
BMW ही प्रमुख लक्झरी कार प्रोडक्शन कंपनी या महिन्यात भारतात आपल्या तीन नव्या सेडान गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ११ सप्टेंबर रोजी आपली अपडेटेड ७ सिरीज आणि ऑल-इलेक्ट्रिक i7 लाँच करणार आहे. याचसोबत, भारतातच असेंबल केलेल्या नव्या i5 LWB या इलेक्ट्रिक सेडानच्या किमतीही जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
नवी BMW i5 LWB ही भारतात स्थानिक पातळीवर असेंबल होणारी बीएमडब्ल्यूची दुसरी इलेक्ट्रिक कार ठरेल. या कारचे बुकिंग आधीच सुरू झाले असून ती स्टँडर्ड आणि ‘फर्स्ट एडिशन’ अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. आकाराचा विचार केल्यास, i5 LWB ची लांबी ५.१ मीटर आणि व्हीलबेस ३.१० मीटर आहे, जो रेग्युलर i5 पेक्षा १०० मिमी जास्त आहे. यामध्ये ८१.६ kWh चा बॅटरी पॅक आणि २६८ bhp पॉवर जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही कार एका चार्जमध्ये तब्बल ६६९ किमी (MIDC सायकल) रेंज देईल असा दावा करण्यात आला आहे.
दुसरीकडे, BMW 7 सिरीज फेसलिफ्ट आणि i7 फेसलिफ्टच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. या गाड्यांना नवी इल्युमिनेटेड ग्रिल, अपडेटेड हेडलाइट्स, आकर्षक DRLs आणि स्लीक LED टेललाइट्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटीरिअरमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह १७.९-इंच मुख्य टचस्क्रीन, फ्रंट पॅसेंजरसाठी १४.६-इंच डिस्प्ले आणि फोर-स्पोक स्टेअरिंग व्हील यांसारखे आधुनिक बदल करण्यात आले आहेत. मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी ३१.३-इंचचा ८K टचस्क्रीन थिएटर डिस्प्ले कायम ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, i5 LWB मध्ये अडॅप्टिव्ह रिअर ॲक्सल एअर सस्पेंशन आणि जास्त ग्राऊंड क्लिअरन्स मिळेल. सुरुवातीला या कारची ‘फर्स्ट एडिशन’ लाँच केली जाणार असून तिचे फक्त ९९ युनिट्सच भारतात विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामध्ये डॅशबोर्डवर ‘FIRST EDITION’ चे लेझर एनग्रेव्हिंग, सिल्व्हर ब्राँझ ॲक्सेंट आणि प्रीमियम वुड ट्रिम यांसारखी खास वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.