केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतेच सोशल मीडियावर E20 इंधनावर सुरू असलेल्या टीकेबद्दल एक मोठे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, ही टीका कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे नाही, तर शक्तिशाली आणि श्रीमंत पेट्रोल लॉबीने पसरवलेला दुष्प्रचार (Propaganda) आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, ‘माझ्या विरोधात पैसे देऊन मोहीम (Paid Campaign) चालवली जात आहे.’
खरं तर, E20 इंधन हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रण आहे, ज्यामध्ये ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉल असते. सरकार याला ग्रीन एनर्जीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानत आहे. पण, सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की यामुळे वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते आणि इंजिनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) द्वारे आयोजित ऑटो रिटेल कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना गडकरींनी म्हटले की, “प्रत्येक ठिकाणी लॉबी असतात, तुमच्यातही आहेत. पण, E20 इंधनाबद्दल सोशल मीडियावर जो अपप्रचार पसरवला जात आहे, तो पेट्रोल लॉबी करत आहे.” गडकरींनी स्पष्ट केले की, ही नवी तकनीक भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाईल आणि प्रदूषण कमी करण्यासही मदत करेल.
यापूर्वीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे मायलेजवर होणाऱ्या परिणामांना अतिरंजित करून सादर केले जात आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जर E-० कडे परतण्याचा निर्णय घेतला, तर आतापर्यंत प्रदूषण आणि ऊर्जा संक्रमणाबाबत भारताने केलेल्या प्रगतीला मोठा धक्का बसेल.
हे देखील वाचा: वाढते रस्ते अपघात ठरतायेत जीवघेणे; यावर नियमित उपाय करणं आहे गरजेचे
गडकरींनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत आधीच नवीन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहे. देशातील स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, झिंक आयन आणि ॲल्युमिनियम आयन बॅटरीवर संशोधन करत आहेत. तसेच, जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून दुर्मिळ धातू आणि इतर मौल्यवान धातूही काढता येऊ शकतात.
काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता, ज्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पण आता भारतातच चिपचे उत्पादन सुरू झाले आहे. गडकरींच्या मते, हीच आत्मनिर्भरता भविष्यात इंधन आणि बॅटरी क्षेत्रातही दिसेल.
यावेळी गडकरींनी असेही सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची मागणी सध्या कमी होणार नाही. ऑटोमोबाइल उत्पादनात दरवर्षी १५-२० टक्के वाढ होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारही खूप मोठा आहे. याचा अर्थ, सध्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची विक्री सुरू राहील, पण पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञान हळूहळू आपले स्थान मजबूत करतील.
गडकरींनी सांगितले की, जेव्हा त्यांनी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाचे आकारमान १४ लाख कोटी रुपये होते. आज ते २२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जागतिक स्तरावर अमेरिका ७८ लाख कोटी आणि चीन ४७ लाख कोटी रुपयांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.