
फोटो सौजन्य - Social Media
बजाज ऑटोने भारतीय बाजारात पोलिस दलासाठी खास सानुकूल (कस्टम-मॉडिफाइड) केलेली बजाज डोमिनार 400 मोटरसायकल सादर केली आहे. अलीकडेच कंपनीने पुणे पोलिस दलाला अशा 100 विशेष डोमिनार 400 बाइक्स सुपूर्द केल्या असून, या बाइक्सचा वापर पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच उपनगरांमध्ये गस्त घालण्यासाठी करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आणि जलद प्रतिसाद यंत्रणा यामुळे ही मोटरसायकल पोलिसांच्या कामकाजासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.
पोलिसांसाठी सानुकूलित करण्यात आलेल्या बजाज डोमिनार 400 मध्ये अनेक खास वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाइक्समध्ये एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, पब्लिक अॅड्रेस (PA) सिस्टम, पुश-टू-टॉक रेडिओ ट्रान्समिशन, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम तसेच आपत्कालीन प्रथमोपचार किट देण्यात आले आहे. यामुळे गुन्हेगारी घटनांवर तातडीने प्रतिसाद देणे, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय मोबाईल फोन, वॉकी-टॉकी यांसारख्या आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्सही देण्यात आले आहेत.
या विशेष बाइक्सच्या सुपूर्दगीचा कार्यक्रम पुण्यातील शिवाजीनगर येथील पुणे पोलिस मैदानावर पार पडला. या वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासह विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि क्रीडा आयुक्त शीतल तेली यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कस्टम-मॉडिफाइड डोमिनार 400 बाइक्स बाजाज पुणे ग्रँड टूर 2026 च्या अधिकृत ताफ्याचा भागही असणार आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या ग्रँड टूरमध्ये 437 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या मार्गात 9 तालुके आणि सुमारे 150 गावांचा समावेश आहे. शहरी आणि ग्रामीण अशा विविध भौगोलिक भागांतून हा मार्ग जाणार असल्याने या बाइक्सची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.
बजाज डोमिनार 400 चे मूळ मॉडेल महाराष्ट्रातील पुणे येथील बजाजच्या उत्पादन केंद्रात तयार केले जाते. पोलिसांसाठी सानुकूलित आवृत्तीत लॉक करता येणारे साइड पॅनियर्स आणि टॉप बॉक्स देण्यात आले असून, त्यामध्ये प्रथमोपचार साहित्य, फॉरेन्सिक साधने, कागदपत्रे आणि इतर आवश्यक उपकरणे ठेवता येणार आहेत. इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, या बाइकमध्ये 373.3cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन अॅडजस्टमेंटसारखी आधुनिक वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.
बजाज ऑटोच्या मते, या विशेष सानुकूलित मोटरसायकली पुणे पोलिसांना शहरातील विविध शहरी आणि ग्रामीण भागात जलद आणि प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी मोठी मदत करणार आहेत. वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अशा उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बाइक्स पोलिस दलासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.