अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या खेम्यात आणली. शरद पवार यांच्या जवळचे, त्यांचे निष्ठावंत आणि त्यांच्यासोबत अनेकवेळा भूमिका बदलणारे नेतेही अजित पवार यांच्यासोबत आले. भाजपमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून अजित पवार आले असतील, असे नाही. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद मिळवला तर अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा होती. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला योग्य म्हणा आणि पुढच्या वाटचालीस आशीर्वाद द्या, हे मागणे घेऊन पुतण्याने काकांची दोनदा मनधरणी केली. अजित पवार यांची संपूर्ण कारकिर्द डावावर लागलेली असल्यामुळे कदाचित त्यांनी इतरही अनेक माध्यमातून आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्याही माध्यमातून कदाचित काकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असेल. पण अजित पवारांच्या बंडाला तिथेच विरोध करून नव्याने सगळी बांधणी करण्याचा जाहीर संकल्प केलेले शरद पवार अविचल राहिले. तिथूनच खर्या अर्थाने या डावाला सुरुवात झाली.
अजित पवार यांनी टाकलेल्या पहिल्याच डावाला शरद पवार यांनी उलटवून लावत, पाठोपाठ अनेक डाव टाकले. अत्यंत आक्रमकपणे एकापाठोपाठ एक घेतलेल्या सभा असोत किंवा इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीसाठीचा पुढाकार, शरद पवार यांनी संपूर्ण आखाडाच अंगावर घेतला. ही लढाई भाजप विरुद्ध अजित पवार नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची राहू न देता त्यांनी भाजप किंवा राज्यातील महायुती विरुद्ध शरद पवार अशी करून टाकली.
भाजपसोबत आलेले शिंदे आणि त्यानंतर अजित पवार ही महायुतीची मोठी शक्ती तयार झाली. सगळ्याबाजुने कोंडी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पिछाडली. त्याचवेळी आता काँग्रेस वगळता कोणी फारसा विरोधक नाही, असे भाजपला वाटत असताना शरद पवार यांनी घेतलेली आघाडी आणि महायुतीला थेट दिलेले आव्हान यामुळे भलेभले चाणक्य गांगरुन गेलेले दिसू लागलेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढाकार घेणार्या शरद पवारांनी सगळ्याच आघाडीवर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसमोर आव्हान उभे केले आहे. महायुती विरुद्ध हा ज्येष्ठ नेता, असे चित्र उभे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांसमोर एकास एक असे आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. मुंडे, भुजबळ, मुश्रीफ यांच्याविरुद्ध एकेक तगडा स्पर्धक समोर आणत शरद पवार यांनी त्यांच्याच एकेकाळच्या शिलेदारांना गोत्यात आणले.
थोरल्या पवारांनी पुतण्याची उणी – दुणी काढण्याऐवजी आजुबाजुने त्यांच्या शिलेदारांना घेरण्यास सुरुवात केली. भुजबळांवर येवल्यात त्यांनी आगपाखड केली. त्यानंतरचे कितीतरी दिवस भुजबळांना त्याबाबत खुलासे करत रहावे लागले. ज्येष्ठ पवारांवर भुजबळ वैयक्तिक टिका करु शकत नाहीत. कारण त्यांना ‘विठ्ठला’वर आमची श्रद्धा कायम आहे, हे दाखवावेच लागणार आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी किंवा मुंडे यांचा तगडा स्पर्धक असलेल्या बबन गित्ते यांना पवारांनी बळ दिले. अनेक वर्षांपासूनचा मुंडे यांचा स्पर्धक राष्ट्रवादीत घेत शरद पवार यांनी मुंडे यांना जागच्या जागी खिळवून ठेवले. येणार्या कोणत्याही निवडणुकीत मुंडे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार, हे नक्की. ज्या प्रमाणे येणार्या काळात भुजबळांना जसे येवल्यात अडकून रहावे लागेल, तसेच मुंडेना परळीबाहेर लक्ष घालणे कठीण होईल. तिकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि अनेक वर्षांपासून भाजपला दोन खासदार देणार्या जळगावात खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी केली आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना पवारांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. तर जळगावात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे कडवे विरोधक बी. एस. पाटील यांना पक्षात घेतले आहे. त्याच व्यासपीठावर राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना लोकसभेचीही ऑफर दिली. कोल्हापुरातही हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पवारांनी शड्डू ठोकले. शरद पवार यांच्या आतापर्यंत झालेल्या सभा पाहता त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणण्यापेक्षा भाजपला आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. ज्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सगळी तोडफोड सुरु आहे, तिच निवडणूक त्यांना कठीण करण्यासाठी हे डावपेच दिसताहेत.
अजित पवारांसोबत भाजपच्या वळचणीला गेलेल्या मोठ्या नेत्यांच्या विरोधातील त्यांचे सक्षम विरोधक समोर आणत असतानाच शरद पवारांनी कांद्याचे भाव किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा तापवत ठेवला आहे. महायुतीमध्ये या दोन्ही मुद्द्यांमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तर चक्क काटेवाडीत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी झाली. यावरुन विरोधातील वातावरण कुठपर्यंत तयार झाले आहे, हे लक्षात यायला हवे. महायुतीकडे असलेले प्रभावी नेते, ओबीसी नेते किंवा राज्यात ज्यांच्या जातीचे काही मतदान त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे, अशांना त्यांच्या मतदारसंघात बंदिस्त करून ठेवण्याचा एक प्रयत्न या सगळ्यामागे आहे. ओबीसी मतदारांमध्ये असंतोष वाढविण्यासह त्यांच्या संपर्कातील महायुतीच्या नेत्यांना आपापल्या तगड्या स्पर्धकांशी लढण्यात गुंतवून ठेवण्याची ही खेळी सुरु झालीय.
एकीकडे काहीही झाले तरी लोकसभा जिंकायची, मिशन 45 प्लस अशा घोषणा सुरु असताना दुसरीकडे एकेक मतदारसंघ बारीक पोखरून तिथे सुरुंग पेरण्याचे काम थोरल्या पवारांनी सुरु केले आहे. त्याचवेळी इंडियाला बळ देत सगळ्या पक्षांमध्ये समतोल राखण्याचीही त्यांची धडपड आहे. तर अद्याप पवार सोबत असल्यामुळेच उद्धव ठाकरेंची विरोधाची भूमिकासुद्धा कायम आहे.
एकाचवेळी अनेक आघाड्यांवर असणार्या पवारांची ही खेळी आहे. यासगळ्यात इंडियाला बळ मिळतेय, ठाकरे विरोधकाची भूमिका निकराने वठवताहेत आणि पक्षाची शकले करून बाहेर पडलेले आपापल्या मतदारसंघात अडकून पडणार आहेत. त्याचवेळी आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. लोकशाही असल्यामुळे एका गटाने वेगळी भूमिका घेतली, हे पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व केंद्रीय यंत्रणेला सांगते आहे. या सगळ्यामुळे, सरकारची अपेक्षित कोंडी साध्य झालीय.
– विशाल राजे