ऑलिम्पिक ही अर्थातच जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा. अनेक खेळांमध्ये शेकडो देशांचे हजारो खेळाडू या मानाच्या स्पर्धेत आपलं कसब आजमावतात. या ऑलिम्पिकखालोखाल काही स्पर्धांना त्या-त्या देशांच्या गटात विशेष महत्त्व असतं. अशापैकी एक म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत कॉमनवेल्थ देशांचे खेळाडू दोन हात करतात.
कॉमनवेल्थ कंट्रीज् म्हणजे एकेकाळी इंग्लंडच्या राणी/राजाच्या अधिपत्याखाली असलेले देश. आता इंग्लंडची बहुतांश संस्थानं खालसा झाल्यामुळे कॉमनवेल्थचा अर्थ केवळ प्रतिकात्मक राहिलाय हे खरं… मात्र या स्पर्धांच्या निमित्तानं जगातल्या पन्नास-एक देशांचे खेळाडू एकत्र येतात.
यंदा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरानं या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारलंय. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या मिनी ऑलिम्पिकमध्ये १९ क्रीडा प्रकारांचे १४१ इव्हेंट्स होतील. यात भारताचा २१५ खेळाडूंचा तगडा संघ उतरलाय. यात अर्थातच हॉकी, क्रिकेट हे संघ आहेत आणि अनेक वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये नावाजलेले खेळाडूही आहेत. यातल्या काही जणांकडून पदकांची (खरंतर सुवर्णपदकांची) अपेक्षा भारतीय क्रीडारसिकांना आहे.
भारताची आघाडीची बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू सध्या जाम फॉर्ममध्ये आहे. सिंगापूर ओपन जिंकल्यामुळे तिचा आत्मविश्वास कैक पटींनी वाढला असणार यात शंका नाही. त्यात महिला बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले चीन आणि जपान हे देश कॉमनवेल्थमध्ये नाहीत. त्यामुळे बर्मिंगहॅमचा पेपर सिंधूसाठी तसा सोपा आहे. वर्ल्ड चॅम्पियन सिंधूकडे दोन ऑलिम्पिक पदकं आहेत. कॉमनवेल्थ पदकानं तिला आतापर्यंत कायम हुलकावणी दिलीये. २०१८मध्ये खुद्द सायना नेहवालकडून पराभव स्वीकारत तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. यंदा मात्र सिंधूचा फॉर्म बघता तिला गोल्ड मेडल गळ्यात अडकवण्याची पूर्ण संधी आहे.
भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू २०१८च्या कॉमनवेल्थ गेम्सची चॅम्पियन आहेच, पण २०१४मध्येही तिनं ४८ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. त्यानंतर ऑलिम्पिकचं सिल्व्हर मेडलही मीराबाईनं आपल्या नावे केलं. आपल्या कामगिरीमधलं सातत्य कायम राखण्याच्या इराद्यानंच मीराबाई बर्मिंगहॅमला गेलीये. आपल्या कामगिरीतलं सातत्य कायम राखून विजेतेपद कायम ठेवण्याची मीराबाईकडून रास्त अपेक्षा आहे.
भरवशाचा रेसरल बजरंग पुनिया याच्याकडून पुन्हा एकदा आशा आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावल्यानंतर आपलं कॉमनवेल्थचं अजिंक्यपद कायम ठेवण्याच्या इराद्यानं बजरंग रिंगमध्ये उतरले. २०१४मध्ये ग्लासगोमध्ये ६१ किलो वजनी गटात मिळवलेलं सिल्व्हर मेडल त्यानं २०१८च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्ये ६५ किलो वजनी गटात गोल्डमध्ये अपग्रेड केलं. विनेश फोगाटला गेले काही महिने जड गेलेत हे खरं; मात्र २ वेळा कॉमनवेल्थ चॅम्पियन झालेली विनेश कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकेल. तिच्या कामगिरीकडेही देशाचं लक्ष असेल.
२०१८च्या कॉमनवेल्थ गेम्सची टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बात्रा यावेळीही गोल्ड मेडलसाठी फेव्हरिट मानली जातेय. या स्पर्धेत मनिकानं वैयक्तिक गोल्ड, टीम इव्हेंटमध्ये गोल्ड, वुमेन्स डबल्समध्ये मौमा दासच्या साथीनं सिल्व्हर आणि साथियन ग्यानशेखरन याच्या साथीनं मिक्स डबल्समध्ये ब्राँझ मेडल जिंकलं होतं. हाच ऑलराऊंड परफॉर्मन्स मनिका कायम राखेल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांत तिनं कुठली मोठी स्पर्धा जिंकली नाहीये, हे खरंय. मात्र कॉमनवेल्थ गेम्स हा तिचा आवडता प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे ती गोल्ड कोस्ट गेम्सची पुनरावृत्ती करेल, अशी अशा करूया.
ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रानं कॉमनवेल्थ गेम्सआधीच देशवासियांना जल्लोष करण्याची संधी दिली. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत त्यानं देशाला प्रथमच गोल्ड मेडल मिळवून दिलं. लांबउडीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिच्यानंतर या व्यासपीठावर पदक कमावणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरलाय. मात्र, हा थ्रो करताना त्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार घ्यावी लागलीये. वर्ल्ड चॅम्पियनशिपचा गड आला, पण कॉमनवेल्थमध्ये आता या सिंहाला खेळता येणार नाहीये. त्यामुळे कॉमनवेल्थचं गोल्ड मेडल स्वतःकडे कायम राखण्याचं निरजचं स्वप्न धुळीला मिळालंय.
इंग्लंडमध्ये जन्माला आलेलं क्रिकेट कॉमनवेल्थ गेम्समध्ये परतलंय तेदेखील आपला चेहरामोहरा बदलून. १९९८च्या क्वालालंपूर कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अर्थात त्यावेळी वन-डे सामने खेळले गेले होते. यंदाच्या बर्मिंगहॅम गेम्समध्येही पुन्हा क्रिकेट दिसणार आहे. पण दोन मुख्य फरक आहेत. एकतर आता टी-२० सामने खेळवले जाणार आहेत आणि मुख्य फरक म्हणजे पुरूष नव्हे, तर ८ महिला संघ या स्पर्धेत दोन हात करतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघासह अ गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोसचे संघ आहेत. तर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या टीम्स आहेत. अर्थातच, हरमनप्रीतचा संघ फेव्हरिट मानला जातोय.
याखेरीज अर्थातच भारताचे दोन्ही हॉकी संघ बर्मिंगहॅममध्ये आपलं कसब पणाला लावतील. शिवाय इतर प्रकारांमधील खेळाडूंनाही पॅरीस ऑलिम्पिकपूर्वी आपला खेळ उंचावण्याची संधी कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्तानं मिळालीये. ते या संधीचं सोनं करतील, यात शंका नाही. भारताच्या सर्व २१५ खेळाडूंनी २०२२च्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भरपूर सोनं लुटावं, या शुभेच्छा!
sportswriterap@gmail.com