गोमंतकातील कोरीव लेख : गोमंतकीय कोरीव वाङ्मयाचा अभ्यास केल्यास मराठी संदर्भातील अनेक कोरीव लेख याठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसते. गोमंतकीय शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर गोमंतकीय मराठी परंपरा किती प्राचीन आहे याचा पुरावाच आपणाला उपलब्ध होतो. गोमंतकातील वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल अशा येथील कापडलेखांचाही आढावा घेतला पाहिजे. हे कापडलेख गोमंतकात ‘टके’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
काणकोण तालुक्यातील मराठी टके :
काणकोण तालुक्यातील पैंगीण येथील श्रीवेताळदेवाचा टका व आणि गावडोंगरी येथील श्रीमल्लिकार्जूनाचा टका हे दोन ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे टके आहेत. ‘टका’ म्हणजे एखाद्या स्वच्छ कापडावर विविध रंगीत धाग्यादोऱ्यांनी भरतकाम करून सजविलेला एक प्राचीन कापडलेख. दासोपंतांची पासोडी सोडल्यास अशाप्रकारे कापडावर लेखन केल्याचे पुरावे मराठीत इतरत्र मिळत नाहीत. गोव्यात उपलब्ध असलेल्या या दोन्ही टक्यातील लेखनखचा आशय वेगवेगळा असला तरी त्यांचा उद्देश अक्षरांबरोबरच विविध चित्रकृतींच्या माध्यमातून त्या शब्दातील आशय वाचकाच्या अंतःकरणा पर्यंत पोहचवणे हा होता हे सहज लक्षात येते.
शमीपत्र आणि झुला : काणकोण येथील श्रीमल्लिकार्जून देवालयात दरवर्षी विजयादशमीच्या सीमोल्लंघनप्रसंगी शमी वृक्षाची पूजा झाल्यावर पुरातन काळापासून प्रचलित असलेला व कागदावर लिहिलेला एक मराठी लेख समारंभपूर्वक वाचला जातो व तो ‘शमी-पत्र’ या नावाने ओळखला जातो. या शमीपत्राचा नेमका काळ माहीत होत नसला तरी हे शमीपत्र बरेच प्राचीन असल्याचे मानले जाते. ‘झुला’ हा मराठीतील एक प्राचीन भक्तिगीत प्रकार आहे. आपल्या आराध्य दैवताच्या उत्सवमूर्तीला पालखीत घालून झुलवताना म्हणायचे ईशस्तवनपर गीत म्हणजे ‘झुला’ किंवा ‘झुलवा’. सोमवारी किंवा पर्वणीच्या दिवशी पालखीतूंन श्रींची मिरवणूक निघते त्यावेळी मल्लिकार्जुन देवाचा झुला गाऊन दाखवण्याची प्रथा आहे.
गोमंतकातील प्राचीन मराठी काव्य : मराठी साहित्य निर्मितीला जेव्हा महाराष्ट्रात सुरूवात झाली त्या आरंभीच्या काळातच गोमंतकातही मराठी साहित्याच्या निर्मितीला सुरूवात झाल्याचे दिसते. पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलूमी राजवटीत पोर्तुगीजानी अनेक ग्रंथांची होळी केली तरीही गोव्यातील मराठी परंपरा कायम राहिली. यातूनच ती किती समृद्ध होती हे लक्षात येते. एवढेच नव्हे, तर जेव्हा या आक्रमकांना आपल्या धर्मप्रसारासाठी साहित्य निर्मितीची आवश्यकता भासली तेव्हा त्यांनाही मराठीचाच आसरा घ्यावा लागला हे सत्य आहे. प्राचीन गोमंतकीय मराठी कवितेचा विचार करता कृष्णदास शामा याने लिहिलेल्या ‘श्रीकृष्ण चरित्रकथा’ या ग्रंथापासून या काव्यलेखनाला प्रारंभ झाला असे म्हटले जाते.
श्रीकृष्ण चरित्रकथा: कृष्णदास शामा
ही श्रीकृष्ण चरित्रकथा लिहिणाऱ्या कवीचे मूळ नाव. शामराज किंवा सामराज असे असून तो केळोशी (केळशी) येथील रहिवासी होता. तो तेथील शांतादुर्गा देवीचा भक्त होता व पंढरपूर येथील गोविंद नामक व्यक्ती त्याची गुरू होती. त्याने लिहिलेल्या या ‘श्रीकृष्ण चरित्रकथेत’ एकूण ३१३५ ओव्या असून. १९ अवस्वर (भाग/ अध्याय) आहेत. भागवतातील दशम स्कंधातील ४५ वा अध्याय त्यानी आपल्या कथेसाठी निवडला आहे. आध्यात्म निरूपण आणि मोक्षाचा मार्ग सांगणे या हेतूनेच या ग्रंथाची निर्मिती केल्याचे कवीने ग्रंथात नमूद केले आहे. मोक्षाचे साधन म्हणून नाममहात्म्य, परोपकाराचे फळ, भक्तीचे स्वरूप, कर्मसिद्धान्त, अशा अनेक विषयांचे विश्लेषण ही या ग्रंथात केले आहे. मराठी आख्यान काव्याला शोभून दिसावी अशीच कृष्णदास शामाची शैली आहे. या काळातील गोमंतकातील आणखी दोन कवी म्हणजे ज्ञानदेव व निवृत्ती. स्वतःच्या खऱ्या नावाने ग्रंथ निर्मिती करण्याचे धाडस होत नसल्याने. अनेक जण पूर्वकालात झालेल्या मोठ्या संतांची नावे घेऊन त्याकाळी गोमंतकात ग्रंथनिर्मिती करीत असल्याचे दिसते. तथाकथित ज्ञानदेव व निवृत्ती याच परंपरेतील असल्याचे दिसते.यातील ज्ञानदेव यांच्या नावावर योगवासिष्ठ, व द्रोणपर्व हे दोन ग्रंथ असून काही स्फूट प्रकरणेही आहेत. या गोमंतकीय ज्ञानदेवांवर प्रत्यक्षातील ज्ञानदेवांचा मोठा प्रभाव असून या प्रभावातूनच त्यानी हे सर्व लेखन केल्याचे दिसते. अर्थात भाषेच्या श्रीमंतीचा विचार करता हा ज्ञानदेव त्या ज्ञानदेवाच्या जवळपासही जात नाही. पण त्याच्या लेखनात प्रामाणिकता आहे हे निश्चित. या तथाकथित ज्ञानदेवाने ज्याचा आपला गुरु म्हणून उल्लेख केला आहे तो निवृत्तीही गोमंतकीयच असावा. कारण निवृत्ती नावाच्या कवीवर ‘निवृत्तेश्वरी’ ही गीतेवर लिहिलेली टीका सापडते. या काळात इतरही काही कवी काव्यनिर्मिती करीत होते व त्यांच्यातील काहींची पुस्तके पोर्तुगाल मधील ब्राग येथील ग्रंथालयात असल्याचे म्हटले जाते. त्यामध्ये शिवानंद यांचे गरूड कथा, समयानंद यांचे रुक्मिणी स्वयंवर इ. या काळातील विष्णूदास नामा हा देखील एक विवाद्य विषय बनलेला कवी आहे. त्याच्या नावावरील बरीच पुस्तके ब्राग येथील वाचनालयात पांडुरंग पिसुर्लेकर याना सापडली होती. प्रल्हाद चरित्र, हरिश्चंद्रपुराण, कर्णपर्व वगैरे बरीच पुस्तके त्याच्या नावावर सांगितली जातात. महाराष्ट्रातही विष्णूदास नामा या नावाचा संतकवी होऊन गेल्याचे दिसते. त्यामुळे विष्णूदास नामा नेमके किती? हा प्रश्न निर्माण होतो. गोव्यात मोठ्या संत पुरूषांची नावे घेऊन लेखन झाल्याची परंपरा लक्षात घेता महाराष्ट्रात विष्णूदास नामा होवून गेल्यावर त्याचे नाव घेऊन एखाद्या गोमंतकीयाने गोव्यात ही रचना केली असावी. असे म्हणण्यास वाव आहे.
तुकाराम बाबा वर्दे: (इ.स. १५७२ ते १६५०)
यांच्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी हे महत्त्वाचे प्राचीन गोमंतकीय मराठी कवी म्हणून ओळखले जातात. भर्तृहरीच्या शतत्रयाचे समश्लैकी भाषांतर ‘सुभाषित रत्नावली’ या नावाने त्यानी केले. पूर्णप्रकाशानंदनाथ किंवा नायकस्वामी: ( सोळावे, सतरावे शतक) नायकस्वामी म्हणजेच शंकर मंगेश नायक करंडे ते ‘पूर्णप्रकाशानंद’ या नावानेही ओळखले जात. त्यानी रचलेले झुलवे आजही देवाच्या पालखीसमोर गायले जातात.
कवी व्यंकट: हे नायकस्वामींचे शिष्य.पंचपथानुभव हा त्यांचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. नाथपंथाच्या दृष्टीने या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. १६८९ मधील हा ग्रंथ आहे. ‘विवेकसिंधुटिप्पण’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ हे संस्कृतमधील विवेकसिंधुचे भाषांतर आहे.
संत सोहिरोबानाथ आंबिये: ( इ.स. १७१४ ते १७९२) गोमंतकातील आणि एकूणच मराठी संत परंपरेतील व नाथपंथातील एक महत्त्वाचे संत कवी म्हणून संत सोहिरोबानाथ आंबिये ओळखले जातात. अत्यंत साध्यासोप्या शब्दात जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारे कवी म्हणून ते ओळखले जातात. एका तेजःपुंज पुरूषाकडून दीक्षा मिळाल्यानंतर त्यानी आपले पारंपरिक कुलकर्णी पद सोडले व पुढील काळ हरिभक्तीत घालविला. पुढील २५ वर्षे त्यांचे वास्तव्य सावंतवाडीच्या आसपासच्या गावात राहिले. याच काळात त्यानी स्फुट पदे व आध्यात्मपर ग्रंथ रचना केली. त्यांची बहीण व त्यांच्या काही शिष्यांनी त्यांच्या रचना लिहून ठेवल्या. गुरूचा अनुग्रह झाल्यावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी सिद्धान्तसंहिता, पूर्णाक्षरी, अद्वयानंद व महदभुवनेश्वरी असे आध्यात्मपर ग्रंथ लिहिले. तसेच ७०० पेक्षा जास्त पदेही त्यानी लिहिली आहेत. त्यांचे आध्यात्मिक निरूपणाचे ग्रंथ महत्त्वाचे आहेतच पण त्याच बरोबर त्यांचे उपदेशपर अभंग महत्त्वाचे असून ते वाचकाच्या ह्रदयाला भिडणारे आहेत.
उदा: हरिभजनाविण काळ घालवू नको रे| अनुभवाविण मान हालवू नको रे|
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे|
आपुल्या मते उगाच चिखल कालवू नको रे|
अशा अनेक पदांची उदाहरणे देता येतात.
विठ्ठल केरीकर: (इ.स. १७१५ ते १७८९) हे संत सोयरोबानाथांचे समकालीन पेडणे तालुक्यातील केरी हे त्यांचे मूळ गाव. विठ्ठल केरीकरांच्या नावावर शुकरंभा- संवाद, कबीर-कथा, गजगौरीव्रत, अकलकामा, वामन चरित्र अशी आर्यावृत्तातील व ओवी वृत्तातील अनेक प्रकरणे आहेत. तसेच त्यांची काही स्फुट कविताही उपलब्ध आहे. ‘घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरूणोदय झाला’ ही अत्यंत प्रसिद्ध अशी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली व होनाजी बाळा यांची म्हणून सांगितली जाणारी भुपाळी वास्तविक विठ्ठल केरीकर यानी लिहिलेली आहे. प्रसिद्ध गोमंतकीय कवी दामोदर कारे व शिवा पै आंगले यानी पुराव्यानिशी हे सिद्धही केले आहे.
कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर: (१८४४ ते १९०२) हे तिसवाडी तालुक्यातील डोंगरी या गावचे रहिवासी. लहानपणा पासूनच ते तीव्र बुद्धीपत्तेचे होते. रामनवमीचा उत्सव, मंदिरात सुरू करून त्या उत्सवासाठी खास संगीत नाटके रचली. शुकरंभासंवाद, लोपामुद्रासंवाद, नटसुभद्राविलास व अहिल्योद्धार ही चार नाटके त्यानी स्वतःलिहून या उत्सवात सादर केली. कृष्ण भट्ट बांदकरांची ही नाटके पाहूनच संगीत नाटके रचण्याची स्फूर्ती अण्णासाहेब किर्लोस्कर याना मिळाली असे सांगितले जाते या शिवाय अनेक आख्याने त्यानी लिहिली आहेत. त्यांची सर्वच पदे ही अत्यंत गेय असल्याने ती अल्पावधीतच अत्यंत लोकप्रीय झाल्याची दिसतात.
उदा: विश्वाचा विश्राम रे | स्वामी माझा राम रे||
आनंदाचे धाम त्याचे| गाऊ वाचे नाम रे||
अशी अनेक रसपूर्ण व भक्तीरसाने ओथंबलेली पदे त्यांनी लिहिली आहेत. गोमंतकीय मराठी वाङ्मयाला ख्रिस्ती मराठी वाङ्मयाची देखील एक समृद्ध परंपरा आहे पण तिचा उहापोह या ठिकाणी केलेला नाही. एकूणच प्राचीन गोमंतकीय वाङ्मय हे या ठिकाणच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि इतिहासाचे मोठे वैभव आहे असे निश्चित म्हणता येते.
संदर्भ : १) गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास (खंड पहिला) संपादक: डॉ. वि. बा. प्रभुदेसाई, प्रा. रविंद्र घवी. प्रकाशक : गोमंतक मराठी अकादमी प्रथम आवृत्ती २००३.
विनय बापट
(कार्यालय संचालक,मराठी अध्ययन शाखा,गोवा विद्यापीठ)
vinaybapat.6@gmail.com