फुलवा… नावाप्रमाणेच तिच्या नृत्यातही मोहवून टाकणारा वेगळेपणा आहे. त्यामुळेच फुलवाचं परिपूर्ण आणि बहारदार नृत्य पाहणाऱ्या प्रत्येक रसिकाच्या मनाची स्थिती ‘नटरंग’ चित्रपटातील ‘अप्सरा आली…’ या गीतातल्या ‘मी यौवन बिजली पाहून थिजली, इंद्रसभा भवताली’ या ओळींसारखीच होते. फुलवाची नृत्यातील ऊर्जा, लयबद्ध हालचाल यामुळे तिची प्रत्येक कलाकृती नेहमीच प्रशंसनीय ठरली आहे.
शालेय जीवनात असताना फुलवानं श्री समर्थ व्यायाम मंदिर येथून जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण घेतलं. पुढे १०-१२ वर्षांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील उत्कृष्ट योगदानासाठी फुलवाला महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तालबद्ध जिम्नॅस्टिकमध्ये संगीताच्या तालावर हालचाली करतानाच फुलवाचा नृत्याकडे ओढा वाढू लागला. फुलवाचे आजोबा शाहीर अमर शेख यांच्या कलापथकातच तिची आई डौलदार, सुंदर नृत्य करायची तसेच नृत्य दिग्दर्शनही करायची. कलासक्त आईकडूनच फुलवाला नृत्याचा वारसा मिळाला.
जिम्नॅस्टिक्समधील एक खेळाडू, प्रशिक्षक आणि सामनाधिकारी म्हणून फुलवानं १०-१२ वर्षं उल्लेखनीय कारकीर्द घडविली. महाविद्यालयीन जीवनात सोनी टीव्हीवरील ‘बुगी वुगी’ या नृत्यपर रिॲलिटी शोमध्ये फुलवानं नृत्य दिग्दर्शन केलं आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. २००८ मध्ये ती ‘एकापेक्षा एक’ या रिॲलिटी शोमध्ये आली.
यानंतर पुढे २०१०मध्ये ‘नटरंग’ हा चित्रपट तिला मिळाला आणि तिच्या चित्रपट नृत्यदिग्दर्शक या नव्या वाटचालीला सुरुवात झाली. पुढे नृत्य सादरीकरणाबरोबरच फुलवानं उत्तम नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. या यशाचं सारं श्रेय तिने सर्वप्रथम आपल्या जिम्नॅस्टिक्स खेळाला दिलं आहे.
आपल्या खेळाविषयीच्या भावना व्यक्त करताना फुलवा म्हणाली, ‘जिम्नॅस्टिक्समध्ये एखाद्या बीमवर फळी असते. त्यावर कसरत करताना ती एका ओळीत येण्यासाठी तुमचे शरीर नियंत्रण, तुमची लवचिकता, एकाग्रता, तुमचं लक्ष केंद्रित असणं या सगळ्या गोष्टी सतत करून तुमच्या मेंदूपर्यंत त्या पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं.’
फुलवानं गेली अनेक वर्षं नृत्यदिग्दर्शिका म्हणून जम बसवला असतानाच ‘मासा’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शिका म्हणून नवीन वाटचाल सुरू केली आहे. ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं’ ही फुलवानं दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाची दखल घेतली आहे. याबाबत ती म्हणाली, ‘मी इतकी वर्षं नृत्य दिग्दर्शित करतेय. मला लक्षात आलं की हे माध्यम आपल्याला खूप आवडतंय आणि एखादी गोष्ट आवडली की मग ती ध्यास घेऊन करायची, हे माझ्या स्वभावातच आहे.
मला स्वतःलाही वाटू लागलं की मी एवढी वर्षं या क्षेत्रात काम करतेय. मला कॅमेऱ्याची सवय आहे. पण मग त्यासाठी एखादा लघुपट करणं गरजेचं आहे का? यावेळी माझा भाऊ राही आणि माझा मित्र अभिनेता-लेखक संदेश कुलकर्णी या दोघांनीही मी चित्रपट दिग्दर्शित करावा म्हणून खूप प्रोत्साहन दिलं.
लघुपटासाठी संदेशने काही कथा लिहिल्या. त्यातील ‘मासा’च्या कथेतला आशय मला खूप भावला आणि मी हा लघुपट दिग्दर्शित करायचं ठरवलं.’ संदेश, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, वज्र पवार, नयन जाधव हे ताकदीचे कलाकर स्वतःहून पुढे आले. संगीतकार नीलेश मोहरीर, कला दिग्दर्शक दिलीप मोरे, अमोल, प्रज्ञा दुगल आणि पती अमर खामकर या सर्वांचंच मोलाचं सहकार्य मिळाल्याचं फुलवा सांगते. नागाव इथे चित्रीकरण झालेल्या या लघुपटात सासू-सुनेच्या नात्यातील गुंतागुंत हळूवारपणे मांडली आहे.
फुलवासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि दिग्दर्शक म्हणून तिची क्षमता सिद्ध करणारा ठरला आहे.
अनघा सावंत
anaghasawant30@rediffmail.com