flim actress jaya bachchan celebrate her 75th birthday nrvb
यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ (१९८१) नंतर जया बच्चन यांनी चित्रपटांत भूमिका साकारणे थांबवलं (हा निर्णय कोणाचा हा प्रश्न आता नकोच) आणि गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘हजार चौरासी की मां (१९९८) व्दारे पुनरागमन केले. तरी दोन मुलांचे (अभिषेक व श्वेता) मोठे होणे आणि पतीची वाटचाल यात जया बच्चनची बहुस्तरीय साथ आहेच. आता तर ऐश्वर्या रायची सासू आणि आराध्याची आजी म्हणूनही त्या छान वावरताहेत. ‘अमिताभ बच्चनची पत्नी’ अशी ओळख सुखावणारी असली तरी ती ‘भूमिका’ खरंच सोपी अथवा सरळ नव्हती आणि नाही. त्यात ‘अभिनय’ नव्हे तर ‘संयम’ महत्वाचा ठरला. तीन मोठ्या गोष्टींवरुन ते अधोरेखित होतेय.
मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’च्या बंगलोर येथील सेटवर पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात टेबलाचा कोपरा पोटात शिरल्याने जीवावर बेतलेले मोठेच आजारपण, त्यानंतर इलाहाबाद लोकसभा मतदारसंघात जनता दलाचे हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करुन इंदिरा काँग्रेसचा खासदार म्हणून निवडून आल्यावर ‘मौनी खासदार’ अशी अमिताभवर झालेली टीका आणि बोफोर्स प्रकरणात नाव घेतले जाणे, मग खासदारकीचा राजीनामा, दशकभरानंतर एबीसीएलची स्थापना आणि त्याचे अपयश यात पत्नी म्हणून जयाजींची असलेली साथ हा वेगळाच गुंतागुंतीचा विषय. …आणि अशातच परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत ‘हजार चौरासी की मा’ या चित्रपटाचा मुहूर्त. मोठ्या गॅपनंतर जयाजी चित्रपटांत भूमिका साकारताहेत म्हणून आम्ही सिनेपत्रकार आवर्जून वेळेपूर्वीच हजर. अमिताभ नेहमीप्रमाणेच वेळेवर आला आणि त्याने मुहूर्ताचा क्लॅप दिला… जयाजींची अभिनयातील सेकंड इनिंग सुरु झाली याचे आम्ही सिनेपत्रकार एक प्रकारचे साक्षीदार.
तरी समजा प्रश्न केला, जया भादुरी आणि जया बच्चन यांच्यात फरक काय? व्यक्ती तर तीच आहे, पण अभिनेत्री म्हणून फरक दिसू शकतो. तो दिसतोय.
जया भादुरी (जन्म. ९ एप्रिल १९४८ जबलपूर, मध्य प्रदेश) असं म्हणताच रसिकांच्या एका पिढीला ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी’, राजश्री प्राॅडक्सन्सचा सुधेन्द्रू राॅय दिग्दर्शित ‘उपहार’, बासू चटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर’, गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’ आणि ‘कोशिश’, मनोजकुमार दिग्दर्शित ‘शोर’ या चित्रपटातील ‘जया भादुरी’ डोळ्यासमोर आली असणार. त्या भूमिका तशा होत्याच आणि जया भादुरीचा सकस अभिनयही तसाच होता. हिंदी चित्रपटाच्या नायिकेचं ‘दिसणं’ अधिकच महत्वाचे ठरावे अशाच वळणावर जया भादुरीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताना ‘दिसणे नव्हे तर व्यक्तिरेखा’ म्हणून असणे/ दिसणे महत्वाचे हेच आपल्या कामातून अधोरेखित केले. जया भादुरी हिंदीतील पारंपरिक वळणाची ही पहिली ओळख आणि पन्नास वर्षांपूर्वी हेच वेगळेपण जया भादुरी या नावाला वलय देणारे.
जयाजींच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या चौफेर कर्तृत्वावर थोडक्यात ‘फोकस’ टाकताना सत्तरच्या दशकातील अभिनेत्री आणि त्यातच सुरू झालेला संसारीक जीवनाचा प्रवास असे महत्वाचे वळण दिसतेय.
जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी ‘महानगर’ (१९६३) या चित्रपटात संधी दिली. जया भादुरी पुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय संस्थेत (एफटीआय) प्रशिक्षण घेत असतानाच ह्रषिकेश मुखर्जी यांनी ‘सुमन’ या तेरा मिनिटाच्या लघुपटातील त्यांची भूमिका पाहून ‘गुड्डी’साठी त्यांची निवड केली याचाही एक किस्सा. ऋषिदा जया भादुरीच्या भेटीसाठी पुण्यात एफटीआयमध्ये गेले असता नेमका असरानी भेटला (त्याचीही ऋषिदांच्या चित्रपटांत भूमिका मिळवायची धडपड सुरु होती.) त्याला ऋषिदांनी जया भादुरी कुठे आहे असे विचारताच ती कॅन्टीनमध्ये आहे सांगितले. ऋषिदा तेथे गेले आणि त्यांना ‘गुड्डी’ गवसली.
चित्रपटांत ती धर्मेंद्रची जबरदस्त क्रेझी असते, फॅन असते याभोवती थीम आहे. समित भांजा यात तिचा नायक आहे. ‘गुड्डी’तील (१९७१) जया भादुरीचा परफॉर्मन्स समिक्षक व रसिकांना आवडला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला गुणी अभिनेत्री मिळाली. ऋषिदांची ती फेवरिट अभिनेत्री ठरली. त्यांच्या बावर्ची, मिली, अभिमान, चुपके चुपकेची ती नायिका आहे. तर एक नजर, बन्सी बिरजू या चित्रपटात भूमिका साकारत असतानाच अमिताभ बच्चनशी तिचे नातेसंबंध जुळत गेले आणि मग तिनेच ‘जंजीर’साठी अमिताभची निवड करावी असे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना सुचवले.
‘अभिमान’चे शूटिंग संपल्यावर बंगाली रितीरिवाजानुसार अमिताभ व जया यांचे लग्न झाले (३ जून १९७३). जया भादुरी म्हणून वाटचाल करताना एकीकडे मसालेदार मनोरंजक चित्रपट (जवानी दीवानी, गाय और गौरी, अनामिका, नया दिन नयी रात, दिल दीवाना, समाधी, शोले, नौकर इत्यादी) आणि दुसरीकडे पारंपरिक पठडीतील चित्रपट (कोरा कागज, दुसरी सीता इत्यादी) असा समतोल साधला. तिची भूमिका असलेला ‘अभी तो जी ले’ प्रदर्शित झाला नाही (एफटीआयमध्ये असताना डॅनी डेन्झोपा तिचा चांगला मित्र होता आणि या चित्रपटात ते एकत्र होते.) तर विनोद मेहरासोबतचा ‘आहट’ अनेक वर्ष रखडून पडद्यावर आला.
विशेष म्हणजे, टीनू आनंद दिग्दर्शित बहुचर्चित ‘शहेनशाह’ (१९८८) ची गोष्ट जया बच्चन यांची आहे. … संसारात रमली असतानाच जया बच्चन यांनी अमिताभचे मेकअपमन दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या ‘आक्का’ (१९९५) या मराठी चित्रपटात बच्चन पती पत्नींनी गणपती आरती गीत साकारले. जयाजींना मराठी चांगले येतेय अभिनयाच्या सेकंड इनिंगमध्ये त्यांनी फिजा, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, द्रोणा, लागा चुनरी मे दाग इत्यादी चित्रपटात भूमिका साकारलीय.
जयाजी समाजवादी पक्षाच्या राज्यसभेवर आता चौथी टर्म खासदार आहेत. त्यातील एक टर्म रेखा व जया बच्चन एकत्र होता. जया बच्चनवर फोकस टाकताना रेखाचा विषय आपोआप येतोच. तो ‘सिलसिला’ स्वाभाविक म्हणायचा. तो विषयच वेगळा. आपण पंचाहत्तरीनिमित्त जया बच्चन यांना शुभेच्छा देऊयात. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अष्टपैलू अभिनेत्री हे त्याचे विशेष असून भारत सरकारने त्यांना १९९२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com