामुळे गाडीने चित्रपटाच्या सेटवर पोहोचणे खूप कठीण असते, तेही वेळेवर. अक्षय कुमार नेहमीच सेटवर वेळेवर पोहचतो, तो वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे. म्हणून तो बऱ्याच वेळा त्याच्या बाईकने चित्रपटाच्या सेटवर वेळेवर पोहोचायचा. त्याने सांगितले होते की तो सामान्य माणसाप्रमाणे हेल्मेट घालून बाईकवरून जायचा आणि वेळेवर चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचा. रस्त्यात तर सोडाच, बऱ्याचदा तो सेटवर पोहोचला तरी लोक त्याला ओळखू शकत नव्हते.
अक्षय कुमारचा काटेकोरपणा
अक्षय कुमार हा सकाळी लवकर उठतो आणि सेटवरदेखील कॉल टाइमला वेळेवर पोहचतो. त्याला गाडीने ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा बाईकवरून जाणे सोपे वाटते आणि त्यामुळे आजही बऱ्याचदा तो बाईकने प्रवास करताना दिसतो. मात्र लोकं त्याला ओळखत नाहीत कारण तो फुली प्रोटेक्टेड हेल्मेट घालून प्रवास करतो.