Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझा सूर की अर्णव अमृताचा

साक्षात सरस्वतीनं या मुलीचा कंठात वास करून स्वरालाप केला. स्वरलक्ष्मी प्रसन्न होतीच नंतर धनलक्ष्मीही कृपावंत झाली. वसुधातली स्वरमौक्तिकांची असीम दौलत उधळून जाणारी ही दैवगुणी मुलगी या लोकी लता मंगेशकर म्हणून ओळखली गेली. नामा आधी आणि नंतर लागणारी विशेषणं, पदव्या, पुरस्कार जितके अधिक, तितकी ती व्यक्ती मोठी अशी एक सर्वसाधारण मान्यता आहे. मात्र क्वचित एखादं व्यक्तिमत्त्व स्वनामधन्य असतं.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2023 | 06:00 AM
तुझा सूर की अर्णव अमृताचा
Follow Us
Close
Follow Us:

साक्षात सरस्वतीनं या मुलीचा कंठात वास करून स्वरालाप केला. स्वरलक्ष्मी प्रसन्न होतीच नंतर धनलक्ष्मीही कृपावंत झाली. वसुधातली स्वरमौक्तिकांची असीम दौलत उधळून जाणारी ही दैवगुणी मुलगी या लोकी लता मंगेशकर म्हणून ओळखली गेली. नामा आधी आणि नंतर लागणारी विशेषणं, पदव्या, पुरस्कार जितके अधिक, तितकी ती व्यक्ती मोठी अशी एक सर्वसाधारण मान्यता आहे. मात्र क्वचित एखादं व्यक्तिमत्त्व स्वनामधन्य असतं. उपाध्या, विशेषणं, पदव्या, पुरस्कार अश्या व्यक्तींच्या बाबतीत गौण ठरतात. त्यांचं व्यक्तिमत्वच मुळी सर्वोच्च पुरस्काररूप धारण करतं. अश्या विभुतींचा सत्कार कसा करणार? त्यांची पूजा बांधली जाते. लता हे नामाभिधान असच आहे. अगदी एकेरी उल्लेख झाला तरी बहुमान किंचितही कमी होत नाही. कुठल्याही पुरस्कारामुळे त्या नाही, तर त्यांच्यामुळे पुरस्कार धन्य झाले असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

स्वराधीश मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना ज्योतिष विद्याही अवगत होती. लताची नाममुद्रा जागतिक पटलावर उठेल, मात्र तिची दिगंत कीर्ती याची देही याची डोळा आपणाला पाहता येणार नाही हे ते जाणून होते. त्यांनी आपल्या लेकीला हे सांगितलं होतं. आपल्या कन्येचे दैवी गुण तिच्या जन्माआधी पासूनच उमजले होते. कदाचित म्हणूनच लता अवघ्या चार पांच वर्षांची असतांनाच त्यांनी तिची सांगितिक शिकवणी पूरिया धनाश्रीनी सुरू केली. साधारणतः या रागानी कुणीही कुणाची तालीम सुरू केल्याचं ऐकिवात नाही.

मा. दीनानाथ यांच्या पश्चात, अमान अली यांच्याकडे हंसध्वनीपासून प्रारंभित झालेली लताची तालीम अमानत अली यांच्यापर्यंत येऊन, पार्श्वगायनातल्या व्यस्ततेमुळे, विराम करती झाली. शास्त्रीय संगीतासाठी म्हणावा तसा वेळ देता न आल्याची खंत मात्र दीदींना अखेरपर्यंत होती. मात्र कुमार गंधर्वांसारख्या शास्त्रीय संगीतकारानी म्हटल्याप्रमाणे ‘लताजींच्या तीन मिनिटांच्या गाण्यातून ही तीन तासाच्या मैफिलीचा परिपूर्ण अनुभव येतो’.

भारतीय स्वातंत्र्यसूर्याच्या उदायाच्या साक्षीने लताच्या पार्श्वगायन कारकीर्दीचा अरुणोदय झाला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच लताच्या कारकिर्दीचा ही अमृत महोत्सव असा सुवर्ण योग साधला गेला आहे. आत्यंतिक गरजवंत असताना ऐन उमेदीच्या काळात संगीतकार अनिल विस्वास यांनी लताला एक गाणं दिलं होतं. त्या चित्रपटात नायकाची भूमिका करणाऱ्या दिलीपकुमारशी लोकल प्रवासा दरम्यान, अनिलदांनी जेव्हा नवख्या लताची ओळख करून देताना सांगितलं की ही नवीन मुलगी आहे, चांगलं गाते, तेव्हा दिलीपकुमार यांनी मंगेशकर हे आडनाव ऐकल्याबरोबर “अरे ये तो मराठी हैं l मराठी लोगों के तलफ्फुज मे थोडी दाल चावल की बू आती है” अशी टिप्पणी केली. स्वाभाविकपणे राग आला, तरी जराही हतोत्साही न होता लतानी तत्काळ उर्दू शिकायला प्रारंभ केला आणि गरम गरम वरण- भात आणि वर तुपाची धार या अस्सल मराठी खुशबूची अवघ्या जगाला प्रचिती दिली. दिलीपकुमार यांच्या टिप्पणीमुळे उर्दू शिकून उच्चार सुधारण्याची संधी मिळाली म्हणून त्यांना धन्यवाद ही दिले.

लतादीदींचा गळा जितका वळणदार तितकाच स्वभाव सरळ. ख्यातीप्राप्तीनंतरही त्यात बदल झाला नाही. कुणाशीही त्यांचा सहज संवाद होत असे. ह्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. गाणं निवडी बाबत त्या अत्यंत चिकित्सक होत्या. गीतकार गुलजार यांचं, पंचमची संगीत रचना असलेलं ‘आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज हैं’, हे नर्मश्रृंगार प्रधान अवखळ गीत सर्वांना चांगलच परिचयाचं आहे. या गीताच्या अंतऱ्यात असलेल्या ‘बदमाश’ या शब्दाला दीदी आक्षेप घेतील अशी पंचमची अटकळ होती. त्यामुळे तो बदलण्यासाठी त्यांनी गुलजारच्या मागे लकडा लावला होता. गुलजार पर्यायी शब्द तयार ठेवायला अनुकूल होते मात्र शब्द बदलण्यापूर्वी एकदा दीदींशी चर्चा करण्याचे पक्षधर होते. लता दीदींना जेव्हा गाणं दाखवलं तेव्हा त्यांनी कुठलाही आक्षेप तर घेतला नाहीच उलट मला गायला एक नवा शब्द मिळाला असं म्हणत रेकॉर्डिंगच्या वेळेस तो किंचित हास्य मिश्रित गाऊन अधिक बहार आणली.

लता दीदींच्या पार्श्वगायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नायिकेला आपलं गाणं दिलं, आवाज दिला नाही. तिची गाणी सर्वकालिक नट्यांवर जरी चपखल बसली, तरी रफी जसा देवानंदचा, शम्मीचा आवाज झाला तसा लताचा आवाज कधी शर्मिला, साधना, नूतन, माधुरीचा झाला नाही, तो तिचाच राहिला. सर्वोच्चपदी पोहोचण्यापेक्षाही त्या स्थानी कायम राहणं हे अधिक दुष्कर आहे. नंबर एकवर असण्याचे फायदे तर आपण सर्वच जाणतो पण त्याचे तोटे, मनावर सतत असणारं दडपण सर्व सामान्यांना जाणवत नाही. पार्श्वगायन क्षेत्रात शीर्षस्थ असणाऱ्या लता दीदींना आपलं काम, गायन या बाबत कधीच संतुष्टता येत नाही. तार सप्तकात स्वराविष्कारच्या वेळी तीव्र स्वरपंक्ती गातांनाही त्यांच्या चेहऱ्याच्या रेषा अस्पष्ट ही बदलत नसत. हे अशक्यंभवी आहे. मात्र अशा जागा गातांना त्या आपल्या पायाच्या अंगठयावर सर्व ताण देत हे शक्य करीत असत. पायताण उतरवून गाण्याच्या त्यांच्या सवयी मुळे हे उलगडून आलं. सुरमयी लता मंगेशकर यांचं जीवन गाणे अनेक असूर, कणसूर, बेसूर, बदसूरांनी व्यापलं होतं. त्यांच्या आणि आशा भोसले यांच्या संबंधांबद्दल नाना तऱ्हेच्या कंड्या पिकवल्या गेल्या. काही काळ त्या दोघींमध्ये अबोला होता ही बाब सत्य आहे, मात्र त्याला कारणीभूत होते, आशा यांचे पती गणपतराव भोसले. आशाताईंनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कुणालाही न सांगता घरून पळून जाऊन हा विवाह केला होता.

‘किंचित’ लता मंगेशकर होऊ शकण्याची शक्यता स्वप्नात जरी निर्माण झाली तर कुणालाही धन्य धन्य वाटेल. मात्र स्वतः लता मंगेशकर यांची इच्छा ऐकली तर त्यावर विश्र्वासच बसणार नाही. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की हिंदू पुनर्जन्म मानतात. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की मला मात्र पुनर्जन्म नको आणि जर का मिळालाच तर तो भारतातच, महाराष्ट्रात एखाद्या सामान्य छोट्या कुटुंबातल्या मुलाचा मिळो. लता मंगेशकरचा नको.

लौकिक देह धारण केल्यावर शरीर व्याधींचा फेऱ्यातून अवतारांची ही सुटका होत नाही. या नियमानेच की काय, कोकीळ कंठानं स्वरांची पखरण करण्यासाठी शरीर धारण केल्यामुळे मर्त्यलोकीचे आपले अखेरचे २७ दिवस ह्या गान देवतेला रुग्णालयात काढावे लागले. मानसीच्या सुरेल स्वरांना, अतिदक्षता विभागामध्ये कानावर सतत पडणारे व्हेंटिलेटरचे बिप बिप हे तांत्रिक असूर ध्वनी मैफिलीची भैरवी जेव्हा बेसूरी करू लागले तेव्हा अखेरच्या दोन दिवसात त्यांनी हेडफोन्सची मागणी केली आणि आपल्या पित्याचे तेजस्वी सूर कानात साठवत, आळवत त्या या भूलोकातून गंधर्वलोकी प्रयाण करत्या झाल्या.लता दीदी आपल्यातून जरी शरीरानं निघून गेल्या असल्या तरी सूर रूपानं त्या आपल्या कानी, मनी, ध्यानी नित्य वास करणार आहेत. हृदयात निरंतन चिरंजीव राहणार आहेत तेव्हा त्यांच्या जाण्याचा शोक का करावा? देवर्षी नारदांनी कलियुगाच्या प्रारंभी, साधनेचा सोपा मार्ग भगवान विष्णू यांना विचारला. जेणेकरून जनसामान्यांना परमात्म्याचा सहज साक्षात्कार होण्यास मदत होईल. त्यावेळी नारदांचे शंकांनिरसन करतांना भगवान विष्णू म्हणतात.

|| नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये न च|
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद||

मी वैकुंठात राहत नाही, योगिजनांच्या हृदयातही मी निवास करीत नाही. माझे भक्तजन जिथे संकीर्तन, गायन, वादन करतात तिथे मी वास करतो. दीदींची परमेश्वरावर अपार श्रध्दा होती. त्यांच्या गायनाच्या श्रवणामुळे इहलोकीच साक्षात श्री विष्णूंच्या सानिध्याचा आपणाला लाभ होतो आहे हे विशेष.

– नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com

Web Title: Your song is arnav amritas nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Lata Mangeshkar
  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
1

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
2

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

आता राज्यात तिसरी वॉर रूम, जागतिक आयात निर्यातबाबत देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
4

आता राज्यात तिसरी वॉर रूम, जागतिक आयात निर्यातबाबत देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.