सातत्यानं चांगली कामगिरी आणि थोडी नशिबाची साथ असेल, तर आपलं उद्दिष्ट साध्य करता येतं. यंदाच्या सिंगापूर ओपनमध्ये भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट पी. व्ही. सिंधू हिची कामगिरी ही अशीच सातत्य आणि नशिबाची साथ याची सांगड घालणारी ठरली. सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनची चॅम्पियन होऊन ती सिंगापूरमध्ये दाखल झाली… प्रामुख्यानं सामना होता तो जपानी आणि चिनी खेळाडूंशी. सेमीफायनलमध्ये जपानच्या सीना कावाकामी हिचा सहज पराभव केला. पण कावाकामी तिला प्रतिस्पर्धी लाभली ती केवळ नशिबानं…
खरंतर सिंधू ही ‘टॉप हाफ’ ड्रॉमध्ये होती. सुरूवातीच्याच फेऱ्यांमध्ये सिंधूची स्पर्धा अव्वल खेळाडूंशी होती. मात्र, वर्ल्ड नंबर १ ताई झू यिंग ही चीनची खेळाडू दुसऱ्या फेरीत जायबंदी झाली. त्यामुळे कावाकामीसोबत सामना तिला सोडून द्यावा लागला. दुसऱ्या राऊंडला व्हिएतनामच्या गुयीन थू लिन हिनं सिंधूला झुंजवलं. पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूनं कमबॅक केलं. क्वार्टर फायलनमध्येही चीनच्या हान यू हिच्यासोबतचा सामना तिसऱ्या गेममध्ये गेला. मात्र, आपलं टेम्परामेंट कायम राखत सिंधूनं शांतपणे खेळ केला. या खेळाच्या आधारे ताई झू यिंगनं वॉक ओव्हर दिलेल्या कावाकामीला तिनं सेमीफायलमध्ये २१-१५, २१-७ असं पराभूत केलं. पण फायनल मात्र तिनं संपूर्णतः स्वतःच्या हिमतीवर जिंकली.
चीनची वांग झी ही काही तशी तगडी खेळाडू नाही. पण एकूणच चिनी प्लेअर्सचा आक्रमक बाणा पाहता सिंधूला हा सामना सोपा जाणार नव्हता, हेदेखील खरंच होतं. झालंही तसंच… सिंधूनं पहिला गेम २१-९ अशा मोठ्या फरकानं जिंकला खरा, मात्र दुसऱ्या गेममध्ये तिला ११-२१नं मात घ्यावी लागली. अशा स्थितीत मनाची शांतता ढळू न देता तिनं आपला सर्वोत्तम खेळ सुरू ठेवला आणि तिसरा गेम आणि सिंगापूर ओपनचं अजिंक्यपद २१-१५नं खिशात टाकलं. सिंधूच्या या विजयामुळे भारतीय महिला बॅडमिंटनला नवी उभारी मिळेल, यात शंका नाही.
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंमध्ये सर्वात जास्त नाव कमावलं ते सायना नेहवालनं. तिच्या आयुष्यावर एक सिनेमाही निघालाय. अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुट्टा अशा काही प्लेअर्सनी यापूर्वी काही प्रमाणात चांगली कामगिरी केलीये. मात्र त्यांच्या विजयामध्ये सातत्य नव्हतं. ज्वाला तर बॅडमिंटनपेक्षा मॉडेलिंगवर अधिक लक्ष देत असल्याची चर्चाही होते. सायना या सर्वांचा खूप पुढे गेली. सायनाच्या जडणघडणीत तिचा माजी प्रशिक्षक पी गोपीचंद यांचं मोठं योगदान आहे. पुढे गोपीचंद यांनीच सिंधूवर विजयाचे संस्कार केले. हैदराबाद आणि महिला बॅडमिंटन हे समीकरण जोडलं गेलं ते याच काळात… या दोघींकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी बॅडमिंटनमध्ये येऊ लागल्यात.
छत्तीसगडची आकर्षी कश्यप, नागपूरची मुग्धा आग्रे, आसामची अस्मिता चालिहा, पी गोपीचंद यांची कन्या गायत्री, मालविका बनसोड अशा अनेक तरूण, तडफदार खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतायत. महिला खेळाडूंकडे पाहण्याचा आपला (म्हणजे प्रेक्षकांचा आणि एकूण देशाचा) दृष्टीकोन या कन्यांमुळे बदलतोय. अर्थात, क्रिकेट, हॉकी, फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमध्ये हा टप्पा गाठायला बराच वेळ लागेल हे खरं. मात्र सायना, सिंधू, भारताची आघाडीचे टेनिसपटू सानिया मिर्झा, बॉक्सर मेरी कोम, अॅथलिट दीपा कर्माकर या भारतकन्यांमुळे निदान वैयक्तिक खेळांमध्ये तरी महिला खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. सिंधू सध्यातरी या सर्वांमध्ये सरस आहे. त्यामुळेच तिच्याकडून अपेक्षाही आहेत.
येत्या काही दिवसांत होणारी तैपेई ओपन सिंधू खेळणार नाहीये… अर्थात, या स्पर्धेपासून दूर राहायचा निर्णय तिनं स्वतःहून घेतलाय. याच महिनाअखेरीस बर्मिंगहॅम इथे कॉमनवेल्थ गेम्स होऊ घातले आहेत. तिनं यापूर्वी याच स्पर्धेत दोन सिल्व्हर मेडल जिंकली आहेत. आता तिचं लक्ष्य आहे ते सुवर्णपदकाकडे… त्याची तयारी करता यावी, थोडा अधिक सराव करता यावा यासाठा तिनं तैपेईतून माघार घेतली आहे. (सिंधू नसल्यामुळे आता भारतीय संघाची कर्णधार सायना नेहवाल हिला तैपेई जिंकण्याची अधिक संधी आहे.) त्यानंतरही सुपर ७५०, सुपर १००० स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करून आपलं रेटिंग सुधारण्याचा तिचा प्रयत्न असेल. २७ वर्षांच्या सिंधूमध्ये अद्याप बरंच बॅडमिंटन शिल्लक आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तिच्याच भाषेत सांगायचं तर सिंगापूर ओपन स्पर्धा ही रोलर कोस्टर राईड होती. कधी बिकट प्रसंग, तर कधी सहज सोपे विजय. पण आपला संयम ढळू न देता सिंधूनं विजय खेचून आणला, याकरता तिचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी अर्थातच देशवासियांच्या वतीनं शुभेच्छा…
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे जगभरात एकूण २६ स्पर्धा खेळवल्या जातात. यातल्या तीन स्पर्धा सुपर १००० आहेत, तर पाच स्पर्धा या सुपर ७५० आहेत. सात स्पर्धा सुपर ५०० म्हणून ओळखल्या जातात आणि त्यात सिंगापूर ओपन मोडते. उरलेल्या ११ स्पर्धा सुपर ३०० आहेत. यातल्या कोणत्या स्पर्धेत कशी कामगिरी होते, त्यानुसार पॉइंट मिळतात आणि त्या प्रमाणात खेळाडूचं रेटिंग सुधारतं. त्यामुळेच ही सुपर ५०० स्पर्धा जिंकणं सिंधूसाठी महत्त्वाचं मानलं जातंय.
sportswriterap@gmail.com