Peter Brook father of dramatists nrvb
नाटकवाल्यांचा बापमाणूस’ अशी ओळख असलेले पीटर ब्रुक काळाच्या पडद्याआड गेले. हिंदुस्थानी संस्कृतीतल्या महाभारतातील पात्रे आणि कथानक उभ्या जगापर्यंत पोहचविण्याचे ऐतिहासिक नाट्यकार्य त्यांनी केले. चौकट रंगभूमी पार करून त्या पलिकडेही रंगमंच असल्याचा सिद्धांत मांडून त्यांनी तो सिद्ध केला. जागतिक रंगभूमी एका ऋषीतुल्य तपस्वीला मुकली आहे.
नाट्यतज्ञ डॉ. कृ. रा. सावंत यांच्या नाट्यशिक्षण केंद्रात उमेदवारी करीत असताना पुस्तकरूपाने सर्वप्रथम पीटर ब्रुक या दिग्दर्शकाचा, त्यांच्या कारकीर्दीचा परिचय झाला. पुढे डॉ. सावंत यांच्या लंडन मुक्कामीच्या नाट्यअभ्यास दौऱ्यानंतर तर ‘पीटर ब्रुक आणि त्यांचे दिग्दर्शन कौशल्य’ यावर एक अभ्यास म्हणून जवळून बघण्याचा योग जुळला गेला. प्रत्यक्ष भेट न होताही एकूणच या बापमाणसाबद्दल जिव्हाळ्याचं नातं नकळत जुळलं गेलं. त्यात ‘नाटक’ हा एक पूल ठरला…
प्रायोगिक रंगभूमीवरल्या हालचाली परदेशात एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस खऱ्या अर्थाने सुरू झाल्या. त्याला ओळख मिळाली. स्टॅनिस्लाव्हस्की तसेच मेयर होल्ड यांचे सिद्धांत आणि त्यातून आकाराला आलेली नाटके. असा हा रंगप्रवास.
थिएटर, स्टुडीओ, पुस्तके यांना नवे अर्थ त्यातूनच मिळाले. नाट्याची प्रात्यक्षिके किंवा पडताळणीसाठी स्वतंत्र असा स्टुडीओ, मैदान ही नवी संकल्पना पुढे आली. आर्तोनं ‘थिएटर अँड इटस् डबल’ आणि ग्रोटोस्कीन ‘टोअर्स पूअर थिएटर’ हे नाट्यविषयक ग्रंथातून प्रायोगिक नव्या रंगभूमीवर विवेचन केलं. पण पीटर ब्रुक यांनी हेच कार्य प्रत्यक्ष अस्तित्वात आणले. पुढे वर्कशॉप, स्ट्रीट प्ले, प्रेक्षकांचा थेट सहभाग, संवाद – यातून ही चळवळ चालविली…
पीटर ब्रुक. एक भन्नाट व्यक्तिमत्त्व. नाटकासाठीच जन्माला आलेलं. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १९४६ या वर्षी शेक्सपिअरच्या नाटकाने त्याला अक्षरशः झपाटून टाकले होते. ‘लव्हज लेवर लॉट’ या नाटकाचे त्याने सादरीकरण करून एका महोत्सवात साऱ्यांना हादरून सोडले. ‘नाटक असंही सादर होऊ शकतं!’ हे त्यांनी सादरीकरणाच्या नव्या शैलीतून मांडले.
केवळ शेक्सपिअरच्या संहितेपुरतं आता मर्यादित राहून चालणार नव्हतं तर चेकॉक, ब्रेख्त, बर्नाड शॉ यांच्याही सहितांना नाट्यरूप दिले. अगदी ‘रंगमंचा’साठी वाट न बघता जिथे माणसं आहेत, तिथपर्यंत त्यांनी नाटक पोहचवले. फुटपाथ, खाण, रेल्वेस्टेशन, बगीचा, शाळा, मैदान… जिथे सादर करता येईल तिथे नाटक नेलं!
‘कोणत्याही मोक्याच्या जागेवर मी रंगमंच उभारू शकतो. अवकाला अर्थ देण्याची क्षमता माझ्या नाटकात आहे…’ हे त्यांचे बोल प्रत्येक रंगकर्मीला आत्मविश्वास देणारे होते आणि आहेत.
‘महाभारत’ हा हिंदूंचा पवित्र पौराणिक ग्रंथ. त्यावर आधारित एक महानाट्य. ही त्यांनी दिलेली एक भेट म्हणावी लागेल. महाभारताचे नाट्यांकन दोन मध्यंतरात त्यांनी उभे केले. एकूण नऊ तासांचे नाट्य आणि दोन तासांचे मध्यंतर म्हणजे चक्क अकरा तास रसिकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात होते. अनेक भाषेत त्याचे पाच एक वर्षे प्रयोग होत होते.
पहिल्यांदा फ्रेंच भाषेत नंतर इंग्रजीत त्यानंतर देशाप्रमाणे भाषा बदलली. ‘भाषा’ हा ‘ब्रुक’ यांचा कधीही अडसर नव्हताच. कारण भाषेपेक्षा त्यांनी त्यातील नाट्याला कायम प्राध्यान्य दिले. नवी शैली निर्माण केली. नव्या संकल्पना मांडल्या. ‘महाभारत’ जगापर्यंत पोहचले…
आता त्यातील कलाकार हे देश-विदेशातले होते. १६ देशातील २१ रंगकर्मींनी यात भूमिका केल्या. त्यात मल्लिका साराभाई या भारतातील एकमेव रंगकर्मीने द्रौपदीची प्रमुख भूमिका केली. मुंबईत एनसीपीएत ‘महाभारता’च्या प्रयोगानिमित्त एक रंगकर्मीसाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती, त्यात विजय केंकरे यांचा सहभाग होता.
व्यासांनी लिहिलेली एक पुराणकथा जरी असली तरी त्याला आजचे संदर्भ जोडण्यात त्यांच्यातील अभ्यासू दिग्दर्शक यशस्वी झाल्याचा प्रत्यय यात आला. रसिकांना गुंतवून ठेवण्याचा करिश्मा महाभारताप्रमाणेच त्यांच्या इतर अनेक नाटकात होता.
१९८५ हे वर्ष. व्हिएतनाममध्ये युद्धाचे ढग भरले. तणाव वाढला आणि बघता बघता दोन्ही बाजूंनी हल्ले सुरु झाले. पण ब्रुक यांचं लक्ष महाभारताकडे होते. पॅरिसच्या रंगमंचावर त्यांनी ‘महाभारताचा’ प्रयोग केला. ‘शांतता की युद्ध’ हा सवालही कथानकातून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत मांडला. जो आजही कायम आहे. नाटकाचा प्रयोग एका उंचीवर त्यांनी नेला.
नाटकावर आधारित ‘महाभारत’ हा पाच तासांचा चित्रपटही त्यांनी प्रदर्शित केला. महाभारताच्या संहितेने त्यांना भारावून सोडले होते. पॅरिसमध्ये इंटरनॅशनल ‘सेंटर फॉर थिएटर रिसर्च’ची त्यांनी स्थापना केली. त्यांची अनेक नाटके, चित्रपट, ग्रंथ, नाट्यसिद्धांत म्हणजे संशोधनाचा विषय ठरेल.
‘मराठी नाटक’ हा ब्रुक यांचा कुतूहलाचा विषय बनला. त्यांनी मुंबईत घेतलेली कार्यशाळा आणि मुंबईतली प्रायोगिक मराठी रंगभूमी याबद्दल ते बोलत असत. त्यांनी लंडन येथे झालेला ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग खास उलट-सुलट प्रवास करून बघितला होता. डॉ. मोहन आगाशे हे ब्रुक यांच्या संपर्कात होते. ‘रंगभूमीवर नवीन काय चाललंय?’ याची विचारणा ब्रुक कायम करायचे.
जागतिक रंगभूमीविषयक घडामोडींकडे त्यांचे कायम लक्ष असायचे. त्यामुळे सातासमुद्रापार असलेला हा ‘माणूस’ सर्व नाटकवाल्यांना हक्काचा, कुटुंबातील वडीलधारी वाटायचा. त्यांच्या आत्मचरित्रातले एक वाक्य जे भारताबद्दल त्यांच्या अंतर्मनातलं होतं. ते म्हणजे-’जिथे जगातल्या सगळ्या कालखंडाचा इतिहास हा एकत्रपणे आजही हातात हात घालून नांदतो.
तो देश म्हणजे एकमेव भारत!’ त्यांनी महाभारताच्या निर्मितीच्या निमित्ताने आपल्या ‘टीम’सह उभ्या भारतात भटकंती केली होती… लोककला संस्कृती जवळून बघितली होती.
विजया मेहता यांनीदेखील ब्रुक यांना गुरुस्थानी मानलंय. त्यांच्यासोबत उभ्या भारतभर त्यांनी प्रवास केलाय. एक महिला दिग्दर्शिका म्हणूनही ब्रुक यांनी विजयाबाईंचं, त्यांच्या नाट्यकृतींचं भरभरून कौतुकही केलय. दिल्लीत ‘हदयवदन’चा प्रयोग ब्रुक यांनी बघितला होता. ‘नट आणि प्रेक्षक’ यांच्यात एका आगळ्या-वेगळ्या श्रद्धेचं नाटक असतं हे ब्रुक यांनी समर्थपणे आकाराला आणलं. जर्मन आणि मराठी भाषेतल ‘हदयवदन’ नाटकाचं दिग्दर्शन करतांना विजयाबाईंवर ब्रुक यांच्या दिग्दर्शनाचा प्रभाव होता. हे खुद्द बाईंनीच एका भेटीत सांगितलं होतं…
ब्रुक यांचे ‘द एमटी स्पेस’ हे पुस्तक हे नाट्यगुरु. डॉ. सावंत यांनी नाट्यशिक्षण केंद्रातून एकेकाळी आम्हा नाट्यअभ्यासकांना ‘अभ्यास’ म्हणून दिले होते. याचेही स्मरण यानिमित्ताने झाले. प्रत्येक नाट्यअभ्यासकाने हे पुस्तक संग्रही ठेवावे, असा त्यात मोलाचा संग्रह आहे. जे नाट्यतंत्रावर अनुभवाच्या जोरावर भाष्य करतेय. आज ते नाट्य अभ्यासकांचे क्रमिक पुस्तकच बनलय.
योगायोग विचित्रही असतात गेल्याच वर्षी म्हणजे २०२१ या वर्षात पीटर ब्रुक यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब दिला.
या पुरस्काराने त्यांच्या नाट्यकार्याचा गौरव केला आणि आज २०२२ यावर्षी ब्रुक काळाआड गेले. त्यांच्या ९७ वर्षाच्या कारकीर्दीतला हा अखेरचा सर्वोच्च सन्मान ठरला, त्यामुळे साऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे पुन्हा एकदा वेधले गेले. त्यांच्या नाट्यकृतींना उजाळाही मिळाला. ‘महाभारत’ हे महानाट्य त्यांनी भारतासह जगाला दिलेली अर्थपूर्ण संस्कृतीरक्षक अशी अनोखी भेट जणू व जशी ठरलीय.
– नाटकवाल्यांच्या एका बापमाणसाला विनम्र वंदन!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com