अतिशय घरेलू अशा चित्रपटाचे हे नाव आहे. अतिशय सोपे आणि समजेल असेच आहे. कौटुंबिक, सामाजिक चित्रपट आणि त्यात नातेसंबंधाची गोष्ट ही तर आपल्याकडच्या चित्रपट संस्कृतीची अनेक वर्षाची खासियत. पडद्यावर कुटुंबाची गोष्ट आणि समोरच सहकुटुंब तोच पिक्चर एन्जॉय करतेय असा रिअलीटी शो. अशीच बांधिलकी आणि असाच एक कौटुंबिक नाव व कथा असलेला चित्रपट के. बी. तिलक दिग्दर्शित ‘छोटी बहू’ (मुंबईत प्रदर्शन ३ सप्टेंबर १९७१)च्या प्रदर्शनास ५१ वर्षे पूर्ण झाली. त्या काळात देशभरात विभागवार चित्रपट प्रदर्शित होत म्हणूनच मुंबईची तारीख आवर्जून दिली.
आता यात पुन्हा आणखीन काही गोष्टी कशा आहेत ते बघा. राजेश खन्नाच्या जबरदस्त क्रेझमध्ये हा चित्रपट निर्माण झाला, पण तरीदेखील तो ‘नायिकाप्रधान’ आहे. नावच तसे आहे म्हटल्यावर काय हो? बरं या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले तेव्हा सायरा बानू नायिका होती. राजेश खन्ना व सायरा बानू ही अगदीच वेगळी जोडी. कल्पना करा ही जोडी पडद्यावर कशी दिसली असती? पण काही रिळांचे शूटिंग होतेय तोच सायरा बानूच्या जागी शर्मिला टागोर आली आणि राजेश खन्ना व सायरा बानूचा जो एकमेव चित्रपट ठरला असता तो योग हुकला. त्यानंतर कोणत्याच निर्माता व दिग्दर्शकाला ही वेगळी वाटणारी जोडी जमवावी असे वाटलेच नाही. तशी थीम नसेलही.
आपल्या चित्रपटसृष्टीचा एक हुकमी फंडा म्हणजे, सुपर हिट पिक्चरचीच जोडी आपल्याही पिक्चरमध्ये असावी, म्हणजे त्यांचे जमलेले ट्यूनिंग आणि त्यांच्यातील कन्फर्ट झोन आपल्याही पिक्चरच्या मेकिंगच्या पत्थावर पडेल. अशा सुपर हिट जोडीच्या पिक्चरला एकीकडे वितरक मिळेल आणि दुसरीकडे अशा हिट फिट जोडीचा पिक्चर पाह्यला प्रेक्षकांना भारी आवडते. अहो, इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या एकूणच स्वरुपानुसार त्याचे मेन थिएटर कोणते असावे यावरही गणिते असत. आपली चित्रपट पब्लिक संस्कृती अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टीने गुंतलीय आणि हे आपले वेगळेपणही आहे.
‘छोटी बहू’चीच खासियत बघा. याचे निर्माते शंकर बी. सी. हे त्या काळातील मोठे निर्माते व राजेश खन्नाचे खास मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या डिलक्स पिक्चर्स या निर्मिती संस्थेच्या वतीने ‘छोटी बहू’ निर्माण झाला आणि त्यांच्याच बॉम्बे पिक्चर्स रिलीज या वितरणच्या वतीने हा चित्रपट प्रदर्शित झाला.
विशेष म्हणजे, सत्तरच्या दशकातील ही एक खूप प्रतिष्ठित अशी चित्रपट वितरण संस्था होती आणि मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या प्रदर्शनात त्यांचा सहभाग असे. (चित्रपट काढणाराच चित्रपटगृह चालण्याचे व्यवस्थापन पाहतोय हीदेखील एक खासियत.) आणि याच चित्रपटाच्या व्यक्तिमत्वानुसार मुंबईत मेन थिएटर ऑपेरा हाऊस. त्या काळात दक्षिण मुंबईतील मेन थिएटर हा एक भन्नाट प्रकार होता. आता ऑपेरा हाऊस थिएटर म्हणजे हमखास सहकुटुंब मनोरंजक चित्रपट पाहण्याचे हुकमी स्पॉट. आणि राजेश खन्नाची क्रेझ कॅश करण्यासाठी जोडीला मरीन लाईन्सचे लिबर्टीही.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’ (१९६९) सुपर हिट होतानाच राजेश खन्ना व शर्मिला टागोर जोडी जमली. खरं तर शर्मिला टागोर राजेश खन्नाला काही वर्षे सीनियर. म्हणून तर त्यांच्या चित्रपटाची बातमी, जाहिरात, पोस्टर, होर्डींग्स, श्रेयनामावली (टायटल्स) यात शर्मिला टागोरचे अगोदर नाव आणि मग राजेश खन्नाचे. हा क्रम असाच कायम राहिला.
या जोडीने शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’ (१९६९), असित सेन दिग्दर्शित ‘सफर’ (१९७०), के. बी. पाठक दिग्दर्शित ‘छोटी बहू’ (१९७१), शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमर प्रेम’ (१९७२), ए. भीमसिंग दिग्दर्शित ‘मलिक’ (१९७२), यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ ( १९७३), सचिन भौमिक दिग्दर्शित ‘राजा रानी’ (१९७३), बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ (१९७४), दिलदयाल शर्मा दिग्दर्शित ‘त्याग’ (१९७७) या चित्रपटात नायक नायिका साकारली. काही जबरा हिट, तर काही फ्लॉप झाले. (‘त्याग’ फारच रखडत रखडत एकदाचा प्रदर्शित झाला.) तर ‘बदनाम फरिश्ते’ (१९७०) आणि ‘नसीब’ (१९८१) या चित्रपटात प्रमुख पाहुणे होते. ही जोडी आणखीन एका चित्रपटात एकत्र पहायला मिळाली असती, शक्ती सामंता दिग्दर्शित ‘कटी पतंग’ (१९७१) मध्ये शर्मिला टागोर नायिका असणार हे नक्कीच होते. पण या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखांत शर्मिला टागोर आपल्या पहिल्या बाळंतपणाच्या तयारीत होती. म्हणून तिच्या जागी आशा पारेख आली. १९७१ साली शर्मिला टागोरचे ‘छोटी बहू’ आणि बंगाली चित्रपट ‘सीमा बध्द’ हे दोनच चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिने सैफ अली खानला जन्म दिला.
‘छोटी बहू’ची गोष्ट एका गावात घडते. आपला मोठा भाऊ (तरुण बोस) आणि वहिनी (निरुपा रॉय) यांच्या लहान मुलगा यांच्यासोबत राहत असलेल्या डॉक्टर नायकाचे (राजेश खन्ना) लग्न गावातील एका व्यापाऱ्याच्या मुलीशी (शर्मिला टागोर) होते. तिला या लहान मुलाचा आणि त्याला हिचा असा काही लळा लागतो की तो सात वर्षाचा होईपर्यंत तिला आपली आईच समजतो. कालांतराने काही समज, गैरसमज होतात आणि एकूणच नातेसंबंधात विघ्न येते. असे नाट्य म्हणजे हा चित्रपट. अर्थात, चित्रपटाचा शेवट गोड म्हणजे सगळेच गोड हे स्वाभाविक असतेच.
‘छोटी बहू’मधील अन्य कलाकार म्हणजे, निरुपा रॉय, शशिकला, ज्युनियर मेहमूद, मा. सूरज, तरुण बोस, पी. जयराज, सत्येन कप्पू, आय. एस. जोहर इत्यादींच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ‘मुद्दू बिद्दा’ (१९५६) या तेलगू चित्रपटाची रिमेक होता. हा तेलगू चित्रपट बंगाली कादंबरीकार सरतचंद्र चटर्जी यांच्या ‘बिन्दूर छले’ या कादंबरीवर आधारीत होता. एका गोष्टीचा प्रवास कसा कुठून होत असतो ते बघा. राज बलदेव राज यांनी ‘छोटी बहू’चे लेखन केले. इंदिवर यांच्या गीतांना कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत आहे. हे रे कन्हय्या (पार्श्वगायक किशोरकुमार) हे कृष्ण भक्तीचे गाणे फारच लोकप्रिय झाले. ओ मां तेरी मां (लता मंगेशकर) हेही गाणे रसिकांना आवडले.
…. अनेक गोष्टी जमून तर आल्या, पण याची बेरीज जमेची झाली नाही. साध्या सोप्या कथेला पूरक वातावरण आणि राजेश खन्नाला पडदाभर कधी पाहतोय अशी चित्रपट रसिकांची भावना असूनही यशाची गती संथच होती. राजेश खन्नाचे अनेक चित्रपट त्यानंतर मॅटीनी शो आणि रिपिट रनलाही गर्दीत पाहिले गेले तसे या चित्रपटाबाबत झालेच नाही.
एखादा चित्रपट असाही असू शकतो. यु ट्यूबवर आजची पिढी हा चित्रपट पाहू शकेलही. पण पन्नास वर्षांपूर्वी जगण्याची गती संथ लयीत होती, तसेच कौटुंबिक स्वच्छ मनोरंजन करणारे चित्रपटही संथगतीचे होते याचे भान मात्र ठेवा. पूर्वी ‘छोटी बहू’ची गोष्ट चित्रपटाची होती, आज ती एकाद्या मालिकेची असू शकते. प्रश्न असा आहे की, आजच्या ग्लोबल युगातील ‘छोटी बहू’ कशी असेल?
दिलीप ठाकूर