
फोटो सौजन्य - Social Media
जावा-येझदी मोटरसायकल्सने 2026 च्या उत्सव सिजनची सुरुवात करत येझदी मोटरसायकल्सची नवी श्रेणी बाजारात सादर केली आहे. ‘अनटेम्ड ट्रिनिटी’ या संकल्पनेअंतर्गत यलो फाल्कन अॅडव्हेंचर, ग्रीन मम्बा रोडस्टर आणि ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलर ही तीन नवीन आकर्षक मॉडेल्स लॉन्च करण्यात आली आहेत. या नव्या श्रेणीची राष्ट्रीय पातळीवरील सुरुवात ओणमच्या पार्श्वभूमीवर केरळमधून करण्यात आली असून, देशभरात बुकिंगलाही प्रारंभ झाला आहे.
नवीन येझदी अॅडव्हेंचरमध्ये प्रथमच ट्यूबलेस क्रॉस-स्पोक व्हील्स देण्यात आले असून, त्यामुळे पारंपरिक स्पोक व्हील्सची मजबुती आणि ट्यूबलेस टायरची सोय एकाच वेळी मिळणार आहे. 334 सीसी लिक्विड-कूल्ड अल्फा2 इंजिन, 29.6 पीएस पॉवर, 29.9 एनएम टॉर्क तसेच ट्रॅक्शन कंट्रोल आणि रोड, रेन व ऑफ-रोड ABS मोड्स यांसारखी वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, ग्रीन मम्बा रोडस्टरला नवीन मॅट ग्रीन फिनिश, ब्राऊन क्विल्टेड सीट आणि कॉपर स्टिकर्स देण्यात आले आहेत. तर ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलरमध्ये 334 सीसी कतार इंजिन, 30 पीएस पॉवर, 30 एनएम टॉर्क आणि 30 किमी प्रतिलिटर मायलेजचा समतोल साधण्यात आला आहे.
क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक बोमन रुस्तम इराणी यांनी सांगितले की, रायडर्सच्या अभिप्रायावर आधारित ही नवी श्रेणी विकसित करण्यात आली असून, येझदीची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम यात पाहायला मिळतो. दरम्यान, कंपनीने केरळमध्ये एकाचवेळी 20 हून अधिक विक्री व सेवा केंद्रे सुरू केली आहेत. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत देशभरातील डीलर नेटवर्क 700 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कंपनीने जाहीर केले आहे.
नवीन येझदी अॅडव्हेंचरची एक्स-शोरूम किंमत (नवी दिल्ली) ₹2.12 लाखांपासून, ट्यूबलेस व्हर्जनची किंमत ₹2.29 लाख ते ₹2.32 लाखांपर्यंत आहे. तर ग्रीन मम्बा रोडस्टर आणि ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलरची किंमत प्रत्येकी ₹2.05 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. याशिवाय, कंपनीचा ओनरशिप अश्युरन्स प्रोग्रामही कायम ठेवण्यात आला असून, त्यात 4 वर्षे किंवा 50,000 किमीपर्यंतची स्टँडर्ड वॉरंटी, रोडसाइड असिस्टन्स आणि AMC पर्यायांचा समावेश आहे.