चीनमधील युनान प्रांतातील नागू येथील १४व्या शतकातील मशिदीचं घुमट, मिनार पाडण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. शिनजियांग मशिदीचे काही भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्युत्तरात अशांतता पसरली. २०२० मध्ये, न्यायालयानं निर्णय दिला, की मशिदीमध्ये बांधलेलं घुमट छत, मिनार बेकायदेशीर आहे आणि ते काढून टाकले पाहिजेत. या निर्णयानंतर गेल्या आठवड्यात मशिदीचा वरचा भाग पाडण्याचं काम सुरू असताना नागू येथील स्थानिकांनी आक्षेप घेतला. आक्षेप घेणारे हे सर्व लोक मुस्लिम अल्पसंख्याक वांशिक गटातील आहेत. नाझीयिंग मशिदीचं बांधकाम गेल्या काही वर्षांत झालं आहे. या काळात नवीन मिनार आणि घुमट बांधण्यात आले आहेत. चीनमध्ये मशिदी पाडणं ही काही नवीन गोष्ट नाही. चीन सतत शिनजियांगमधील मशिदी आणि अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रं एकतर बंद करत आहे किंवा उद्ध्वस्त करीत आहे. मुस्लिमांच्या पाऊलखुणा पुसून टाकण्यासाठी हे उईगुर, कझाक आणि इतर मध्य आशियाई वांशिक गटांच्या सदस्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या निष्ठावान अनुयायांमध्ये रुपांतरित करण्याच्या मोठ्या चिनी मोहिमेचा तो एक भाग आहे. चीनमध्ये १९६६ पासून ही तोडफोड सुरू आहे.
ऑस्ट्रेलियतील कॅनबेरा येथील ‘स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट‘च्या संशोधन गटाच्या अहवालानुसार, २०१७ पासून शिनजियांगमध्ये सुमारे आठ हजार मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या आहेत. माओ त्से तुंग यांच्या काळात सुरू झाली. दुसरीकडं धार्मिक स्थळांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची वृत्तं चीन सरकार फेटाळून लावत आहे. मशिदींच्या सुरक्षेला आणि दुरुस्तीला महत्त्व देते, असं चीन सरकार म्हणत असलं, तरी जगात त्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’वर चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे. ही संस्था अमेरिकेच्या आर्थिक पाठिंब्यावर चालते आणि पक्षपाती असल्याचं चीनचं म्हणणं आहे. संस्थेनं हा दावा नाकारला आहे. संशोधन त्याच्या निधीकर्त्यांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. चिनी अधिकाऱ्यांनी शिनजियांगमधील हालचालींवर कडक नियंत्रण ठेवलं आहे. तीन वर्षांत हजारो मशिदी पाडण्यात आल्या. इमाम असीम दर्गा हा चीनमधील शिनजियांगमधील एक मोठा दर्गा होता. २०१५ पर्यंत उईगुर मुअज्जिन येथे नमाज अदा करत होते. २०२० पर्यंत ही मशीद पाडण्यात आली. गेल्या वर्षी काशगरमधील या मशिदीचं बारमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी काशगरमधील आणखी एका मशिदीचं दुकानात रूपांतर करण्यात आलं. त्याचप्रमाणे २०१८ मध्ये नान्युआन स्ट्रीट मशीद पाडण्यात आली होती. ऑर्डेम मझार २०१९ मध्ये पाडण्यात आली.
‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या थिंक टँकनुसार, शिनजियांगमध्ये २४ हजारांहून अधिक मशिदी होत्या. आता तिथं फक्त तीन हजार मशिदी उरल्या आहेत. २०१७ पासून ३० टक्के मशिदी पाडण्यात आल्या आहेत आणि ३० टक्के मशिदींचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान करण्यात आलं आहे. यातील अनेक मशिदींचे मिनार पाडण्यात आले आहेत. अहवालात असं म्हटलं आहे, की मशिदी पाडल्यानंतर अनेक रिकाम्या जागी अजूनही अवशेष आहेत. काही रस्ते आणि कार पार्कमध्ये रूपांतरित झाले आहेत किंवा शेतीसाठी वापरले जात आहेत. शिनजियांगमधील हजारो मशिदी अवघ्या तीन वर्षांत खराब झाल्या आहेत किंवा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. चीननं हलाल उत्पादनांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की चीन शिनजियांग प्रांतात लोकांना ‘शिक्षित’ करण्यासाठी शिबिरं उघडत आहे. तेथील मुस्लिमांची विचारधारा बदलण्यासाठी हे केलं जात आहे. शिनजियांगची राजधानी उरुमकी येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हलाल धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष जीवनातील रेषा अस्पष्ट करते, म्हणूनच त्यांना त्या हलाल गोष्टींचा वापर कमी करायचा आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या समितीला सांगण्यात आलं होतं, की शिनजियांगमधील दहा लाख मुस्लिमांना अडकवून ठेवलं जात आहे,जिथं त्यांना ‘पुनर्शिक्षित’ केलं जात आहे; मात्र चीननं हे सर्व वृत्त फेटाळून लावलं आहे. शिनजियांगमध्ये माध्यमांवर बंदी आहे. चीननं अलिकडच्या वर्षांत धार्मिक गटांच्या कारवायांवर नियंत्रण वाढवलं आहे. २०२१ मध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी धर्माच्या ‘सिनिकायझेशन’चा नारा दिला, म्हणजेच सर्व धार्मिक श्रद्धा चिनी संस्कृती आणि समाजाच्या रंगात रंगल्या पाहिजेत.
चिनी समाज आणि राजकारणाचा मागोवा घेणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, अलीकडच्या काळात चीननं धार्मिक गटांच्या कारवायांवर नियंत्रण वाढवलं आहे. चीन हा नास्तिक देश आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष धर्मावरील मार्क्सवादी-लेनिनवादी-माओवादी सिद्धांताचं पालन करतो. आता लोक या मुद्द्यावरून सरकारला विरोध करत आहेत. जे धर्म चीनच्या ‘देशभक्त’ संघटनांमध्ये सामील होतात, त्यांना कम्युनिस्ट पक्ष पाच धर्मांना चीनमध्ये कायदेशीररित्या कार्य करण्यास परवानगी देतो. हे धर्म आहेत- बौद्ध धर्म, दाओ धर्म, इस्लाम, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ख्रिस्ती. या धर्मांशिवाय इतर अनेक धर्मांना मानणारे लोक आहेत. हान बहुसंख्य लोक बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माचे लोक आहेत. चीनमधील सुमारे २० टक्के लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात. ख्रिश्चन धर्म हा गेल्या तीन-चार दशकांमध्ये सर्वात वेगानं वाढणारा धर्म आहे. या धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ झाली आहे. ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये दरवर्षी सात टक्क्यांनी वाढ होत असेल, तर २०३० पर्यंत चीन मोठा ख्रिश्चन देश होईल. चीनमधील हान चिनी लोक इस्लाम स्वीकारत आहेत.
चीनमध्ये इस्लाम एक जातीय समूह मानला जातो. चीनमध्ये दहा वांशिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या २२ दशलक्षांपेक्षा जास्त आहे. एका संशोधन अहवालानुसार, चीनची आर्थिक वाढ आणि जागतिक राजकारणातील वाढत्या सामर्थ्यानं चिनी राष्ट्रवाद वाढत आहे. चीननं राष्ट्रवादासह देशभक्तीला प्रोत्साहन दिलं आहे. देशभक्ती आणि राष्ट्रवादाला चालना देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षानं चर्च, मंदिरं आणि मशिदी पाडण्यास सुरुवात केली. चिनी सरकारनं अनेक देशांमध्ये शेकडो कन्फ्युशियस संस्था स्थापन केल्या आहेत आणि त्यांना निधी दिला आहे. चीनमध्ये अनेक संस्था, संघटना आणि कन्फ्युशियस मंदिरं स्थापन झाली आहेत. असं करून चिनी सरकारला कट्टरपंथी कन्फ्युशियनवादाचा पुरस्कार करायचा आहे. तथापि, भिन्न धार्मिक समुदाय त्यांच्या विश्वासाच्या स्वरूपावर जोर देतात. चीनमध्ये धार्मिक गटांवर बंदी आहे. तिथं अनेक धार्मिक आणि अध्यात्मिक गटांना ‘हेटरोडॉक्स पंथ’ म्हणून संबोधलं जातं. हे धार्मिक गट नियमितपणे सरकारी कारवाईच्या अधीन असतात. पक्ष-राज्यानं या आधारावर अशा १२ हून अधिक धर्मांवर बंदी घातली आहे. या धर्माचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाते, असं सरकारचं मत आहे. हे लोक देशातील प्रमुख सदस्यांचा अपमान करतात. प्रत्येक गोष्टीवर आपली इच्छाशक्ती चालवायची आहे. देशातील अनेक धर्म अंधश्रद्धा पसरवत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
चीननं बंदी घातलेल्या धार्मिक गटांची यादी प्रसिद्ध केली. ही यादी १९९५, २०००, २०१४ आणि पुन्हा सप्टेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली. चीनमध्ये आतापर्यंत १२ हून अधिक धर्म किंवा धार्मिक गटांवर बंदी घालण्यात आली आहे. १९७० च्या दशकात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी तत्कालीन चिनी सर्वोच्च नेते डेंग झियाओपिंग यांना चिनी लोकांना धार्मिक स्वातंत्र्य देण्याबाबत आवाहन केलं होतं. त्यानंतर, चिनी कम्युनिस्ट सरकारनं संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेलं काही आधुनिक मानदंड स्वीकारले. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळायला हवं, असं जग कितीही सांगत असले, तरी चिनी सरकार किंवा तिथले अधिकारी अजूनही समजून घेतलं पाहिजे. एकीकडं मुस्लिम राष्ट्रं भारतात थोडं काही खट्टू झालं, तर ओरड करतात; परंतु चीनमध्ये मुस्लिमांवर एवढा अन्याय होऊनही काहीही बोलायला तयार नाहीत, हे आश्चर्यच आहे. उलट, सौदी अरेबिया आणि इराणसारख्या कट्टर वैरी देशांना एकत्र आणण्यात चीनला यश आलं. अमेरिकेला जे जमलं नाही, ते चीननं करून दाखवलं.
भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com